• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • खगोलप्रेमींसाठी आज पर्वणी! दुहेरी उल्कावर्षाव पाहण्यासाठी राहा सज्ज

खगोलप्रेमींसाठी आज पर्वणी! दुहेरी उल्कावर्षाव पाहण्यासाठी राहा सज्ज

तुम्हाला उल्कावर्षाव पाहायला आवडतो का? मग त्यासाठीची सुवर्णसंधी आज आहे. 28 जुलै रोजी रात्री आकाशात एकाच वेळी दोन प्रकारचे उल्कावर्षाव पाहायला मिळणार आहेत.

  • Share this:
मुंबई, 28 जुलै: तुम्हाला उल्कावर्षाव पाहायला आवडतो का? मग त्यासाठीची सुवर्णसंधी आज आहे. 28 जुलै रोजी रात्री आकाशात एकाच वेळी दोन प्रकारचे उल्कावर्षाव पाहायला मिळणार आहेत. दक्षिणी डेल्टा अ‍ॅक्वेरिड्स आणि अल्फा कॅप्रिकॉर्न्स नावाचे उल्कावर्षाव (Meteor Shower) सध्या सक्रीय असून, 28 जुलैला रात्री हे दोन्ही वर्षाव अनुभवता येणार आहेत. या रात्री चंद्र (Moon) 75 टक्के प्रकाशमान असेल; तरीही वातावरण ढगाळ नसलं, तर हे उल्कावर्षाव दुर्बिणीशिवाय साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. एकाच वेळी दोन उल्कावर्षाव होण्याची खगोलीय घटना (Astrophysical Event) दुर्मीळ असते. ती अनुभवण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. अर्थात, सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने पावसाळी वातावरण नसलं तरच हे दृश्य अनुभवता येणार आहे. सर्वसाधारणपणे या दोन उल्कावर्षावांमध्ये अंतर असतं; या वेळी मात्र ते दोन्ही एकाच वेळेला होणार आहेत. अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान, वर्षातला सर्वांत आकर्षक मानला जाणारा परसीड उल्कावर्षावही 17 जुलैपासून सुरू झाला असून, तो 26 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या मीडिया अहवालानुसार 11 ऑगस्टच्या रात्री या उल्कावर्षावाचं प्रमाण सर्वाधिक असेल, अशी माहिती 'एरीस' या संस्थेतले शास्त्रज्ञ डॉ. शशिभूषण पांडे यांनी  दिली. 11 ऑगस्ट रोजी चंद्राचा काही भागच दिसणार असल्यामुळे त्याचा प्रकाश कमी असेल. त्यामुळे ढगाळ हवामान नसेल, तर उल्कावर्षाव अत्यंत स्पष्टपणे पाहता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. उल्का म्हणजे काय? धूमकेतू (Comet) जेव्हा सूर्यमंडळातून (Solar System) प्रवास करतात, तेव्हा आपल्या पाठीमागे ते दगड आणि बर्फाचे तुकडे आदी अवशेष सोडतात. हे अवशेष अवकाशात बराच काळ तरंगत राहतात. पृथ्वी फिरता फिरता जेव्हा या अवशेषांच्या संपर्कात येते, तेव्हा ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात आणि गुरुत्वाकर्षणामुळे ओढले जातात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना होत असलेल्या घर्षणामुळे ते छोटे तुकडे पेट घेतात. असे अनेक तुकडे एकाच वेळी पृथ्वीच्या वातावरणात येतात, तेव्हा आपल्याला उल्कावर्षाव दिसतो. परसीडचा उल्कावर्षाव सर्वांत आधी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पाहिला गेला होता. परसीडचा उल्कावर्षाव म्हणजे स्विफ्ट-टटल नावाच्या धूमकेतूतून बाहेर पडणारे अवशेष होत. 1862 साली लुईस स्विफ्ट आणि होरॅस टटल नावाच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा या धूमकेतूचा शोध लावला होता. हा धूमकेतू 1992 साली पृथ्वीच्या सर्वांत जवळून गेला होता. त्या धूमकेतूला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यास 133 वर्षांचा कालावधी लागतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दर वर्षी 17 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान पृथ्वी स्विफ्ट-टटल धूमकेतूच्या (Swift Tuttle Comet) परिभ्रमण कक्षेतून जाते. त्या वेळी या धूमकेतूतून बाहेर पडलेले अवशेष पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. त्यांचा वेग ताशी सुमारे 2,10,000 किलोमीटर एवढा असतो. त्यामुळे परसीडचा उल्कावर्षाव (Perseid Meteor Shower) दिसतो.
First published: