नवी दिल्ली, 28 डिसेंबर : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारी पसरलेली आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूचे विविध व्हेरियंट सापडले आहेत. या व्हेरियंट्समुळे कोट्वधी लोकांना कोरोनाची लागण झालेली असून, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यानच्या काळात ओमिक्रॉननंतर कोरोना महामारीचा शेवट होईल, अशी खात्री होताना दिसत होती. ज्या देशामधून कोरोनाला सुरुवात झाली होती, त्याच चीनपासून पुन्हा जगाला कोरोनाचा धोका आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनामुळे सध्या चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोविडशी संबंधित खरा डेटा आणि माहिती लपवण्याचा चीन पुरेपूर प्रयत्न करत आहे. गेल्या सहा दिवसांपासून तेथे कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही, असा दावा चीननं केला आहे. पण, चीनमधील जे व्हिडिओ समोर येत आहेत ते खऱ्या परिस्थितीचा अंदाज लावण्यास पुरेसे आहेत. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : सस्पेन्स वाढला, रत्नागिरीतला तो मृत्यू कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा? RTPCR ची येणार मोठी अपडेट
मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी चीनमधील शांघाय शहराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शांघायमधील रुग्णालयात मृतदेहांचे ढीग दिसत आहेत. त्यांच्या मते हा व्हिडिओ 24 डिसेंबरचा आहे. शांघाय शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शांघायच्या स्मशानभूमीत कर्मचारी भरती सुरू आहे. जे लोक मृतदेह उचलू शकतात ते या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्या या नोकरीसाठी प्राधान्यानं विचार केला जाईल, अशी एक जाहिरात जेनिफर यांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे.
जेनिफर यांनी अनशान शहराचादेखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. चीनमधील स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचा खच पडल्याचं यामध्ये दिसत आहे. अंत्यसंस्कारासाठी खूप मोठी वेटिंग लिस्ट लागलेली आहे. कोरोनामुळे सतत होत असलेल्या मृत्यूंमुळे स्मशानांच्या पार्किंगमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ आली आहे.
माहिती लपवण्याचा प्रयत्न
कोरोनाशी संबंधित मृत्यूची आकडेवारी जगासमोर येऊ नये, यासाठी चीन जोरदार प्रयत्न करत आहे. फॉर्मवर स्वाक्षरी करूनच नागरिकांना रुग्णालयातून त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह दिले जात आहेत. त्यांच्या नातेवाईकांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचं लेखी द्यावं लागत आहे. शिवाय, हा दावा चुकीचा दावा असेल तर त्याला मीच जबाबदार आहे, असंही लिहून द्यावं लागत आहे.
या दरम्यान बीजिंगमधील स्मशानभूमीला पाठवलेल्या नोटिशीची प्रत समोर आली आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की, स्मशानातील कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही माध्यम संस्थेला मुलाखत देण्याची परवानगी नाही. कोणताही डेटा शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
चीननं निर्बंध हटवले
चीनमध्ये कोरोनामुळे होत असलेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. चीनने 8 जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. एवढंच नाही तर चीन आपल्या आंतरराष्ट्रीय सीमाही उघडणार आहे. 2020 नंतर सुमारे तीन वर्षांनी चीनमध्ये आंतरराष्ट्रीय विलगीकरणाच्या नियमांतून सूट मिळणार आहे. चीननं याच महिन्यात (डिसेंबर) वादग्रस्त शून्य कोविड धोरण मागे घेण्याची घोषणा केली होती. याला मोठा विरोध झाला होता. चीनमधील शून्य कोविड धोरण मागे घेतल्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
हे ही वाचा : ‘ही फक्त सुरुवात! कोरोनाची नवी लाट जगभरात कहर करणार आणि लाखो लोकांचा..’, शास्त्रज्ञांचा दावा
20 दिवसांत 25 कोटी रुग्ण
चीनमध्ये कोरोनानं हाहाकार माजवला आहे. येथे गेल्या 20 दिवसांत 25 कोटी (250 दशलक्ष) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सरकारी कागदपत्रं लीक झाल्यानंतर हा खुलासा झाला आहे. रेडिओ फ्री एशियानं सोशल मीडियावर फिरत असलेल्या कागदपत्रांचा हवाला देत म्हटलं आहे की, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘झिरो-कोविड पॉलिसी’मध्ये सूट दिल्यानंतर परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 20 दिवसात संपूर्ण चीनमध्ये सुमारे 250 दशलक्ष लोक कोविड-19 मुळे प्रभावित झाले आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकीत कोरोना संसर्गाशी संबंधित डेटा सादर करण्यात आला. ही बैठक केवळ 20 मिनिटे चालली आणि आता त्याच बैठकीतील कागदपत्रे लीक झाली आहेत. त्यातील आकडेवारीनुसार, 1 ते 20 डिसेंबर दरम्यान, 248 दशलक्ष लोकांना कोविड-19 ची लागण झाली. ही संख्या चीनच्या एकूण लोकसंख्येच्या 17.65 टक्के इतकी आहे.
चीनमधील एकूण परिस्थिती बघता भारतानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारनंदेखील नागरिकांना कोविड संबंधित नियम पाळण्याची विनंती केली आहे.