आजची धकाधकीची जीवनशैली आणि आहारामध्ये झालेले बदल यामुळे कित्येकांना बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या जाणवू लागली आहे. फास्ट फूड, मांस, फ्रोजन मील अशा कित्येक गोष्टींचं अती सेवन केल्यामुळे अनेकांना ही समस्या दिसू लागली आहे. यापासून सुटका होण्यासाठी कित्येक जण चूर्ण किंवा गोळ्यांचा आधार घेतात; मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये या गोष्टी केवळ सुरुवातीला काम करतात. काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीची मदत न घेता बद्धकोष्ठता दूर करण्याचा उपाय (Tips to cure Constipation) येथे सांगत आहोत. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बद्धकोष्ठतेवर वेळीच उपाय गरजेचा बद्धकोष्ठता (Constipation symptoms) झाल्याचं सर्वांत पहिलं लक्षण म्हणजे शौचास साफ न होणं. सोबतच, कमी वेळा शौचास होणे आणि प्रातर्विधी करताना अडचण येणं. तसं तर ही समस्या सुरुवातीला तेवढी मोठी वाटत नाही. मात्र कालांतराने त्याचं प्रमाण वाढल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. बद्धकोष्ठतेवर वेळीच उपाय न केल्यास मूळव्याध, गुदद्वाराजवळ वेदना होणं आणि मलविसर्जन करताना रक्त येणं अशा समस्या (Effects of long term Constipation) उद्भवू शकतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. आहारातच दडलाय उपाय पोटाच्या समस्येसाठीचा उपाय खरं तर आहारातच दडला आहे. तुम्हाला असा डाएट प्लान (Constipation Diet Plan) सांगत आहोत, जो फॉलो केल्यास तुम्ही बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवू शकाल. डाएटिशिअन मनप्रीत कार्ला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा प्लॅन सांगितला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या गोष्टी खाव्यात याची सविस्तर माहिती या डाएट प्लॅनमध्ये (Diet Plan to cure Constipation) देण्यात आली आहे. ( वर्क फ्रॉम होममुळे पॉर्न पाहण्याचं वाढलं व्यसन; वेळ वाचला मात्र मानसिक आरोग्य धोक्यात ) सकाळच्या वेळी घ्या असा आहार रात्री झोपताना तुळशीच्या बिया, पाच बदाम, एक अक्रोड आणि तीन काळ्या मनुका पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा एक चमचा या बिया खा. त्यानंतर काही वेळाने रात्रभर भिजवलेली इतर ड्रायफ्रूट्स खा. नाश्त्यामध्ये अंजीर आणि खजूर स्मूदी घ्या. ही स्मूदी तयार करण्यासाठी तुम्हाला दोन अंजीर, दोन खजूर, 1/4 कप ओट्स, 3/4 कप दूध, एक चिमूट जायफळ आणि एक टीस्पून शिया सीड्स यांची गरज भासेल. हे सगळं एकत्र करून, त्यांची स्मूदी बनवून प्या. दुपारच्या जेवणाआधी फळं खा सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान एक बाउल भरून पपई खा. त्यानंतर दुपारच्या जेवणापूर्वी एक ग्लास ताक आणि अर्धा टीस्पून अंबाडीच्या बिया खा. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही नाचणीची भाकरी, हिरवी मूग डाळ हे पदार्थ खाऊ शकता. दुपारचं जेवण साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास घ्यावं. संध्याकाळचा नाश्ता महत्त्वाचा दुपारचं जेवण लवकर झाल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी भूक लागेल. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खाण्यासाठी मनप्रीत यांनी एक स्पेशल डिश सांगितली आहे. ही डिश बनवण्यासाठी तुम्हाला हंग-कर्ड (Hung Curd) किंवा दही, दोन काकड्या, एक मिरची, किसलेलं अर्धं बीट, लसणाच्या चार पाकळ्या आणि कोथिंबीर या पदार्थांची गरज आहे. हे सर्व पदार्थ एकत्र करून, तयार होणारी डिश तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता. रात्री लवकर जेवा रात्रीचं जेवण संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जेवावं. जेवणापूर्वी कोमट पाण्यासोबत एक टीस्पून सायलियम हस्क (Psyllium Husk) प्यावं. सायलियम हस्कची पावडर तुम्हाला कोणत्याही डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मिळू शकेल. संध्याकाळच्या जेवणात तुम्ही भरपूर भाज्या घातलेला पुलाव खाऊ शकता. यानंतर रात्री झोपताना दूध प्यावं. अर्धा चमचा शुद्ध तूप, चिमूटभर काळी मिरी, चिमूटभर दालचिनी हे पदार्थ घातलेलं A2 दूध झोपण्यापूर्वी प्यावं. सोबतच झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीसाठी तुळशीच्या बिया आणि ड्रायफ्रूट्स आठवणीने भिजत घालावेत. इतरही काही उपाय बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुम्ही या डाएट प्लॅनचा वापर करू शकता. हा डाएट प्लॅन लगेच अंमलात आणणे शक्य नसल्यास, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात (Tips to cure Constipation) करू शकता. तुमच्या आहारातलं जंक फूड, चिप्स, मांस, फ्रोजन मील्स यांचं प्रमाण कमी करणं, आहारात फळांचा आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश वाढवणं अशा छोट्या-छोट्या गोष्टींच्या साह्यानेही तुम्ही बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवू शकता. सोबतच, नियमित व्यायाम करणं, तणाव कमी करणं आणि एक सक्रिय जीवनशैली या गोष्टीही बद्धकोष्ठता दूर करण्यास फायद्याच्या ठरतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.