हैद्राबाद, 24 डिसेंबर : कोरोनाचा (coronavirus pandemic) निर्दय काळ समाजाच्या विविध वर्गातील लोकांवर हलाखीची वेळ आणताना दिसतो आहे. मात्र या काळात माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं घडलेलं दर्शनही सुखावणारं आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) अशीच एक गोष्ट समोर आली आहे.
हैद्राबाद इथं एका कॉर्पोरेट (corporate) कंपनीत उच्चपदावर असणारा रामू डोसपती यांनी केलेली एक चांगुलपणाची कृती लक्षवेधक ठरली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या (Covid-19 Lockdown) काळात गरिबांना पुरेसं अन्न मिळावं यासाठी त्यांनी 'राईस एटीएम' (Rice ATM) सुरू केलं आहे.
डोसपती HR Manager म्हणून चांगल्या कंपनीत काम करतात. पण अशा हजारो नोकरदारांना प्रेरणादायी ठरणारं काम त्यांनी केलं आहे. न्यूज एजन्सी ANI शी बोलताना रामू स्वतःला प्रेरणा कुठून मिळाली ते सांगतात, "एक सिक्युरिटी गार्ड लॉकडाउनच्या काळात गरिबांना खाऊ घालण्यासाठी 20 किलो चिकन विकत घेताना मी पाहिला. त्याचा पगार होता फक्त 6000 रुपये. या घटनेतून मला प्रेरणा मिळाली. मी राईस एटीएम सुरू केलं."
लॉकडाऊन संपल्यावर हे राईस एटीएम बंद करता येईल असा विचार डोसपती यांनी केला होता. कारण तोवर विशेष गाड्याही सुरू झाल्या होत्या. मात्र नंतर हाताला काम न मिळाल्याने स्थलांतरित मजुरांची अवस्था अजूनच वाईट झालेली त्यांना दिसली.
सुरवातीला दोसपती 150 मजुरांना मित्रांच्या मदतीने जेवण पुरवायचे. लॉकडाऊन संपला तसं त्यांनी गरजूंना किराणा माल पुरवणे सुरू केले. सुरवातीला केवळ 20 ते 30 लोक त्यांच्याकडे यायचे. हा आकडा हळूहळू वाढत 150 ते 200 पर्यंत गेला. या सगळ्यांचे संपर्क क्रमांकही सेतुपती यांनी नोंदवून घेतले.काही कामाची माहिती मिळाली की या लोकांना कळवता यावी हा त्यांचा हेतू होता.
डोसापती आणि त्यांच्या मित्रांनी केवळ मजुरांना नाही तर शिक्षक, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कोरोनाचा संसर्ग झालेले काही लोक यांनाही मदत केली. त्यांनी 15 दिवस पुरेल इतक्या खाद्याचे किट्स महिलांना आणि 5 दिवस पुरतील इतक्या खाद्याचे किट्स मजुरांना दिले.
डोसपती यांनी एएनआयला सांगितलं, "या कोरोनाच्या साथीमुळे शिक्षकांना खूप आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांचे पगार झाले नाहीत. मला याकाळात खूप शिक्षकांचे मदत मागणारे फोन आले. त्यामुळे गेल्या महिन्यात आम्ही जवळपास 750 शिक्षकांना किराणा माल पुरवला."