मुंबई, 22 जुलै : कोरोना पुन्हा थैमान घालतो आहे. दिवसेंदिवस प्रकरणं वाढत आहेत. त्यात भारतात मंकीपॉक्सनेही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. अशात महाराष्ट्रावर आणखी एक संकट ओढावलं आहे. कोरोनासह राज्यात आणखी एका व्हायरसचा प्रकोप झाला आहे. हा व्हायरस म्हणजे H1N1 अर्थात स्वाईन फ्लू.
या वर्षात स्वाईन फ्लूच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 142 प्रकरणांची नोंद झाली. त्यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे दोन आठवड्यांतच स्वाईन फ्लूने 7 बळी घेतले आहेत. 10 जुलैला पालघरमध्ये स्वाईन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी गेल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर आता एकूण 7 मृत्यूंची नोंद झाली आहे.
स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुण्यात आहेत. त्यानंतर पालघर, नाशिक, कोल्हापूर, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नागपूर महापालिकेतही रुग्ण आढळले आहेत.
कोणत्या ठिकाणी किती रुग्ण
मुंबई - 43 रुग्ण
पुणे - 23 रुग्ण, 02 मृत्यू
पालघर - 22 रुग्ण
नाशिक - 17 रुग्ण
नागपूर महापालिका - 14 रुग्ण
कोल्हापूर - 14 रुग्ण, 03 मृत्यू
ठाणे महापालिका - 07 रुग्ण, 02 मृत्यू
कल्याण-डोंबिवली महापालिका - 02 रुग्ण
स्वाईन फ्लूची लक्षणे
याची लक्षणं सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
TOI च्या अहवालानुसार, स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत, जसं की Oseltamivir. डॉ वसंत नागवेकर, एक संसर्गजन्य रोग विशेषज्ञ आहेत. त्यांनी गेल्या काही आठवड्यात अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत, त्यांनी सांगितलं की , “हे औषध चांगलं कार्य करतं, यामुळे आजार जास्त गंभीर होण्यापासून रोखला जाऊ शकतो."
"गंभीर लक्षणे असलेल्यांनी आपल्याला कोरोना आहे, असं समजून जास्त काळ वाट पाहत बसू नये. ही लक्षणे असताना कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यास. स्वाईन फ्लूची टेस्ट करावी", असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Swine flu in india, Virus