मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

150 वर्ष जगण्यासाठी काय करावं? शास्त्रज्ञांनी केलेला दावा ऐकून व्हाल थक्क

150 वर्ष जगण्यासाठी काय करावं? शास्त्रज्ञांनी केलेला दावा ऐकून व्हाल थक्क

आजकाल 70-80 वर्षे लोक सहज जगतात. आता माणूस 150 वर्षांपर्यंत जगू शकेल असा दावा शास्रज्ञांनी केला आहे.

आजकाल 70-80 वर्षे लोक सहज जगतात. आता माणूस 150 वर्षांपर्यंत जगू शकेल असा दावा शास्रज्ञांनी केला आहे.

आजकाल 70-80 वर्षे लोक सहज जगतात. आता माणूस 150 वर्षांपर्यंत जगू शकेल असा दावा शास्रज्ञांनी केला आहे.

मुंबई 27 मे: विज्ञानाचं युग आल्यानंतर औषधांचा शोध लागत गेला तशी माणसाच्या दीर्घकाळ जगण्याची शक्यताही वाढत गेली. पूर्वी अनेक रोगांची माहिती नव्हती त्यामुळं त्यावरील उपचारांअभावी माणसाचा मृत्यू होत असे. आता अत्यंत दुर्धर रोगांवरही औषधोपचार विकसित झाल्यानं माणसाची जगण्याची वयोमर्यादा वाढली आहे. आजकाल 70-80 वर्षे लोक सहज जगतात. आता माणूस 150 वर्षांपर्यंत जगू शकेल असा दावा शास्रज्ञांनी केला आहे.

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकेल या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. याबाबतीत झालेल्या एका संशोधनानुसार मनुष्य जास्तीत जास्त 150 वर्षे जगेल, असा निष्कर्ष पुढं आला आहे. जगातील सर्वाधिक वयापर्यंत जगणाऱ्या व्यक्तीचा मान फ्रान्सच्या जीन कॅलमेंट यांच्याकडे जातो. वयाच्या 122 व्या वर्षी 1997 मध्ये त्यांचं निधन झालं. वैज्ञानिकांचा विश्वास खरा ठरला तर कॅलमेंट हे सर्वांत जास्त आयुष्य जगणारे व्यक्ती ठरतील. नेचर कम्युनिकेशन्स (Nature Communications) या जर्नलमध्ये संशोधकांनी त्यांचा हा अभ्यास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे.

या संशोधनात, वैज्ञानिकांनी ब्रिटन (UK) आणि अमेरिकेतील (USA) स्वयंसेवकांकडून आयफोनच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात वैद्यकीय डेटा जमा केला आणि त्याच्या सखोल अभ्यासानंतर निष्कर्ष नोंदवले आहेत. वैज्ञानिकांच्या मते, माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो (Life Span) याचं ठोस उत्तर त्यांना मिळालं आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence-AI) वापर करून शास्त्रज्ञांनी या संशोधनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या आरोग्यविषयक आणि तंदुरुस्तीशी संबंधित माहितीचं विश्लेषण केलं. त्यांच्या अभ्यासानुसार, मानवी आयुष्य दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आधारित आहे एक म्हणजे जैविक वय (Biological Age) आणि दुसरी लवचिकता (Resilience). पूर्वी दीर्घकाळ जगण्याचा संबंध तणाव, जीवनशैली आणि जुनाट आजारांशी होता, तर आता दीर्घायुष्य लोक ताणतणावानंतर किती लवकर सामान्य स्थितीत परत येतात त्यावर अवलंबून आहे.

या अभ्यासातील निष्कर्ष आणि कल यांचे विश्लेषण केल्यानंतर, संशोधकांना असं वाटतं की, 120 ते 150 वर्ष जगल्यानंतर मानवी शरीराची लवचिकता संपते त्यामुळं शरीर पुन्हा तंदुरुस्त होऊ शकत नाही. या अभ्यास अहवालाचे लेखक टिमोथी व्ही. प्यरकोव्ह म्हणतात की, जेव्हा मानवी शरीराचं वय होतं तेव्हा त्याला पुन्हा सुधारण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो.

या अभ्यासात न्यूयॉर्कच्या रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरनं (Rose Wale Park Comprehensive Cancer Centre) सहकार्य केलं आहे. तिथले प्राध्यापक अंद्रेई गुडकोव्ह यांनी हे संशोधन म्हणजे संकल्पनेचे यश असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते, या संशोधनामुळे मानवी दीर्घायुष्यातील मूलभूत घटकांची भूमिका निश्चित करण्यासह त्यातील फरक स्पष्ट करण्यास मदत झाली आहे. वयाशी निगडित आजारांवर प्रभावी उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय करणं आता सोपं होणार आहे. यामुळं केवळ सरासरी वयोमर्यादाच वाढवणं शक्य होणार असून, वृद्धत्व दूर ठेवणाऱ्या उपाययोजनाही विकसित केल्या जाऊ शकतात. 180 वर्षे जगण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेतील एका व्यक्तीनं तब्बल 87 लाख रुपये खर्च करून स्वत:च्या स्टेम सेल्समध्ये (Stem Cells)पुन्हा स्वतःच्या शरीरात इंजेक्शनद्वारे टोचून घेतल्यानंतर काही महिन्यांनंतर हे संशोधन पुढं आलं आहे.

First published:

Tags: Shocking news