मुंबई, 24 जुलै : माणूस मशीनप्रमाणे काम करू शकत नाही. म्हणूनच तर आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते. ऑफिसच्या कामातून थोडा ब्रेक मिळावा, यासाठी वार्षिक रजेची तरतूदही नोकऱ्यांमध्ये असते. काही क्षण आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत विरंगुळ्याच्या ठिकाणी घालवले, तर कामाचा ताण कमी (Reduced Stress) होतो. त्यामुळेच वार्षिक रजा (Annual Vacation) गरजेची असते. परदेशात सध्या सुट्टीचा हंगाम आहे; मात्र अनेक जण सुट्टीचा आनंद घेण्याऐवजी सुट्टी घेण्यासाठी इच्छुक नसल्याचं एका संशोधनात आढळलं आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात, आयर्लंडमधल्या (Ireland) दर पाच व्यक्तींमधली एक व्यक्ती वार्षिक सुटी घेत नाही असं दिसून आलंय. गेल्या दोन वर्षांत यूकेमधल्या (Britain, U.K.) पाचपैकी दोन नोकरदार व्यक्तींनी कमी सुट्टी घेतली आहे. कामातून ब्रेक मिळावा, यासाठी दर वर्षी सुट्टी घेणं गरजेचं असतं; मात्र अनेक जण ही रजा घेत नाहीत. त्यामागे काही कारणं आहेत. काही दिवस रजेवर गेल्यामुळे कामातला रस निघून जाईल की काय अशी भीती काही जणांना वाटते. त्यामुळे ते रजा घेत नाहीत. सुट्टी घेतली तरी कामाचा विचार मनातून जाणार नाही. याचा त्रास होत राहील असंही काहींना वाटतं. जे कामाच्या बाबत पॅशनेट असतात, त्यांना अशा भावनेमुळे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्यांना काम विसरणं शक्यच होत नाही. असा विचार करणारे सुट्टी मागूच शकत नाहीत आणि एखाद्या बॉसने सुट्टी दिलीच, तरी ते फिरायला जाऊ शकत नाहीत. सुट्टीत होणाऱ्या खर्चाला काही जण घाबरतात. त्यामुळे सुट्टीच नको म्हणतात. विशेषतः ज्यांचं मोठं कुटुंब असतं, त्यांना वार्षिक रजा नकोशी (Not Interested In Holiday) वाटते. म्हणून पैसे वाचवण्यासाठी ते रजेवर पाणी सोडतात. काही जणांना असं वाटतं, की सुट्टी घेऊनही त्यांना आराम मिळणार नाही. त्यामुळे ते सुट्टीच घेत नाहीत. त्यांनी सुट्टीचं नियोजन कसं केलं आहे, त्यावरही ते अवलंबून असतं; पण कुटुंबासोबत सुट्टी घालवणं कधी कधी ऑफिसपेक्षा जास्त तणावपूर्ण ठरू शकतं. वार्षिक रजा न घेण्याबद्दल अनेक कारणं आहेत; मात्र परिणामांची पर्वा न करता कामातून ब्रेक घेण्यासाठी सुट्टी काढणं आवश्यक असतं. काही वेळा घाबरट मानसिकतेच्या व्यक्ती सुट्टीवरून परत आल्यावर त्यांचा ताण लगेचच पुन्हा वाढतो. जे वर्षभर नियमित सुट्ट्या घेतात त्या कर्मचाऱ्यांना कोणताही ताण जाणवत नाही. त्यांचं आरोग्यही उत्तम असतं. वर्षातून एकदा तरी मोठी सुट्टी घेतली पाहिजे असं संशोधन सांगतं. यामुळे सकारात्मक भावना वाढीस (To Get Positive Energy) लागते. काही सकारात्मक अनुभवही मिळतात. सुट्टी घेऊन तुमची बॅटरी रिचार्ज होऊ शकते. पुन्हा काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे एक किंवा दोन आठवड्यांची मोठी रजा वर्षातून एकदा तरी घेतली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.