मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय आहे का? मग ती आताच सोडा, नाहीतर शरीरावर होईल वाईट परिणाम

झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय आहे का? मग ती आताच सोडा, नाहीतर शरीरावर होईल वाईट परिणाम

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

सध्या जगात झोपेच्या गोळ्या घेऊन झोपणारे अनेक लोक आहे आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतेच चालली आहे; मात्र या गोळ्यांचे अनेक गंभीर दुष्परिणाम आहेत. ते जाणून घेतल्यावर कदाचित तुम्ही या गोळ्या भविष्यात खाणार नाहीत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 13 सप्टेंबर :  शांत आणि स्वस्थ झोप (Sound Sleep) हा अनेक आजारांवरचा रामबाण उपाय आहे. अर्थात शांत झोप तेव्हाच लागते, जेव्हा शारीरिक कष्ट असतात, पण मनावर ताण नसतो. आजच्या जगात ही अशी झोप मिळणं खरोखरच दुर्मीळ झालंय. त्याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. सतत पुढे जाण्याच्या प्रवाहात आणि अट्टाहासामुळे आयुष्याची गती वाढते. भौतिक, मानसिक पातळीवर एकाच वेळी अनेक लढाया लढणं सुरू असतं. यात झोप या नित्यक्रमातल्या अत्यंत आवश्यक गोष्टीवर परिणाम होतो. त्यात आता मोबाइल, टीव्हीमुळे रात्री उशिरापर्यंत डोळ्यांसमोर स्क्रीन असल्यामुळे झोपेचं खोबरं होतं. हे वाढत गेलं, तर झोप लागण्यासाठी झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात.

सध्या जगात झोपेच्या गोळ्या घेऊन झोपणारे अनेक लोक आहे आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतेच चालली आहे; मात्र या गोळ्यांचे अनेक गंभीर दुष्परिणाम (Side Effects Of Sleeping Pills) असतात. त्याबद्दल जाणून घेऊ या. 'एबीपी लाइव्ह'ने याबाबत माहिती देणारं सविस्तर वृत्त दिलं आहे.

झोप येण्यासाठी गोळ्या घेतल्यामुळे शरीरावर आणि मेंदूवर अनेक घातक परिणाम होतात, असं अनेक अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. झोपेच्या गोळ्या स्मरणशक्ती कमजोर बनवतात. अशा व्यक्तींची विचार करण्याची आकलनाची क्षमता हळूहळू कमी होत जाते. या गोळ्या घ्यायला लागल्यावर महिन्याभराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. या गोळ्यांमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो.

झोपेच्या गोळ्या नियमितपणे घेतल्यामुळे सुस्ती, मलावरोध, स्मरणशक्ती कमी (Memory Loss) होणं, पोटदुखी, अशक्तपणा, चक्कर येणं या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या कधीही खाऊ नयेत. गोळ्यांचा पर्याय हा शेवटचा असावा. त्याआधी झोप येण्यासाठी काही सोपे उपाय करून तुम्ही पाहू शकता.

- झोपताना टीव्ही किंवा मोबाइल (Avoid Using Screen Before Sleeping) पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे ही सवय सोडून द्या. त्याऐवजी झोपताना चांगला विचार करा आणि वेळेवर झोपण्याची सवय लावा.

- झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा ठरवून घ्या. यामुळे रूटीन बसेल. व्यवस्थित झोप झाल्यामुळे दिवसभर उत्साही वाटेल.

हे वाचा : Green Tea Side Effect : 'या' वेळेला चुकूनही पिऊ नका ग्रीन टी; फायद्यांऐवजी नुकसानच होईल जास्त

- झोपण्याआधी हात आणि पाय व्यवस्थित धुऊन मग झोपा. शक्य झाल्यास पायाच्या तळव्यांना (Foot Massage) एखाद्या तेलानं मसाज करा. पायाच्या तळव्यांना तेल लावल्यानं चांगली झोप लागते.

- रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिणं झोपेवर दुष्परिणाम करतं. त्यामुळे झोपताना अशी पेयं पिऊ नका.

- झोप येण्यासाठी एखादं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करून पाहा. यामुळेही झोप लवकर लागेल. तसंच चांगल्या वाचनामुळे चांगले विचार मनात येतात. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता कमी होते. काही परिस्थितींमध्ये या गोळ्या घ्याव्या लागू शकतात; मात्र त्यांची सवय होणं शरीराला घातक ठरू शकतं. गोळ्या घ्यायची वेळ आलीच, तरी वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

First published: