राज्यात कोरोनाचं थैमान, त्यात मंकीपॉक्सचं सावट आणि आता स्वाईन फ्लूचं संकट ओढावलं आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
राज्यात या वर्षात आतापर्यंत 409 रुग्ण आहेत तर 11 मृत्यू आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यात स्वाईन फ्लू कहर करतो आहे.
मुंबईत जूनच्या सुरुवातीला फक्त 2 प्रकरणं होती जी आता महिनाअखेर 70 वर पोहोचली आहे. गेल्या 5 दिवसांत पाचपट प्रकरणं वाढली आहेत.
मुंबईत महिनाभरात स्वाईन फ्लूची सर्वाधिक प्रकरणं असली तरी पुण्यात सर्वात जास्त बळी आहेत. पुण्यात स्वाईन फ्लूमुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 10 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
1 जानेवारी ते 1 जुलै या कालावधीत पुणे शहरात 10 ते 15 केसेस होते. पण गेल्या 28 दिवसांतच 45 नव्या केसेची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात 4 दिवसांत स्वाईन फ्लूचे 86 रुग्ण आढळले आहेत. तर 4 दिवसांतच 4 बळी गेले आहेत. नागपूर आणि कोल्हापुरातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत.