जीवनशैलीत मोठा बदल झाल्यामुळे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आजच्या काळात बहुतांश लोकांना काहीतरी शारीरिक व्याधी असल्याचं दिसतं. व्यायामाचा अभाव, बैठं काम आदी कारणांमुळे सांधेदुखी, स्नायू आणि हाडांची दुखणी वाढत आहेत. या स्वरुपाचे आजार झाल्यास संबंधित व्यक्तीला दीर्घकाळ वेदना सहन कराव्या लागतात. याशिवाय शारीरिक वेदनेमागं आणखी काही कारणं देखील असतात. सातत्यानं होणाऱ्या शारीरिक वेदनेमुळे संबंधित व्यक्तीला रोजच्या गोष्टी सहजपणे करणं अशक्य होतं. यावर व्यायाम, फिजिओथेरपी, औषधोपचारांसारखे पर्याय सांगितले जातात. पण यामुळेदेखील वेदना कमी होत नाही. संशोधकांनी प्रदीर्घ जाणवणाऱ्या वेदनेवर संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत. शारीरिक वेदनेच्या समस्येवर ग्रीन लाइट थेरपी फायदेशीर ठरू शकते, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. जुनाट शारीरिक वेदनेवर फायदेशीर ठरणारी ‘ग्रीन लाइट थेरपी’ नेमकी कशी असते, त्याविषयी जाणून घेऊया. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. आज जगभरातील बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या आरोग्यविषयक समस्येनं ग्रस्त आहेत. त्यात दीर्घ काळापासून शारीरिक वेदनेची समस्या असणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ड्युक युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी एक संशोधन केलं. कोणत्याही प्रकारच्या दीर्घकाळ असलेल्या शारीरिक वेदनेवर ग्रीन लाइट थेरपी फायदेशीर असल्याचे दिसून आलं. सध्याच्या काळात ग्रीन लाइट थेरपी खूप लोकप्रिय होत आहे. या थेरपीत एखाद्या रुग्णाला किंवा वेदनेमुळे हैराण झालेल्या व्यक्तीला ग्रीन लाइट असलेल्या खोलीत काही वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे या थेरपीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याबाबतच्या संशोधनाविषयी बोलायचं झालं तर, दोन आठवड्यांपर्यंत लोकांवर या थेरपीच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग केले गेले. यात लोकांना रोज चार तास लाल. हिरवा आणि काळ्या रंगाचे चष्मे घालण्यास देण्यात आले. हिरव्या रंगामुळे लोकांमधील वेदना विषयी चिंता कमी होत असल्याचे संशोधनात दिसून आलं. संशोधकांनी हिरव्या रंगाच्या प्रकाशामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी माहिती दिली. ``हिरवा प्रकाश आपल्या डोळ्यांतून मज्जातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो. यातील काही वेदना कमी करण्याचं काम करतात. डोळ्यातील मेलानोप्सिन अॅसिड मेंदूला वेदना नियंत्रित करण्यासाठी सिग्नल पाठवते आणि ही गोष्ट या क्रियेत ट्रिगर ठरते,`` असं संशोधकांनी सांगितले. एका अहवालानुसार, अमेरिकेतील पाच कोटींपेक्षा जास्त लोकांना कोणत्या ना कोणत्या आरोग्यविषयक समस्येमुळे वेदनांचा सामना करावा लागतो. यासाठी ते अॅक्युपंक्चर, मसाज किंवा औषधांद्वारे उपचार करतात. पण यामुळे वेदनांचे शमन होतेच असं नाही. अनेकदा लोकांना औषधांची सवय लागते. ग्रीन लाइट थेरपीच्या माध्यमातून वेदना दूर होण्यास मदत होते, असं ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे वेदना दूर करण्यासाठी ही थेरपी निश्चितच फायदेशीर ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.