मुंबई, 27 एप्रिल : डायबेटिस (Diabetes) अर्थात मधुमेह हा गुंतागुंताचा आणि चिवट आजार समजला जातो. जगभरात डायबेटिस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डायबेटिस असलेल्या रुग्णाला ब्लड शुगर पातळी (Blood Sugar Level) नियंत्रणात राहण्यासाठी आहाराची (Diet) विशेष काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे लठ्ठपणाची समस्या असेल तर वजन नियंत्रणासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. डायबेटिस रुग्णांनी रोजच्या आहारात भात (Rice) खाऊ नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ आणि डाएटिशियन देत असतात. मात्र या अनुषंगाने करण्यात आलेल्या संशोधनातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. डायबेटिस असलेल्या रुग्णांनी ताजा भात खाण्याऐवजी थंड केलेला भात खाल्ल्यास ब्लड शुगर पातळी वाढत नाही, असं या संशोधनातून समोर आलं आहे. डायबेटिस हा एक गंभीर आजार आहे. डायबेटिसचे सर्वसामान्यपणे डायबेटिस टाइप-1 आणि डायबेटिस टाइप -2 असे दोन प्रकार असतात. डायबेटिस टाइप-1 मध्ये पॅनक्रियामध्ये इन्शुलिनची (Insulin) निर्मिती अजिबात होत नाही. तर डायबेटिस टाइप-2 मध्ये पॅनक्रियामध्ये अत्यल्प प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती होते. त्यामुळे अशा रुग्णांना आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागतं. भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचं (Carbs) प्रमाण अधिक असल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते. त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांना भात खाण्यास डॉक्टर मनाई करतात. याबाबत 2015 मध्ये एक संशोधन केलं गेलं. या संशोधनात ज्यांना डायबेटिस नाही, अशा लोकांचा समावेश करण्यात आला. थंड केलेला भात (Cold Rice) खाल्ल्यानं ब्लड शुगर पातळी नियंत्रणात राहते, असं यातून दिसून आलं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, थंड भाताचं सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. डायबेटिसच्या रुग्णांसाठी हा भात उत्तम पर्याय ठरतो. तसेच यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटणं, शरीरातील ऊर्जा कायम ठेवणं आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी तसेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवू इच्छित असाल तर रेझिस्टंट स्टार्च (Resistant starch) तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात, याबद्दल ‘आज तक’ने माहिती दिली आहे. ( Corona महामारीच्या काळातही ग्लोबल टेक कंपन्यांचे हे CEO बनले श्रीमंत ) न्युट्रिशन अँड डायबेटिस मासिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, डायबेटिसच्या रुग्णांनी ताजा भात (Fresh Rice) खाण्याऐवजी थंड केलेला भात खाल्ल्यास त्यांची ब्लड शुगर पातळी नियंत्रणात ठेवता येते. पॉज्नान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधील पोलिश (Polish) संशोधकांच्या एका समूहाने डायबेटिस टाइप-1 असलेल्या 32 रुग्णांचा अभ्यास केला. संशोधनादरम्यान या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचं जेवण देण्यात आलं. या पथकानं रुग्णांची जेवणापूर्वी असलेल्या ब्लड शुगर पातळीची तुलना केली. या रुग्णांना दोन्ही वेळच्या जेवणात लॉंग ग्रेन व्हाईट राईस (Long Grain White Rice) देण्यात आला. या भातात 46 ग्रॅम कार्बोहायड्रेट होतं. हा गरम भात रुग्णांना खाण्यासाठी दिला गेला. त्यानंतर काही भात 24 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवण्यात आला. हा भात दुसऱ्या दिवशी गरम करुन रुग्णांना खाण्यासाठी दिला गेला. जेव्हा रुग्णांनी थंड केलेला भात खाल्ला त्यानंतर त्यांची ब्लड शुगर पातळी बऱ्याच अंशी स्थिर असल्याचं दिसून आलं. रुग्णांना ताजा गरम भात खाण्यासाठी दिल्यानंतर त्यांची ब्लड शुगर पातळी वेगानं वाढलेली दिसली. दुसरीकडे 24 तास फ्रिजमध्ये ठेवलेला भात खाल्ल्यानंतर रुग्णांची शुगर पातळी हळूहळू वाढत असल्याचं दिसून आलं, असं संशोधकांनी स्पष्ट केलं. ( सई लोकुरने शेअर केले असे PHOTO की सोबत चाहत्यांसाठी जारी केला Alert ) आहारात भातासारख्या थंड कार्ब्सचा समावेश करुन रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते, असं संशोधनातील निष्कर्षांतून स्पष्ट झालं. ताज्या भाताच्या तुलनेत थंड केलेल्या भातामध्ये रेझिस्टंट स्टार्च मुबलक असतं. रेझिस्टंट स्टार्च पचण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे हा स्टार्च फायबरप्रमाणे (Fiber) ब्लड शुगर पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो, असं या संशोधनातून संशोधकांना दिसून आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







