कोरोना महामारीनंतर साथीच्या रोगांनी जणू पाठच धरली आहे. तब्बल दोन वर्षं जगाला कोरोनानं पछाडलं होतं. त्यातच आता मंकीपॉक्स आणि टोमॅटो फ्लू (Tomato Flu) हे साथीचे आजार आले आहेत. केरळ, तमिळनाडू, हरियाणा आणि ओडिशा या राज्यांमध्ये टोमॅटो फ्लूचे काही रुग्ण आढळले आहेत. कोरोना श्वसन यंत्रणेशी निगडित आहे. मंकीपॉक्स लैंगिक संबंधांमुळेही होऊ शकतो, असं म्हटलं जातं. टोमॅटो फ्लू रुग्णाला हात लावल्यानंही पसरू शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Center Issued Guidelines) टोमॅटो फ्लूबाबत मंगळवारी (23 August) काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. टोमॅटो फ्लू प्रामुख्यानं लहान मुलांमध्ये होतो. त्यामुळेच मुलांची अंगठा चोखण्याची सवय घातक (Thumb Sucking Can Be Cause Of Tomato Flu) ठरू शकते. ‘हेल्थशॉट्स डॉट कॉम’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अंगठा चोखल्यामुळे पसरू शकतो टोमॅटो फ्लू टोमॅटो फ्लू कॉक्ससॅकीव्हायरस A-6 आणि A-16 या विषाणूमुळे होतो. हा हात-पाय-तोंड (Hand, Foot And Mouth Disease) यांच्याशी संबंधित आजार आहे. यामुळे तोंडात व हाता-पायांवर फोड येतात. कफ किंवा लाळेवाटे थेट संपर्कात येणाऱ्यांना हा आजार होण्याची जास्त भीती असते. हा आजार पसरलेल्या राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काही मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली आहेत. त्यानुसार या रुग्णांचं 5-7 दिवसांचं विलगीकरण केलं पाहिजे. या रुग्णांना स्पर्श टाळला पाहिजे. स्वच्छता ठेवली पाहिजे. तसंच मुलांना अंगठा चोखण्यापासून रोखलं पाहिजे असं यात म्हटलंय. ( तुमच्याही डोळ्यांखाली सूज आहे का? दूर करण्यासाठी करा हे उपाय ) टोमॅटो फ्लूची लक्षणं या आजारामुळे अंगावर टोमॅटोसारख्या लालसर गोल पुळ्या येतात. ताप, सांधेदुखी, डायरिया ही याची प्रमुख लक्षणं आहेत. त्याशिवाय डीहायड्रेशन, उलट्या, थकवाही येऊ शकतो. घसा खवखवणं, अस्वस्थता, भूक मंदावणं हेही काहीवेळा होतं. हा व्हायरस 10 दिवसांत आपोआपच नष्ट होतो; मात्र टोमॅटो फ्लू झाल्यानंतर चिकनगुनिया किंवा डेंग्यू होण्याचा धोका वाढतो. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये या आजारामुळे डोळे लाल होतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना हा आजार होऊ शकतो. मेंदूच्या इन्फेक्शनचा धोका टोमॅटो फ्लूच्या संसर्गामुळे एन्सेफेलायटिस अर्थात मेंदूमध्ये इन्फेक्शन (Brain Infection) होण्याचा धोका असतो. बहुतांश रुग्णांमध्ये हा आजार आपोआपच बरा होतो. काही रुग्णांमध्ये चेतासंस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. टोमॅटो फ्लूचं पुरळ जीभ, हिरड्या, गालाच्या आत, हाताचे तळवे किंवा काही वेळा नखांच्या खालीही येतं. टोमॅटो फ्लूपेक्षा मंकीपॉक्सचे फोड जास्त मोठे व खोल असतात. मंकीपॉक्समध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर फोड येतात. मंकीपॉक्सप्रमाणे यावर विशिष्ट उपचार नाहीत. लक्षणांनुसार यावर औषध दिलं जातं. लाळेद्वारे हा आजार पसरू शकण्याचा धोका असल्यामुळे मुलांचं अंगठा चोखणं धोकादायक ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.