नवी दिल्ली, 25 जानेवारी : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखच्या (Eastern Ladakh) सीमेवरुन वाद (India-China Faceoff) सुरु आहे. या वादावर जवळपास अडीच महिन्यांनी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये रविवारी चर्चेची नववी फेरी झाली. तब्बल 11 तासांपेक्षा जास्त ही चर्चा झाली. यावेळी ‘चीनला पूर्णपणे माघार घ्यावी लागेल. हा तणाव कमी करण्याची जबाबदारी चीनची आहे.’ असं भारतानं ठणकावलं आहे. कोर कमांडर स्तरावर झालेल्या या बैठकीचा उद्देश पूर्व लडाखमधील तणावग्रस्त भागातून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देणे हा होता. या बैठकीनंतरही पेच कायम आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही दोन्ही देशांमध्ये ठोस निर्णयावर सहमती झालेली नाही. बैठकीत काय झालं? या विषयावर मिळालेल्या माहितीनुसार पूर्व लडाखमधील चीनच्या ताब्यात असलेल्या मोल्डो परिसरात (Chushul-Moldo Border Personnel Meeting) रविवारी सकाळी 10 वाजता बैठक सुरु झाली. या बैठीक भारतीय दलाचं नेतृत्त्व लेहमधील 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी केलं. ‘LAC वरील सर्व पॉईंटवरील सैनिक मागे घेण्याची प्रक्रिया ही दोन्ही बाजूनं सुरु झाली पाहिजे. यामध्ये कोणताही एकतर्फी दृष्टीकोन मान्य नाही.’ असं या बैठकीमध्ये भारतानं स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. LAC वर एप्रिल 2020 च्या पूर्वीची स्थिती लागू करावी असं मत भारतानं या बैठकीमध्ये मांडलं. यापूर्वीच्या बैठकीमध्ये काय झालं होतं? भारत – चीनमधील चर्चेची आठवी फेरी 6 नोव्हेंबर रोजी झाली होती. या फेरीमध्ये तणावग्रस्त भागातून सैन्य मागे हटवण्याबाबत व्यापक चर्चा झाली होती. सैन्यानं संयम पाळावा तसंच कोणतीही गैरसमजूत टाळावी यावर दोन्ही देश सहमत झाले होते. त्याचबरोबर या चर्चेच्या आधारावर सैन्य आणि राजकीय संपर्क कायम ठेवून अन्य प्रश्नांवर तोडगा काढण्यावर त्या बैठकीत एकमत झालं होतं. भारतीय जवान सज्ज! पूर्व लडाखमध्ये गेल्यावर्षी 5 मे रोजी दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर या भागातील गोठवणाऱ्या थंडीत भारतानं 50 हजारांपेक्षा जास्त सैन्य तैनात केलं आहे. हे जवान कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार आहेत. चीननं देखील त्यांच्या बाजूनं इतकंच सैन्य तैनात केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.