मुंबई, 15 डिसेंबर : सुमारे 6 हजार वर्षांपासून प्रचलित असलेल्या नैसर्गिक उपचारांच्या अभ्यासात अर्थात आयुर्वेदात (Ayurveda) अनेक औषधी वनस्पतींची (Medicinal herb) आणि त्यांच्यापासून बनवण्यात येणाऱ्या विविध औषधांची माहिती आहे. त्यातील प्रमुख वनौषधींमध्ये अश्वगंधा (Ashwagandha) या वनस्पतीचा समावेश होतो. हजारो वर्षांपासून अश्वगंधाची मुळं आणि नारिंगी-लाल फळांचा उपयोग अनेक वैद्यकीय उपचारांसाठी केला जात आहे. 'अश्वगंधा' हा संस्कृत शब्द असून, याचा अर्थ 'घोडा' आणि 'वास' (Horse and smell) असा आहे. या औषधी वनस्पतींचा सुगंध आणि त्यातून मिळणारी शक्ती असा अर्थ यातून दर्शवला जातो. ही वनस्पती फक्त आपले शारीरिक रोग बरे करत नाही, तर मानसिक आरोग्यदेखील (Mental health) सुधारते. अश्वगंधाच्या काही बहुमोल फायद्यांबाबत जाणून घेऊ या...
रक्तातली साखर आणि चरबी कमी करते :
आजकाल मधुमेह, कोलेस्टरॉल हे आजार सर्वसामान्य झाले आहेत. अश्वगंधामध्ये इन्सुलिन स्राव (Insulin secretion) वाढवण्याची आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्याची क्षमता आहे. यामुळे रक्तातल्या साखरेची (Blood Sugar) पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहग्रस्तांना अश्वगंधाचा चांगला फायदा होतो. अश्वगंधाच्या वापराने रक्तातलं ग्लुकोज आणि लिपिडची पातळी कमी होत असल्याचं काही क्लिनिकल अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. 2000 मध्ये झालेल्या एका संशोधनात अश्वगंधाच्या रक्तातली साखर कमी करणाऱ्या गुणधर्मांची तुलना टाइप 2 मधुमेहाच्या (Type 2 Diabetes) औषधांशी करण्यात आली आहे. यावरून मधुमेहावर अश्वगंधा किती लाभदायक ठरू शकते याचा अंदाज येतो.
मानसिक तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त :
अश्वगंधा ताण-तणाव (Stress) दूर करण्यासाठीही अत्यंत प्रभावी आहे. ताणतणाव आणि अती चिंता करणाऱ्या व्यक्तींसाठी अश्वगंधा अतिशय गुणकारी ठरत असल्याचं अनेक अभ्यासांमधून स्पष्ट झालं आहे. फायटोमेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात अश्वगंधाच्या अँटीडिप्रेसंट (Antidepressant) गुणधर्मांचा शोध घेण्यात आला. नैराश्यग्रस्त (Depressed) व्यक्तींमध्ये अश्वगंधाचा वापर केल्यानंतर अतिशय आशादायक परिणाम दिसून आले.
एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते :
अश्वगंधामुळे आकलन (Cognition), स्मरणशक्ती (Memory) आणि सूचनेनुसार गतिमान हालचाली करण्याची क्षमता (Motor responses following instruction) सुधारण्याला मदत मिळते. प्लासीबोच्या (Placebo) तुलनेत अश्वगंधा आकलन कमतरता आणि मानसिक आजारांमुळे स्नायूंवर होणाऱ्या परिणामांमध्ये अधिक प्रभावी ठरत असल्याचं अनेक अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. 2017 मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये (National Library of Medicine) प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अश्वगंधामुळे चित्त एकाग्र होण्याची, तसंच अनुकरण करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती वाढते.
हृदयाचं आरोग्य सुधारतं :
'इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुर्वेद'मध्ये (International Journal of Ayurveda) प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अश्वगंधामुळे ऑक्सिजनची (Oxygen) कमाल पातळी म्हणजे VO2 तिच्या पूर्ण क्षमतेपर्यंत वाढू शकते. अधिक शारीरिक श्रम घेत असताना या पातळीपर्यंत ऑक्सिजन घेतला जातो. हृदयाच्या क्षमतेची तपासणी करताना किंवा शारीरिक श्रम करताना हृदय आणि फुफ्फुसं स्नायूंना किती चांगल्या प्रकारे ऑक्सिजन पुरवतात याचं मूल्यांकन करण्यासाठी ही ऑक्सिजन पातळी ग्राह्य धरली जाते. ऑक्सिजनची ही पातळी विशिष्ट परिस्थितीतदेखील तुमचं हृदय निरोगी (Healthy Heart) असल्याचा पुरावा देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.