लडाख, 06 जुलै : मे महिन्यापासून भारत आणि चीनमधील वादानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. 15 जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये चकमक झाली होती, तेथून आता चीन आणि भारत आपले सैन्य दीड किमी मागे घेणार आहे. गलवान, हॉटस्पिंग आणि गोग्रा या भागातून लष्कर मागे घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC), चीनी सैन्य गलवान खौऱ्यामधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे दीड किमी अंतरावरून मागे हटली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्यानं स्थानांतरणाबाबत सहमती दर्शविली आहे आणि सैन्याने सद्यस्थितीपासून माघार घेतली आहे. गलवान खौऱ्याजवळ आता एक बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत. याआधी 3 जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह-लडाख भेटीने (PM Narendra Modi Leh Visit) सगळ्या जगाचं लक्षं वेधून घेतलं. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर (India China Standoff) पंतप्रधानांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात होती. कुणालाही थागपत्ता लागू न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 हजार फुटावर असलेल्या लष्कराच्या नीमू पोस्टवर पोहोचले. यावेळी मोदींनी सुमारे 25 मिनिटं जवानांशी संवाद साधला होता. त्यामध्ये एवढ्या उंचीवर, टोकाच्या नैसर्गित परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांची त्यांनी पाठ थोपटली. ‘या अवघड परिस्थितीत तुम्ही आपल्या मायभूमीची ढाल आहात’, असं पंतप्रधान म्हणाले. लष्कर, वायुदल आणि इंडोतिबेटियन बॉर्डर पोलीस दलातल्या ( ITBP) जवानांशी ते बोलत होते. गलवान खोऱ्यात शहीद झाले होते 20 जवान मे महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. पूर्व लडाख सीमेवर गलवान खोऱ्याजवळील पॅगॉंग तलावावर चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य समोरासमोर होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये चकमक झाली. 15 जून रोजी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 20 सैनिक शहीद झाले. चीनचेही मोठे नुकसान झाले. संपादन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








