मुंबई 08 डिसेंबर : स्त्रियांना दुसरा जीव जन्माला घालण्याची देणगी मिळाली खरं; मात्र त्यासाठी आयुष्यातली काही वर्षं मासिक पाळीचं चक्र सांभाळण्याची कसरतही करावी लागते. वयाच्या साधारण 12-13व्या वर्षापासून साधारणपणे पन्नाशीपर्यंत शरीरात दर महिन्याला होणारे बदल अनुभवणं स्त्रियांना क्रमप्राप्त असतं. मासिक पाळीदरम्यान अनेकींना शारीरिक समस्या जाणवतात. त्यातली महत्त्वाची समस्या पोट फुगणे, गॅसेस ही असते. आहारतज्ज्ञांच्या मते, या समस्येसाठी आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होईल.
मासिक पाळीच्या आधीच्या लक्षणांमध्ये, तसंच पाळीदरम्यानही पोट फुगण्याची समस्या अनेकींना जाणवते. वजन वाढल्यासारखं वाटणं, पोटावर सूज आल्यासारखं वाटणं किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं अशा स्वरूपाची ही लक्षणं असतात. आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या मते, पाळीदरम्यान पोटफुगीची ही लक्षणं सामान्य असतात.
शरीरातल्या प्रोजेस्टेरोन आणि इस्ट्रोजेन संप्रेरकांच्या पातळीत झालेल्या बदलामुळे शरीरात पाणी आणि क्षार अधिक शोषले जातात. पेशींमध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळे पोट फुगल्यासारखं किंवा सूज आल्यासारखं वाटतं.
हे ही पाहा : विवाहित लोक विवाहबाह्य संबंधांत का अडकतात? ही आहेत ३ मोठी कारणं
हा त्रास कमी करण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थ आवर्जून घ्यावेत. त्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होईल.
केळी
कोणत्याही ऋतुत सहज उपलब्ध असणारं हे फळ बहुउपयोगी आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही ते उपयुक्त ठरतं. केळ्यात पोटॅशियम आणि बी 6 जीवनसत्त्व भरपूर असतं. त्यामुळे पाणी अधिक शोषलं जाणं, पोटफुगी, पेटके येणं या समस्या कमी होतात.
किडनीमधलं सोडियम शरीरातून बाहेर टाकण्यासाठी पोटॅशियमची मदत होते. शरीरातलं जास्तीचं सोडियम बाहेर गेल्यानं वाढलेला रक्तदाब कमी होतो आणि ब्लोटिंगही कमी होतं.
मेथी
पचनसंस्थेसाठी मेथी अत्यंत उपयुक्त असते. मेथीमधल्या काही संयुगांमुळे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक म्हणजेच पचनमार्ग मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे गॅसेस निघून जातात व ब्लोटिंग होत नाही.
ओवा आणि आलं
ओव्यातल्या थायमॉल या संयुगामुळे गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतं. त्यामुळे गॅसेस, पोटफुगीच्या समस्या दूर होतात. आल्यामध्ये अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म असल्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात.
गूळ
गुळामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असतं. तसंच सोडियमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे गूळ पोटफुगीची तक्रार दूर करण्यास उपयुक्त ठरू शकतो. शरीरातली आम्लाची पातळी योग्य राखण्यासही यामुळे मदत होते. पर्यायानं पोटफुगी, गॅसेस, पित्त या समस्या कमी होतात.
ज्या स्त्रियांना अशा समस्या जाणवतात, त्यांनी त्या काळात घरचं, साधं जेवण घ्यावं. मसालेदार, तेलकट पदार्थांनी या समस्या वाढू शकतात. ओवा, आलं, मेथी असे पदार्थ वरचेवर आहारात ठेवावेत. त्यामुळे ब्लोटिंग कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Period, Women