मुंबई, 30 मार्च : सध्याच्या काळातल्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा वाढत्या चिंता, वाढलेलं वजन किंवा चुकीच्या आहारामुळे आपल्या आरोग्याची हानी होते. इतर आजारांसोबतच हृदयासंबंधीचे विकारही (Heart Disease) वाढत आहेत; मात्र गंभीर स्वरूपाची लक्षणं आढळून आल्याशिवाय आपल्या हृदयाला काही त्रास आहे हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. छातीत त्रास होणं हेच केवळ हृदयविकाराचे लक्षण नसतं, तर अशा अनेक बाबी असतात, की ज्याद्वारे आपण आपलं हृदय सुदृढ आहे की नाही हे तपासू शकतो. हृदयविकाराशी संबंधित काही लक्षणांबद्दलची माहिती येथे देत आहोत. याबद्दल सविस्तर माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही नाइन हिंदी’ने प्रसिद्ध केलं आहे. देशात 18 टक्के मृत्यू हृदयाशी संबंधित विकारांमुळे होतात. त्यामुळे योग्य ती सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. टीव्ही 9 हिंदी च्या वृत्तानुसार मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर नवीन चंद्रा यांनी हृदयविकाराशी संबंधित काही लक्षणांची माहिती दिली आहे. आपल्याला हृदयाशी संबंधित काही आजार असल्यास छातीमध्ये वेदना (Cheast Pain) होतात. तसंच थकवा हेदेखील हृदय कमकुवत असल्याचं लक्षण आहे. कोणतीही शारीरिक कामं केल्यानंतर तुम्हाला जास्त थकवा जाणवत असेल किंवा तणाव जाणवत असेल तर हृदयाची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. शरीरामध्ये रक्ताची पातळी पुरेशी नसणं किंवा पुरेशी झोप न घेणं यांमुळेही थकवा जाणवू शकतो. सामान्यतः तणावाच्या वेळी आपल्या हृदयाचे ठोके (Heart Beat) वेगाने पडत असतात. परंतु अराम करतानादेखील हृदयाचे ठोके वेगाने पडत असतील, तर अपूर्ण झोप, अधिक काम किंवा कॅफिनचे अधिक प्रमाणात सेवन ही त्यामागची कारणं असू शकतात. अनेकदा रक्तनलिकांमध्ये आलेली सूजदेखील याचं कारण असू शकतं. हे वाचा - Food Poisoning: उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढतं; या गोष्टींची नीट खबरदारी घ्यायला हवी पायाला सूज येणं हेदेखील कमकुवत हृदयाचं लक्षण असू शकतं. पायाला सूज येते तेव्हा आपलं रक्त एका जागी जमा झालेलं असतं. कमकुवत हृदयामुळे खराब झालेलं रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जमा होतं. अशा वेळी अनेकदा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार हे रक्त पायांमध्ये जमा होतं आणि आपल्या पायाला सूज येते. श्वास घेण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे घोरण्याचा त्रास उद्भवू शकतो. यामुळे रक्तातली ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि हृदयाचे ठोके अनियमितपणे पडू लागतात. झोपेमध्ये व्यत्यय आल्यामुळेदेखील हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. अशी काही लक्षणं दिसली, तर घाबरून न जाता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. हे वाचा - जर तुम्हाला व्यायाम करायला आवडत नसेल तर तुमची मानसिकता बदलू शकते! हा आहे जालीम उपाय हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं. रात्रीचे 10 ही झोपण्याची योग्य वेळ आहे तर सकाळी 6 ही उठण्यासाठीची योग्य वेळ आहे. मध्यरात्री 2 ते 4 या वेळेत सर्वांत गाढ झोप लागते. त्यामुळे आपण योग्य वेळी झोपणं शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असते. परंतु वेळेवर न झोपता रात्री उशिरा झोपलात तर त्याचा दुसऱ्या दिवसाच्या दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. तसंच रात्री जेवणल्यानंतर लगेच झोपू नये. रात्रीचं जेवण आणि झोपेची वेळ यात किमान दीड ते दोन तासांचं अंतर असणं आवश्यक आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. त्याचप्रमाणे पचायला जड असणारे अन्न रात्री खाणं टाळावं. कारण रात्री आपल्या शरीराची हालचाल होत नाही. तसंच रात्री झोपताना कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजेच मोबाइल किंवा लॅपटॉप किंवा इतर उपकरणं वापरणं टाळावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.