नवी दिल्ली, 14 जानेवारी : रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. रक्तदानाच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात. एखाद्या अपघातात जखमी व्यक्तीच्या शरीरातून प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव झाला किंवा एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया होणार असेल किंवा गंभीर आजार असेल अशा रुग्णाला रक्ताची गरज पडते. अशा वेळी संबंधित रुग्णाला त्याच्या रक्तगटाचं रक्त दिलं जातं. वेळेत योग्य रक्तगटाचं रक्त मिळालं नाही तर प्रसंगी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. माणसांच्या बाबतीत घडणाऱ्या अशा गोष्टी प्राण्यांच्या बाबतीत घडतात का? त्यांना कधी रक्ताची गरज पडते का? प्राण्यांसाठी रक्तपेढी असते का, असे अनेक प्रश्न तुम्हाला कधी तरी पडले असतील. जगातल्या अनेक देशांमध्ये पेट्स ब्लड बँक अर्थात पाळीव प्राण्यांची रक्तपेढी आहे. या ब्लड बँकांमधून प्रामुख्याने कुत्रे आणि मांजरांसाठी रक्त मिळतं. प्राण्यांच्या रक्तपेढीविषयी सविस्तर जाणून घेऊया. आपण माणसांसाठीच्या रक्तपेढ्यांविषयी ऐकलेलं असतं; पण पाळीव प्राण्यांच्या रक्तपेढीविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. जगातल्या अनेक देशांमध्ये पेट्स ब्लड बँक आहेत. प्रामुख्याने कुत्रे किंवा मांजरं हे प्राणी पाळले जातात. त्यामुळे या ब्लड बँकांमध्ये कुत्रे आणि मांजरांसाठी रक्त मिळतं. कुत्रा किंवा मांजराला रक्ताची गरज भासली तर त्यांच्यासाठी या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्ताची तरतूद केली जाते. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण कुत्रे आणि मांजरांचेही वेगवेगळे रक्तगट असतात. कुत्र्यांमध्ये 12 वेगवेगळे रक्तगट असतात तर मांजरांमध्ये तीन वेगवेगळे रक्तगट असतात. हे वाचा - Blood Donation: मदतच नव्हे तर रक्तदान आपल्या आरोग्यासाठीही उत्तम, जाणून घ्या 5 मोठे फायदे भारताविषयी बोलायचं झालं तर आपल्या देशात प्राण्यांसाठी एक स्वतंत्र रक्तपेढी आहे. तनुवास पशू ब्लड बँक असं या रक्तपेढीचं नाव असून, ती तमिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. चेन्नईच्या मद्रास पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापन रुग्णालयाच्या क्लिनिक विभागांतर्गत ही रक्तपेढी कार्यरत आहे. एबीपीच्या वृत्ता नुसार प्राण्यांच्या रक्तपेढ्यांविषयी उत्तर अमेरिकेतल्या पशुचिकित्सा ब्लड बँकेचे प्रभारी डॉक्टर के. सी. मिल्स यांनी माहिती दिली. ते म्हणाले, `कॅलिफोर्नियातल्या डिक्सन आणि गार्डन ग्रोव्ह शहरासह मिशिगनमधील व्हर्जिनिया, स्टॉकब्रिज, ब्रिस्टो आणि मेरीलँडमधील अॅनापोलिस शहरांसह उत्तर अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये प्राण्यांच्या रक्तपेढ्या अस्तित्वात आहेत. नागरिक वेळोवेळी आपल्या पाळीव प्राण्यांना येथे घेऊन जातात आणि त्यांना रक्तदान करायला लावतात. प्राण्यांच्या रक्तदानाच्या प्रक्रियेला सुमारे अर्धा तास लागतो. प्राण्यांच्या रक्तदान प्रक्रियेतली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यासाठी भूल देण्याची गरज नसते.` हे वाचा - फक्त 45 लोकांच्या शरीरात सापडतं हे रक्त? प्रत्येक थेंब सोन्यापेक्षा महाग ज्या ठिकाणी प्राण्यांसाठी रक्तपेढ्या नाहीत, अशा ठिकाणी रक्त आणि प्लाझ्मा दान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. एका वृत्तानुसार, ब्रिटन आणि अमेरिकेतले बहुतांश नागरिक प्राण्यांच्या रक्तदानाविषयी खूप जागरूक आहेत. इतर देशांमध्ये प्राण्यांच्या रक्तदानाविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.