मुंबई, 04 ऑगस्ट : पावसाळ्यात कचरा, घाण, चिखल, पावसाळी दमट हवा यामुळे रोगराईचा धोका असतो. त्यात ढगाळ हवेमुळे डासांची (Mosquito) उत्पत्ती वाढते व डेंग्यू, मलेरियासारखे साथरोग फैलावतात. लहान मुलांना याचा प्रामुख्यानं प्रादुर्भाव होतो. कारण मुलं खेळण्यासाठी बाहेर जातात. बाग, मैदानं तसंच शाळा या ठिकाणी गर्दीत असतात. मुलांना डास बसलेला पट्कन कळत नाही. त्यामुळे मुलं या आजारांना पट्कन बळी पडतात. सध्या तर डेंग्यूची मोठी साथ पसरते आहे. डासांच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपायही (Home Remedies) करता येतात. डास चावल्यानं मलेरिया (Malaria), डेंग्यूसारखे (Dengue) आजार होतात. कधीकधी ते गंभीर स्वरूप धारण करतात. यामुळे रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळेच डासांची उत्पत्ती होऊ न देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर घरात डास येणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात डास घालवण्यासाठीचे घरगुती उपाय केलेच पाहिजेत. हे वाचा - औषधी गुणांनी परिपूर्ण आहे आलं; सर्दी-खोकलाच नाही तर या आजारांवरही अतिशय फायदेशीर डासांना घरातून घालवण्यासाठी मॉस्किटो लिक्विड, कॉईल, स्प्रे असे उपाय केले जातात. मात्र काही जणांना याची अॅलर्जी असते. अशावेळी कडुनिंबाचं तेल व कापूर एकत्र करून एका स्प्रेच्या बाटलीत ते मिश्रण भरा. कापूर पूर्ण विरघळला, की हा स्प्रे तमालपत्रांवर मारून ती पानं जाळून टाका. या धुरामुळे घरात एकही डास राहणार नाही. याचा शरीरावरही काही विपरित परिणाम होत नाही. खोबरेल तेल, लवंग तेल, नीलगिरी, पेपरमिंट तेल व कडुनिंबाचं तेल सारख्या प्रमाणात घेऊन एका बाटलीत एकत्र भरून ठेवा. रात्री झोपताना त्वचेला हे तेल लावल्यानं डास आजूबाजूला फिरकणार नाही. दुकानात उपलब्ध असलेल्या क्रिमपेक्षाही हा उपाय अधिक चांगला आहे. एका दिव्यामध्ये कडुनिंबाचं तेल (Neem Oil) घालून त्यात कापूर मिसळा. रात्री झोपताना हा दिवा तुमच्या खोलीत लावून ठेवा. यामुळे डास त्या खोलीत अजिबात येणार नाहीत. मात्र हा दिवा अंथरुणापासून लांब ठेवायला विसरू नका. हे वाचा - Cleaning Hack : प्रेसवर गंज आणि जळण्याची चिन्हे दिसतायत? या सोप्या घरगुती टिप्स वापरून करा स्वच्छ घरात झाडं असतील, तर त्यांच्या खालच्या ट्रेमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही. तसंच आपली सोसायटी, आपला परिसर स्वच्छ ठेवा, यामुळे कचरा व घाण साठणार नाही. पावसाळ्यात बाहेर जाताना हात-पाय झाकणारे पूर्ण कपडे घाला. यामुळे डास चावण्याचा धोका राहणार नाही. गर्दीच्या किंवा भरपूर झाडं असलेल्या ठिकाणी जाताना डासांपासून संरक्षणासाठी एखाद क्रीम किंवा तेल लावायला विसरू नका. संध्याकाळच्या वेळी दारं-खिडक्या लावून घेतल्यानं डास घरात येत नाहीत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणं हाही एक चांगला उपाय आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी डासांपासून सुटका झाली पाहिजे. त्यासाठी साधे व सोपे घरगुती उपाय करायला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.