मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणामुळे 15 वर्षांच्या वनवास संपला; देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणामुळे 15 वर्षांच्या वनवास संपला; देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

देशातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईत पार पडलेली ही शस्त्रक्रिया भारतातली पहिली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 18 मार्च : गेल्या काही वर्षांत वैद्यक क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विविध उपचार पद्धतींमध्ये डॉक्टर्स आता तंत्रज्ञानाची आवर्जून मदत घेताना दिसतात. रोबोटिक शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपणासारख्या सर्जरीजमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो. अलीकडच्या काळात अवयव प्रत्यारोपण ही नवीन उपचार पद्धती विकसित आणि यशस्वी होताना दिसत आहे. किडनी ट्रान्स्प्लांट, हार्ट ट्रान्स्प्लांटसारख्या शस्त्रक्रिया कायम चर्चेत येत आहेत. सध्या एका रुग्णावरची एक प्रत्योरापण शस्त्रक्रिया जोरदार चर्चेत आहे. या रुग्णाच्या दोन्ही पूर्ण हातांचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. मुंबईत पार पडलेली ही शस्त्रक्रिया भारतातली पहिली आहे. बायलॅटरल फुल आर्म ट्रान्स्प्लांट म्हणजे काय आणि या रुग्णाची केस नेमकी काय होती, याबद्दल जाणून घेऊ या.

  राजस्थानमधल्या अजमेरजवळच्या कोत्री इथल्या 33 वर्षांच्या प्रेमराम चौधरी या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या रुग्णावर 9 फेब्रुवारीला मुंबईत परळमधल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये बायलॅटरल फुल आर्म ट्रान्स्प्लांट सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी दुर्मीळ आहे. अशा प्रकारचं ट्रान्स्प्लांट सर्वसामान्यपणे कोपरापासून केलं जातं; पण प्रेमला जोरदार इलेक्ट्रिक शॉक बसल्याने त्याचे संपूर्ण खांद्यापासून काढण्यात आले होते. जगभरात आतापर्यंत संपूर्ण हात प्रत्यरोपणाचे प्रयत्न फक्त तीन किंवा चार झाले आहेत, असं प्रेमने सांगितलं.

  प्रेम म्हणाला, `माझ्या कुटुंबात तीन भावांमध्ये मी सर्वांत मोठा असून, माझे वडील संगमरवराच्या खाणीत काम करतात. 2008मध्ये मी इयत्ता 12वीची परीक्षा दिली. परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत पैसे कमावण्याच्या उद्देशाने गावातल्या पॉवर स्टेशनमध्ये काम करू लागलो. त्या वर्षी 28 जून रोजी मी चुकून माझ्या घराबाहेरच्या एका वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेला स्पर्श केला आणि माझ्या शरीरातून 11 हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह गेला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी माझे हात कापावे लागले; पण माझे वडील मोहनलाल यांचे शब्द मला दिलासा देत होते. आपल्या वाट्याला काही तरी चांगलं येईल असं माझे वडील मला रोज सांगायचे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे मी या घटनेतून सावरत होतो. त्यानंतर मी पायानं लिहायला शिकलो आणि माझं शिक्षण सुरू ठेवलं.`

  वाचा - Success Story : शिक्षण फक्त दहावी, अन् वर्षाला कमावतो 25 लाख, काय आहे प्रकार?

  2019मध्ये पहिल्यांदा प्रेम कोचीच्या अमृता इन्स्टिट्यूटमध्ये उपचारांसाठी गेला; पण कोविड लॉकडाउनमुळे त्याला उपचारांमध्ये सातत्य ठेवता आलं नाही. मोनिका मोरे या मुंबईतल्या पहिल्या हँड ट्रान्सप्लांट रुग्णाविषयी वाचल्यावर 2022मध्ये प्रेम मुंबईत आला आणि त्याने ऑगस्टमध्ये शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली; पण त्याला डोनरची दीर्घकाळ वाट पाहावी लागली. जानेवारीत त्याचं नाव प्रतीक्षा यादीत सर्वांत वर आलं. 8 फेब्रुवारी रोजी फिजिओथेरपीच्या सत्रानंतर तो नुकताच सीवूड्सच्या घरी परतला असता, त्याला बहुप्रतिक्षित कॉल आला आणि त्याला सुरत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक संभाव्य ब्रेन डेड डोनर असल्याचं सांगण्यात आलं.

  परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 9 फेब्रुवारी रोजी प्लास्टिक सर्जन डॉ. नीलेश सातभाई यांनी प्रेमवर 16 तास शस्त्रक्रिया करून हातांचं प्रत्यारोपण केलं. त्यांनी सांगितलं, की `फ्रेंच डॉक्टरांच्या टीमने दोन वर्षांपूर्वी जगातली पहिली बायलॅटरल फुल आर्म ट्रान्स्प्लांट शस्त्रक्रिया केली होती. गेल्या वर्षी कोचीतल्या अमृता इन्स्टिट्यूटमध्ये एका पूर्ण हाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती. तसंच जर्मनीमध्येही याच दरम्यान अशी शस्त्रक्रिया झाली होती.` डॉ. सातभाई यांनी गेल्या तीन वर्षांत सात हँड ट्रान्स्प्लांट सर्जरी केल्या आहेत.`

  `किडनी प्रत्यारोपणाच्या तुलनेत हात प्रत्यारोपण दुर्मीळ आहे. भारतात अशा 30पेक्षा कमी शस्त्रक्रिया झाल्या असून, त्यात मुंबईतल्या आठ केसेसचा समावेश आहे. ब्रेन डेड झालेल्या प्रिय व्यक्तीचे हात दान करण्यास सहमती देणाऱ्यांची संख्या कमी आहे. तसंच, रोजच्या फिजिओथेरपीसह रिकव्हरीला प्रदीर्घ वेळ लागतो. तसंच यासाठी येणारा खर्चदेखील मोठा असतो. हाताचं प्रत्यारोपण कमी होण्याची ही महत्त्वाची कारणं आहेत; पण रुग्णालये अशा रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून सुमारे 30 लाखांहून अधिक रक्कम चॅरिटीच्या माध्यामातून जमा करण्यासाठी मदत करतात,` असं डॉ. सातभाई यांनी सांगितलं.

  `प्रत्यारोपणासाठी नोंदणी केल्यानंतर काही महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर 2022मध्ये मी सर्वप्रथम प्रेमला भेटलो. त्याच्याकडे मुंबईत फ्लॅट भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणून तो नवी मुंबईतील जाट समाजाच्या सीवूड्स हॉलवर राहू लागला. नवीन हातांचं वजन पेलण्यासाठी त्याचे खांदे बळकट व्हावेत, यासाठी आम्ही फिजिओथेरपी सेशन्ससाठी एकत्र प्रवास करायचो. प्रेम आणि त्याच्या भावाचा पुरेसा विश्वास संपादन करण्यासाठी मला काही आठवडे लागले` असं डॉ. सातभाई यांनी सांगितलं.

  अखेरीस प्रेमवर बायलॅटरल फुल हँड ट्रान्स्प्लांट शस्त्रक्रिया पार पडली. आता बीएडच्या अंतिम परीक्षेसाठी नोंदणी करता येणार असल्याने प्रेम समाधानी आहे. `माझ्या मुलाचा 15 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. मी आता सर्वप्रथम एक अवयवदाता म्हणून स्वतःची नोंदणी करणार आहे. ज्याप्रमाणे माझ्या मुलाला दात्याकडून मदत मिळाली तशीच मदत मी इतरांना करीन,` असं मोहनलाल यांनी सांगितलं.

  First published:

  Tags: Mumbai, Surgery