मद्यपानामुळे अनेक गंभीर शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते; मात्र अलीकडच्या काळात मद्यपान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. फॅशन म्हणून मद्यपान करणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. 'आम्ही प्रमाणात आणि थोडंच मद्यपान करतो,' असं समर्थन काही जण करतात. आता मद्यपानासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मद्यपानामुळे कॅन्सर होऊ शकतो. मद्याच्या पहिल्या थेंबापासून कॅन्सरचा धोका सुरू होतो, असा दावा जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने केला आहे. एखादी व्यक्ती कितीही प्रमाणात मद्यपान करत असली, तरी ते धोकादायकच आहे, असं यावरून स्पष्ट होतं. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
मद्यपानाविषयी गेल्या काही वर्षांत अनेक संशोधनं झाली आहेत. या संशोधनांच्या निष्कर्षांमध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. यात डब्ल्यूएचओने केलेला दावा धक्कादायक आहे. दारूच्या पहिल्या थेंबापासून कॅन्सरचा धोका सुरू होतो. दारू पिण्याचं असं कोणतंही प्रमाण नाही, की ज्यात दारू पिणं हानिकारक नाही असं म्हणता येईल. डब्ल्यूएचओने `द लॅन्सेट पब्लिक हेल्थ`मध्ये एक लेख प्रकाशित केला आहे. अल्कोहोल सेवनाचा विचार केला जातो, तेव्हा कोणतंही सुरक्षित प्रमाण नसतं, असं त्यात म्हटलं आहे.
नवीन आकडेवारीनुसार, युरोपात कॅन्सरचं सर्वांत मोठं कारण मद्यपान हे आहे. ज्या व्यक्ती कमी प्रमाणात अल्कोहोल सेवन करतात, त्यांचादेखील यात समावेश आहे. ज्या महिलांना मद्यपानाचं व्यसन आहे, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी केवळ अल्कोहोल जबाबदार आहे. तसंच मृत्यूमागचं सर्वांत मोठं कारण हे कॅन्सर असल्याचं युरोपीय युनियनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून दिसून येतं.
इथेनॉल जैविक यंत्रणेद्वारे कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतं. याचाच अर्थ अल्कोहोल कितीही महाग असलं किंवा कमी प्रमाणात प्राशन केलं, तरी कॅन्सरचा धोका निर्माण होतो, असा दावा डब्ल्यूएचओनं केला आहे. जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांना कॅन्सरचा धोका अधिक असतो, असंदेखील संशोधनात म्हटलं आहे.
`अल्कोहोल वापराच्या तथाकथित सुरक्षित पातळीबद्दल आम्ही कोणताही दावा करू शकत नाही,` असं प्रादेशिक सल्लागार आणि असंसर्गजन्य रोग व्यवस्थापनाच्या डॉ. कॅरिना फरेरा-बोर्जेस यांनी म्हटलं आहे. `मद्यपान करणाऱ्याच्या आरोग्याला मद्याच्या पहिल्या थेंबापासून धोका सुरू होतो. जितकं जास्त मद्य प्याल तितकं ते आरोग्यासाठी हानिकारक आहे,` असा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा - 'आताच लग्न झालं, बायकोही फोन उचलेना, मला सुट्टी द्या' पोलीस कॉन्स्टेबलनं लिहिलं रजेसाठी पत्र
`जेव्हा आपण मद्यपानाच्या सुरक्षित पातळीविषयी बोलतो, तेव्हा आपण आपल्या प्रदेशात आणि जगामध्ये अल्कोहोलमुळे होणाऱ्या हानीच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत आहोत. मद्यपान कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतं, ही बाब आता पूर्णपणे सिद्ध झाली आहे. हे सत्य अद्यापही अनेक देशांमधल्या नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे आपल्याला येत्या काळात तंबाखूजन्य उत्पादनांप्रमाणेच मद्याच्या बाटलीवरदेखील कॅन्सरसंबंधी इशारा द्यावा लागेल,` असं डॉ. फरेरा बोर्गेस यांनी स्पष्ट केलं.
डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ. जर्गन रेहम यांनी सांगितलं, `जागतिक स्तरावर सर्वाधिक मद्यपानाची आकडेवारी पाहिली तर युरोपातले नागरिक मोठ्या प्रमाणावर मद्यपान करतात. या प्रदेशातल्या 200 दशलक्षहून अधिक जणांना दारूमुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. कमी प्रमाणात मद्यपान केलं तर कॅन्सरचा धोका कमी होतो, असा दावा केला जातो; मात्र याबाबत कोणतंही संशोधन झालेलं नाही. मद्यपानामुळे वंचित आणि असुरक्षित लोकसंख्येत अधिक मृत्यू होत आहेत. यासोबतच या व्यक्तींचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही जास्त आहे.`
मद्यपानामुळे कमीत कमी सात प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो, असं या संशोधनात म्हटलं आहे. यात प्रामुख्याने तोंडाचा अर्थात माउथ कॅन्सर, घशाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलन कॅन्सरचा समावेश आहे. दारू हे कोणतंही सामान्य पेय नाही. त्यातल्या विषारी घटकांमुळे शरीराचं खूप नुकसान होतं. काही दशकांपूर्वी इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने हा गट 1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केला होता. हा सर्वांत धोकादायक आहे. त्यात अॅस्बेस्टॉस आणि तंबाखूचादेखील समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.