नवी दिल्ली 18 ऑक्टोबर: भारत आणि चीन सीमेवर अजुनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर शांततेसाठी चर्चा सुरू आहे. मात्र चीनची वारंवार खोड काढण्याची सवय गेलेली नाही. सर्व चर्चांमध्ये सीमेवर शांतता ठेवण्याचं ठरलेलं असतानाही चीनने भारताच्या सीमेजवळच युद्धाभ्यास करत पुन्हा एकदा चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. या युद्ध सरावात क्षेपणास्त्रही डागण्यात आली असून त्याचा VIDEO चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सने व्हायरल केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव आहे. चीनने अनेकदा भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सेनेने चीनचे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्याही सुरू आहेत. मात्र आडमुठा चीन आपलं धोरण बदलण्यास तयार नाही.
याच पार्श्वभूमीवर चीनने तिबेटमध्ये युद्ध सराव केला आहे. चीनच्या पीपल्स आर्मीने ड्रोन्स आणि रॉकेट लाँचर्सच्या मदतीने आपल्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्र डागलीत आणि त्यांना उद्ध्वस्त केलं. Tibet Theater Commandने 47 हजार फुटांवर हा अभ्यास केल्याचं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे. यात वापरण्यात आलेली शस्त्रे ही 90 टक्के नवी आहेत असंही त्यात म्हटलेलं आहे.
चीनहा हा युद्धसराव म्हणजे भारतावर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे. चीनने हायटेक तंत्रज्ञान वापरून संरक्षण जाळं तयार केल्याचं त्यात दिसत आहे.
WATCH: The PLA Tibet Theater Command recently held live-fire exercises in the Himalayas at an elevation of 4700m. 90% of the weapons and equipment involved had been newly commissioned. pic.twitter.com/Mud3tKmqZl
— Global Times (@globaltimesnews) October 18, 2020
दुसरीकडे भारतानेही सीमेजवळच्या सर्व हवाई तळांवर आपली अत्याधुनिक विमाने तैनात केली आहेत. ही लढाऊ विमाने सरावही करत आहेत. लष्कर आणि हवाई दलाने एकत्र येत एक योजना तयार केली असून त्यानुसार सर्व कामे केली जात आहेत.
फक्त भारताशीच नाही तर तैवान, जपान, व्हिएतनाम अशा तब्बल 21 देशांशी चीनचा सीमा वाद सुरू आहे. याबद्दलच जाणून घेऊ अधिक माहिती.
भारत-चीन यांची 3,488 किलोमीटर लांब सीमा परस्परांना लागून आहे. यापैकी बऱ्याच ठिकाणी चीनने भारताच्या भूमीवर आक्रमण करत ती त्यांची असल्याचा दावा केला आहे. चीननी लडाखमधील 38,000 स्क्वेअर किलोमीटर (अक्साई चीन) जमिनीवर कब्जा केला आहे. ही जमीन भारताला तिबेट-शिनजियांगशी जोडते आणि स्ट्रॅटेजिक दृष्टीनीही खूप महत्त्वाची आहे. चीन अरुणाचल प्रदेशला तिबेटचा भाग मानतो आणि 90,000 स्क्वेअर किलोमीटर भाग आपला असल्याचा दावा करतो. 1959 मध्ये तिबेटमधील उद्रेकानंतर दलाई लामांनी भारतात शरण घेतली, 1962 साली या सीमा वादामुळे चीन-भारत युद्ध झालं आहे. आजही चीन आणि भारत यांच्यात लडाख आणि अरुणाचलमध्ये सीमा प्रश्न आहे.