देशात सध्या दोन कोरोना लशी (corona vaccine) दिल्या जात आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टि्टयूटची कोविशिल्ड (covishield) आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन (covaxin). पंतप्रधान मोदींनी कोवॅक्सिन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. दरम्यान आपल्याला आपल्या पसंतीची लस घेता येईल का? असा प्रश्न उपस्थित होतो
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता आजपासून इतर नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. 60 पेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाचे इतर आजार असलेल्या व्यक्तींना ही लस दिली जाते आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील लस घेतली. उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही कोरोना लस दिली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील आजी आणि माजी न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबांना उद्या सरकारी केंद्रांमध्ये कोरोना लस दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना दोन कोरोना लशींपैकी त्यांना हवी असलेली लस घेता येईल, असं सांगितलं जातं होतं. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं माहिती दिली आहे.
न्यायाधीशांना दोन कोरोना लशींपैकी एखादी लस निवडता येणार नाही. लसीकरण Co-Win प्रणालीच्या माध्यमातूनच होत आहे. सुप्रीम कोर्टाजवळील सरकारी केंद्रात ही लस दिली जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे हे स्पष्ट आहे की, तुम्हाला कोव्हिशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीपैकी एखादी विशिष्ट लस घ्यायची असल्यास तुम्हाला ती घेता येणार नाही. तर कोविन प्रणालीच्या माध्यमातूनच उपलब्ध झालेली लस तुम्हाला मिळेल.