मुंबई, 1 एप्रिल : तीव्र दातदुखी, दाढदुखी तुम्ही कधी अनुभवली आहे का? हो ना मग तेव्हा काय त्रास होतो हे तुम्हाला सांगायलाच नको. या दातदुखीसाठी अनेक कारणं असतात. दातदुखी कशी होते याचं एक महत्त्वाचं कारण शास्रज्ञांनी शोधलं आहे. बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी दाढदुखी मागचं आणखी एक नवं कारण शोधून काढलं आहे. आपल्या दाताच्या खाली असलेल्या इनॅमलच्या खाली एक कवच असतं त्याला डेंटिन म्हणतात. हे कवच ओडोंटोब्लास्ट्स या पेशींपासून तयार होतं. यामध्ये मऊ डेंटल पल्प आणि रक्तवाहिन्या असतात. या ओडोंटोब्लास्ट्सचा नवा गुणधर्म या शास्रज्ञांनी शोधला आहे. सायन्स अडव्हान्सेस या जर्नलमध्ये यासंबंधीच्या अभ्यासाबद्दल माहिती प्रसिद्ध झाली आहे. या संशोधनातील प्रमुख अभ्यासक आणि मॅसेच्युसेट जनरल हॉस्पिटलमधील (MGH) सेंटर फॉर इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक्सचे मेडिकल डायरेक्टर पॅथलॉजिस्ट डॉ. जोचेन लेनार्झ म्हणाले, ‘ आम्हाला या संशोधनात असं लक्षात आलंय की ओडोंटोब्लास्ट्ससुद्धा (odontoblasts) तीव्र दातदुखी होण्यासाठी कारणीभूत असतात. या संशोधनामुळे या पेशींचा एक नवा गुणधर्म माहीत झाला आहे. पण दातदुखी रोखण्यासाठी या दु:खाच्या जाणीवेला प्रतिबंध कसा करायचा हेही आम्हाला माहीत झालंय.’ ‘सर्दीमुळे दातदुखी होण्यामागे अनेक कारणं आहेत. जेव्हा लोकांच्या दाताखाली पोकळी असते आणि ते ट्रिटमेंट घेत नाहीत अशावेळी त्यांना अतिशय तीव्र दातदुखीचा सामना करावा लागतो. पण वयामुळे दातांच्या खालचं इनॅमल कमी झाल्यामुळेही दात खूप सेन्सिटिव्ह होतात. कॅन्सरच्या काही रुग्णांना प्लॅटिनम बेस्ड केमोथेरेपी दिल्यावर संपूर्ण शरीरात कोल्ड सेन्सिटिव्हिटीचा त्रास होतो. तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो कधीकधी तो इतका वाढतो की ते केमोथेरेपी थांबवतात,’ असं लेनर्झ यांनी सांगितलं. माणसाच्या दातांच्या दुखण्याचा अभ्यास करण्यासाठी दात उघडून मग अभ्यास करावा लागतो, हे फार जिकिरीचं काम आहे. त्यामुळे या संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केले. त्यांनी उंदरांना भूल देऊन त्यांच्या दातांत ड्रिल केलं. ज्या उंदरांना दातांत जखमा केल्या होत्या त्यांनी त्यांच्या वागण्यातून त्यांचं दु: ख व्यक्त केलं. उदाहरण द्यायचं झालं तर ज्या उंदरांच्या दातांत जखमा केल्या नव्हत्या त्यांच्या तुलनेत जखमा केलेल्या उंदरांनी 300 टक्के अधिक साखरेचं पाणी प्यायलं. या आधीच्या संशोधकांच्या टीमच्या असं लक्षात आलं होतं की TRCP5 हे जीन असलेलं एक प्रोटीन मानवी शरीराच्या विविध भागांतील रक्तवाहिन्यांमध्ये आढळतं. TRCP5 हे प्रोटिन सर्दीमुळे होणाऱ्या दुखण्याचा मध्यस्थ आहे. त्याचं प्रमाण शून्य करणं हे याआधीच्या संशोधकांना साध्य झालं होतं. जेनेटिक्सचा वापर करून TRCP5 हे जीन शरीरात नसलेल्या उंदरांवर या संशोधकांनी प्रयोग केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, ज्या उंदरांच्या दातांमध्ये जखमा आहेत त्यांनी जास्त साखर पाणी प्यायलं नाही आणि दातात जखमा नसलेल्या उंदरांसारखंच वर्तन केलं. लेनर्झ म्हणाले, ‘ टेंप्रेचर सेन्सर TRCP5 हाच ओडोंटोब्लास्ट्सच्या माध्यमातून थंडावा पसरवतो आणि त्यामुळे दाताखालच्या नसा चेतवल्या जातात परिणामी दातदुखी आणि कोल्ड हायपरसेन्सिटिव्हिटीचा त्रास जाणवतो, याचा पक्का पुरावा आता आमच्याकडे उपलब्ध आहे. दुखापतग्रस्त दाताचा अतिरिक्त जखमांपासून बचाव करण्यासाठी शरीर दातदुखीच्या माध्यमातून त्या दाताचं कदाचित रक्षणही करत असेल.’ विशेषत: सर्दीला प्रतिसाद देताना TRCP5 प्रोटिन ओडोंटोब्लास्ट्समधील मेमरेनची सर्व चॅनल उघडतं त्यामुळे कॅल्शियमसारखे इतर मॉलिक्युल त्या पेशीत प्रवेश करतात. जर दाताखालच्या खोलवर पोकळीमुळे जर त्या खाली असलेल्या पल्पमध्ये जळजळ सुरू झाली तर TRCP5 प्रोटिन दाताच्या मूळपासून ते मेंदूतील दु: खाची जाणीव होणाऱ्या केंद्रापर्यंत इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवतं. वयामुळे जर हिरडी कमकुवत झाली तर दात दुखी उद्भवते, कारण ओडोंटोब्लास्ट्सना सर्दीची जाणीव होत असते. लेनर्झ म्हणाले, ‘थंड वातावरणात सर्व पेशी आणि टिशु त्यांचं मेचॅबोलिझम कमी करतात त्यामुळे दान केलेले मानवी अवयव बर्फात ठेवतात. पण TRCP5 हे प्रोटीन पेशींना थंड परिस्थितीत अधिक सक्रिय करतं आणि त्यामुळेच TRCP5 च्या माध्यमातून ओडोंटोब्लास्ट्ना थंडावा जाणवतो हाच या संशोधनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. ’ लेनर्झ म्हणाले, ‘ आपल्या दातांच्या बारीकबारीक चकत्या करता येणं कठीण आहे त्यामुळे आम्ही त्यांचा अभ्यास मायक्रोस्कोपखाली करतो. पण माणसाच्या तोंडातून बाहेर काढलेल्या दातातही TRCP5 प्रोटिन असतं. ’ शतकानुशतके लवंग तेलाचा वापर दातदुखी थांबवण्यासाठी केला जातो. या लवंग तेलातील युगेनॉल (eugenol) हा घटक TRCP5 ला ब्लॉक करतो त्यामुळे दाताचं दुखणं थांबतं. युगेनॉल असलेल्या अनेक टूथपेस्ट सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पण संशोधक युगेनॉलचा अधिक नव्या पद्धतीने वापर करण्याच्या पद्धती शोधून काढत आहेत. ज्यामुळे केमोथेरेपीतील अत्यंत तीव्र कोल्ड सेन्सिटिव्हिटीवरही उपचार करता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







