टेक्सास सिटी (अमेरिका), 22 डिसेंबर : माणूस म्हणून आपण कोरोनावायरससोबत (corona virus)निकराचा लढा देत 2020 संपवलं. आता सुटकेचा निश्वास सोडू या असा विचार करत असाल तर थांबा. अजून एक बॅड न्यूज आहे!
मेंदू कुरतडणारा अमिबा (amoeba) युएस (US) आणि आसपासच्या देशामध्ये वेगानं पसरतो आहे. नेग्लेरिया फॉवलेरी असं या अमिबाचं नाव असून सप्टेंबरमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचा या अमिबानं जीव घेतल्याची
बातमी होती.
8 सप्टेंबरला जॉशिया मॅकिन्टायर या मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला होता. नेग्लेरिया फॉवलेरी या अमिबाच्या संसर्गाने त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तपासणीत सिद्ध झालं होतं. हा अमिबा तलाव, नद्यांमध्ये पैदा होतो. स्वच्छ पाण्यात तो आला यामागे ढिसाळ व्यवस्थापन किंवा जलशुद्धीकरण यंत्रणा असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेतील ढिसाळ व्यवस्थापन असलेल्या जलतरण तलावांच्या गरम आणि ताज्या पाण्यावर त्याची पैदास होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर टेक्ससमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली. हा अमिबा पाण्यावाटे मुलाच्या शरीरात गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मुलाच्या आजोबांनीही तशाच प्रकारची माहिती दिली होती.
हा अमिबा माणसाच्या श्वासोच्छवासातून नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मायग्रेन, हायपरथर्मिया, मान आखडणं, उलट्या, अत्यंत थकवा, भ्रमिष्टपणा यासारखे आजार होतात. 1983 ते 2010 या काळात या अमिबामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 2010 ते 2019 या काळात 34 लोकांना संसर्ग झाल्याचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रीवेन्शन (सीडीसी)ने सांगितलं आहे.
'सीडीसी'ने सांगितल्यानुसार, आता अशा केसेस वाढत आहेत. मात्र सीडीसीनं हेही स्पष्ट केलं आहे, की या अमिबामुळं दुषित झालेलं पाणी पिल्याने काही धोका नाही, मात्र हे पाणी तुमच्या नाकात गेलं तर ते जीवघेणं ठरू शकतं. कारण हा अमिबा नाकावाटे मेंदूत प्रवेश करतो. सर्वात वाईट गोष्ट काय, तर या अमिबाचा संसर्ग तपासणारी कुठलीही चाचणी सध्या उपलब्ध नाही. आणि रुग्णामध्ये लक्षणं दिसण्यास काही काळ जावा लागतो. तोवर त्याचा मृत्यूही ओढवू शकतो.
&n
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.