मुंबई, 07 सप्टेंबर : सोशल मीडियावर दरदिवशी असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात. यात मनोरंजनात्मक तसेच दैनंदिन जीवन जगताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन करणारे बहुतांश व्हिडिओ असतात. नाचत (Dance) असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. डान्स करताना एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. डान्स करणं आणि हृदयविकार यांच्यात नेमका काय संबंध आहे याचा उलगडा नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमधील (Apollo Hospital) कार्डिअॅलॉजिस्ट (Cardiologist) डॉ. वनिता अरोरा यांनी केलाय.
यासंबंधी बोलताना डॉ. अरोरा म्हणाल्या की, डान्स करणं आरोग्यासाठी नेहमी चांगलं मानलं गेलंय. जर तुम्ही नियमित डान्स करत नसाल आणि अचानक एकेदिवशी बेधुंद होऊन डान्स करत असाल तर अडचण निर्माण होऊ शकते. डान्स करताना तुमच्या हृदयाचे ठोके म्हणजेच हार्ट रेट (Heart Rate) वाढतो. यामुळे हृदयावर ताण येतो. स्थुलत्व (Obesity) किंवा हायपरटेन्शनचा (Hypertension) आजार असताना अधिक तीव्रतेने (High Intensity) डान्स केल्यानं हार्ट अॅटॅक आणि कार्डिअॅक अरेस्टचा (Cardiac Arrest) धोका वाढतो. याशिवाय धुम्रपान करणाऱ्या लोकांनाही डान्स करताना धोका अधिक असतो.
हे वाचा - Pitru Paksha 2022: पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये? हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे
हृदयाचं आरोग्य आणि डान्सचा काय आहे संबंध?
तज्ज्ञांच्या मते, हृदयाच्या आरोग्यासाठी डान्सला व्यायाम म्हटलं जाऊ शकतं. परंतु, हळूहळू याची सुरूवात व्हायला हवी आणि नंतर स्टॅमिना (Stamina) वाढवायला हवा. कुठलाही व्यायाम (Exercise) अचानक प्रमाणापेक्षा जास्त करू नये. डान्स किंवा व्यायाम करताना आपल्या शरीरात एंडोफिन हॉर्मोन (Endorphin Hormone) स्रवतं. हे हॉर्मोन व्यक्तीला आनंदी आणि आरोग्यदायी राहण्यासाठी मदत करतं. आरोग्यसंपन्न लोकांनी डान्स करणं फायदेशीर आहे. तुम्ही जर एखाद्या गंभीर आजाराशी सामना करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम अथवा डान्स करणं योग्य ठरतं.
हे वाचा - संध्याकाळच्या वेळेस झोपू नये असं का म्हणतात? ही आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
यांनी टाळावा डान्स
डॉ. वनिता अरोरा यांच्या मते, हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी डान्स करू नये. ज्या रुग्णांच्या धमन्यांमध्ये अडथळे (Arteries Blockages) आहेत, त्यांनी डान्स किंवा व्यायाम करू नये (डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम प्रकार निवडा). असं केल्याने त्यांना हार्ट अॅटॅक येऊ शकतो. अधिक ताणही त्यांच्यासाठी धोकादायक ठरतो. कार्डिअॅलॉजिस्टच्या सल्ल्यानचं त्यांनी शारीरिक हालचाल (Physical Activity) करायला हवी. ज्यांना आधी हार्ट अॅटॅक येऊन गेला आहे, त्यांनी हळू डान्स करायला हवा. अधिक वेळ डान्स केल्याने नुकसान होऊ शकतं. केवळ डान्सच नाही तर पॉवर योगा आणि एरोबिक्सही (Yoga & Aerobics) टाळणं गरजेचं आहे. कारण यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण पडून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नाचून आनंद व्यक्त करण्याऐवजी दुसऱ्या पद्धतीने आनंद व्यक्त करावा.