मुंबई,16 ऑगस्ट : आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी (Vitamin D) असणं खूप महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डीच्या मदतीने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासल्यास हाडं ठिसूळ होतात, त्याचबरोबर मधुमेह, हायपरटेन्शनचा त्रास होतो. तसंच व्हिटॅमिन डीची कमतरता ही खराब मूड आणखी खराब करते. तसंच वर्तणूकही बिघडवते, यामुळे मेंदूचं आरोग्यही (Brain Health) बिघडू शकतं. व्हिटॅमिन डी हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी कमी असणं हे नैराश्याशी (Depression) संबंधित आहे आणि व्हिटॅमिन डी पूरक आहार घेतल्याने जगभरातील लोकांमध्ये नैराश्याची लक्षणं सुधारण्यास मदत होऊ शकते, असं अभ्यासातून समोर आलंय. ‘ओन्ली माय हेल्थ’ वेबसाईटने या संदर्भात वृत्त दिलंय. क्रिटिकल रिव्ह्युज इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या जर्नलमध्ये (Critical Reviews in Food Science and Nutrition) प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशनमुळे नैराश्य आणि चिंता असलेल्या प्रौढांमधील नैराश्याची लक्षणं दूर होऊ शकतात. शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय टीमने जगभरातील डझनभर संशोधन अभ्यासांचा मेटा-अॅनॅलिसिस केला. ( तुमच्या बाळाच्या डोळ्यांमध्ये काजळ घालताय? एकदा हे वाचाच! ) दरम्यान, सध्याच्या अँटिडिप्रेससर्सची उपचारात्मक परिणामकारकता नैराश्यावर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी किंवा नैराश्य दूर करण्यासाठी अपुरी आहे, असं दिसून येतं. दुसरीकडे, व्हिटॅमिन डी सेन्ट्रल नर्व्हस सिस्टम आणि त्याच्या कार्यांना रेग्युलेट करतं, असं मानलं जातं. नवीन मेटा-अॅनॅलिसीसमध्ये जगभरातील 41 अभ्यासांतील निष्कर्ष समाविष्ट करण्यात आले आहेत. या अभ्यासांनी जगभरातील वेगवेगळ्या मानवी समूहांमधील रँडम प्लासिबो-कंट्रोल ट्रायल्सद्वारे प्रौढांमधील नैराश्याची लक्षणं दूर करण्यासाठी व्हिटॅमिन डीच्या परिणामकारकतेची तपासणी केली आहे. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट हे नैराश्याचं लक्षण कमी करण्यासाठी प्लासिबोपेक्षा अधिक प्रभावी आहे, असं या अॅनॅलिसिससच्या परिणामांवरून असं दिसून आलंय. ( Smartphone Tips: स्मार्टफोन वापरताना कधीही करू नका या चुका; हातातच होईल ब्लास्ट ) “या मेटा-अॅनॅलिसिसची व्याप्ती व्यापक असली तरी, अभ्यास केलेल्या लोकसंख्येतील विषमतेमुळे आणि मोठ्या प्रमाणातील इतर अभ्यासांशी संबंधित पूर्वाग्रहाच्या जोखमीमुळे पुराव्यांची निश्चितता कमी राहते,” असं युनिव्हर्सिटी ऑफ ईस्टर्न फिनलँड (University of Eastern Finland) येथील क्लिनिकल मेडिसिन इन्स्टिट्युटमधील (Institute of Clinical Medicine) डॉक्टरल रिसर्चर आणि प्रमुख लेखक टुमास मिकोला (Tuomas Mikola ) यांनी म्हटलंय. मेटा-अॅनॅलिसिस हा त्यांच्या पीएचडी थिसिसचा भाग आहे. “आमच्या संशोधनातील हे निष्कर्ष डिप्रेशन असलेल्या रुग्णांमध्ये नवीन, हाय लेव्हल क्लिनिकल ट्रायल्सना प्रोत्साहन देतील, जेणेकरून नैराश्यावरील उपचार आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंटच्या (Vitamin D Supplementation ) संभाव्य भूमिकेवर अधिक प्रकाश टाकला जाईल,” असं मिकोला यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.