मुंबई, 28 डिसेंबर : हिरव्या मिरच्या (Green Chillies) हा स्वयंपाकातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मिरच्या जास्त प्रमाणात खाणं प्रकृतीसाठी अत्यंत त्रासदायक असलं, तरी मर्यादित प्रमाणात मिरच्या आहारात असणं चवीसाठी आवश्यक असतं. तसंच, त्यातून शरीराला आवश्यक असलेले काही पोषक घटकही मिळतात. हिरव्या मिरच्या घालून खाद्यपदार्थ तयार करायचे म्हणजे त्या मिरच्या चिरण्याचं किंवा कापण्याचं काम करावंच लागतं.
हिरव्या मिरच्या चिरताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण मिरच्या चिरलेले हात चुकूनही शरीरावर, चेहऱ्याला किंवा डोळ्यांना लागले तरी प्रचंड जळजळ होते. त्यामुळे चिरण्याचं काम केल्यावर हातांची जळजळ होणं तर साहजिकच असतं. मिरच्या कमी तिखट असतील, तर असा त्रास होत नाही; मात्र मिरच्या झणझणीत असतील, तर हातांची जळजळ होतेच. काही वेळा तर ही जळजळ बराच वेळ राहते. जळजळीचा हा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. 'झी न्यूज'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.
हिरव्या मिरच्या चिरल्यानंतर हातांची जळजळ होत असेल, तर त्यावर लिंबाचा रस (Lemon) लावल्यास ही जळजळ कमी होऊ शकते.
त्याशिवाय कोरफड ही औषधी वनस्पतीदेखील मिरच्यांमुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. कोरफडीचा गर काढून तो हातांवर दोन मिनिटं लावून ठेवावा. कोरफडीत असलेल्या थंडाव्यामुळे जळजळ शांत होते. कोरफडीचं रोप घरी नसेल, तर विकत मिळणारी कोरफड जेल म्हणजेच Aloe Vera जेलदेखील लावू शकता.
मिरच्या चिरल्यानंतर हातांची जळजळ होत असल्यास ती थांबवण्यासाठी मधही (Honey) उपयुक्त ठरतो. मधामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे जळजळ होणाऱ्या हातांवर मध लावल्यास जळजळ कमी होते.
फ्रीजमधल्या बर्फाचे क्यूब्ज (Ice Cubes) हातावर लावल्यासदेखील जळजळ कमी होते. हे बर्फाचे क्यूब्ज हातावर थोडा वेळ चोळावेत. म्हणजे जळजळ शांत होते आणि आराम पडतो.
मिरच्यांमुळे होणारी जळजळ खूपच जास्त असेल, तर दूध, लोणी किंवा दही यांपैकी जो पदार्थ घरात उपलब्ध असेल, तो हातांना लावू शकतो. दूध, दही किंवा लोणी हातांना लावून दोन मिनिटं ठेवावं आणि नंतर पाण्याने हात धुवावेत. जळजळ शांत होते आणि आराम पडतो.
स्वयंपाकघरात वापरण्यासाठी मिळणारे विशेष हातमोजे अर्थात Kitchen Gloves वापरून मिरच्या चिरल्यास तळहातांची जळजळ होणारच नाही; मात्र हातमोजे घालून चिरणं सर्वांनाच सहज जमतं असं नाही. त्यासाठी प्रॅक्टिस करणं आवश्यक असतं आणि चिरणं काळजीपूर्वक असेल तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा ग्लोव्ह्ज फाटू शकतात. चिरण्यासाठी मिळणारं छोटं यंत्र वापरणं हा उपायही उत्तम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.