नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : भारत (India) आणि चीन (China) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बॉर्डरवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमधील सीमा वाद सोडवण्यासाठी शनिवारी दहाव्या फेरीतील सैन्य वार्ता (Military Talks) पार पडली. मोल्दो बॉर्डरवर 12 तास झालेल्या या चर्चेत पूर्व लडाख (East Ladakh) मधील देपसांग, हॉट स्प्रिंग्ज आणि गोगरा येथील सैन्य माघारीबाबत चर्चा झाली. पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेच्या बाजूचे दोन्ही देशातील सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या देशांमध्ये ही चर्चा झाली आहे.
या विषयावर मिळालेल्या माहितीनुसार, ही चर्चा शनिवारी सकाळी 10 वाजता चीनच्या हद्दीमध्ये असलेल्या माल्दो सीमेवर सुरु झाली. ती रात्री 9.45 वाजता संपली. भारत – चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर सैन्य मागं घेण्यावर यावेळी जोर देण्यात आला.
भारत-चीनमध्ये गेल्या वर्षी पाच मे रोजी पेंगाँग सरोवराच्या जवळ हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर सीमेवर तणावाचं वातावरण होतं. रोज बदलणाऱ्या परिस्थितीमुळे या भागात दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले होते. या तणावाच्या जवळपास पाच महिन्यानंतर भारतीय सैनिकांनी कारवाई करत दक्षिण भागातील मुखपारी, रोचीला आणि मगर हिल यासारख्या युद्धासाठी महत्त्वाच्या असलेल्या पर्वत शिखरांवर सैन्य तैनात केले होते.
( वाचा : लडाखमधून अखेर चीनची वेगाने माघार; रणगाडे फिरले मागे पाहा EXCLUSIVE PHOTO )
यापूर्वी झालेल्या चर्चेच्या नवव्या फेरीत भारतानं पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील फिंगर 4 ते फिंगर 8 भागातील चीनी सैनिकांनी माघार घ्यावी यावर जोर दिला होता. तर चीननं पँगाँग सरोवारच्या दक्षिणेकडील तसंच युद्धासाठी महत्त्वाच्या असलेल्या पर्वतांवरील सैन्य भारतानं मागं घ्यावं अशी मागणी केली होती.
संरक्षण मंत्री काय म्हणाले होते?
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयावर संसदेत भारताची भूमिका मांडली होती. 'चीनसोबतचा हा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आखून दिलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताची एक इंचही जमीन कोणालाही देणार नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या वाटाघाटीमध्ये भारताचं कसलंही नुकसान झालं नाही, असा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे.