मुंबई, 28 डिसेंबर : कुठेही बसल्यावर सतत पाय हलवण्याची (Habit Of Shaking Legs) सवय अनेकांना असते. काही जण बसल्या बसल्या पाय हलवतात. काही जण झोपल्यावरदेखील पाय सारखे हलवत असतात. यावर घरातली ज्येष्ठ मंडळी नेहमी टोकतात. बसल्यावर सतत पाय हलवणं अशुभ असल्याचं म्हटलं जातं. पाय हलवल्याने कुटुंबाचा खर्च वाढतो, असा एक समज आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास आरोग्याच्या दृष्टीनेही ही सवय अत्यंत हानिकारक आहे. अशीच सतत पाय हलवण्याची सवय (Shaking Legs) असेल, तर आताच सावध व्हा. कारण, हे शरीरातल्या एका घटकाच्या कमतरतेचं एक लक्षण असू शकतं.
पाय हलवण्याची सवय असलेल्या व्यक्ती रेस्टलेस लेग सिंड्रोमने पीडित असू शकता. रेस्टलेस सिंड्रोम हा नर्व्हस सिस्टीम म्हणजेच मज्जासंस्थेशी निगडित असतो. अंदाजे सुमारे 10 टक्के व्यक्तींना पाय हलवण्याची सवय असते. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये पाय हलवण्याची समस्या पाहायला मिळते. पाय सतत हलवण्यामागे इतरही काही कारणं असू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणं योग्य ठरेल.
सतत पाय हलवल्यामुळे थेट कोणतेही नुकसान दिसत नाही; पण ही सवय शरीरातली लोहाची कमतरता दर्शवते. शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीरात लोह असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हालाही अशीच पाय हलवण्याची सवय असेल, तर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असू शकते. त्यामुळे डॉक्टरांशी जरूर चर्चा करावी.
डोपामाइन हॉर्मोनमुळेही सतत पाय हलवण्याची इच्छा होते. याचा संबंध स्लिप डिसऑर्डरशी जोडला जातो. या हॉर्मोनमुळे एक काम पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा होते. अनेकदा झोप पूर्ण न झाल्यानंतर व्यक्तीला थकवा जाणवतो. त्यामुळे याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.
शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. गर्भवती महिलांमध्ये प्रसूतीच्या शेवटच्या दिवसांत पाय हलवण्याची इच्छा होते. याचा धोका रक्तदाब, डायबेटीस आणि हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक असतो. या आजाराच्या उपचारासाठी सामान्यतः लोह वाढण्यासाठी गोळ्या लिहून दिल्या जातात. आजार गंभीर पातळीवर असेल तर इतर औषधंही दिली जातात. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला अशी सवय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.