मराठी बातम्या /बातम्या /heatlh /'इरेक्टाइल डिस्फंक्शन'ची समस्या, हे 5 घरगुती उपाय ठरतील प्रभावी!

'इरेक्टाइल डिस्फंक्शन'ची समस्या, हे 5 घरगुती उपाय ठरतील प्रभावी!

शारीरिक संबंधांवेळी पुरुषाच्या लिंगामध्ये पुरेशी ताठरता न येणं आणि ती टिकून न राहणं या समस्येला इरेक्टाइल डिस्फंक्शन (Erectile Dysfunction) असं म्हटलं जातं.

शारीरिक संबंधांवेळी पुरुषाच्या लिंगामध्ये पुरेशी ताठरता न येणं आणि ती टिकून न राहणं या समस्येला इरेक्टाइल डिस्फंक्शन (Erectile Dysfunction) असं म्हटलं जातं.

शारीरिक संबंधांवेळी पुरुषाच्या लिंगामध्ये पुरेशी ताठरता न येणं आणि ती टिकून न राहणं या समस्येला इरेक्टाइल डिस्फंक्शन (Erectile Dysfunction) असं म्हटलं जातं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 3 फेब्रुवारी : शारीरिक संबंधांवेळी पुरुषाच्या लिंगामध्ये पुरेशी ताठरता न येणं आणि ती टिकून न राहणं या समस्येला इरेक्टाइल डिस्फंक्शन (Erectile Dysfunction) असं म्हटलं जातं. अनेकदा ही समस्या ओळखणं गुंतागुंतीचं असतं. कारण बऱ्याच केसेसमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शन हे मोठ्या आणि छुप्या समस्यांचं लक्षण असू शकतं. कोणत्याही वयात इरेक्टाइल डिस्फंक्शन हे नॉर्मल समजलं जात नाही. त्याच्या जोडीला आणखीही काही समस्या असू शकतात. त्यामुळे लैंगिक क्रियांवर प्रतिबंध येऊ शकतो. लैंगिक संबंधांची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे ऑरगॅझम आणि वीर्यस्खलनातही समस्या निर्माण होऊ शकतात.

  ही समस्या पुरुषांसाठी खूपच त्रासदायक आणि अपमानकारक असते. तो विषय चर्चेचा मानला जात नसल्याने त्यावर वैद्यकीय मदत घेण्यास अनेकांना संकोच वाटतो. ही समस्या असलेल्या पुरुषांना डिप्रेशन येऊ शकतं, त्यांना समाधान मिळत नाही. या समस्येमुळे नातेसंबंधांवर, तसंच वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात. इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्या अनेकदा रक्तप्रवाहामधल्या समस्यांशी निगडित असते. ही समस्या असलेल्या पुरुषांसाठी त्यांच्या जोडीदाराशी याबद्दल खुलेपणाने चर्चा करणं अनेकदा कठीण असतं; मात्र ही समस्या जितकी समजली जाते तितकी दुर्मीळ नाही. त्यामुळे ही समस्या असलेल्यांनी डॉक्टरांशी बोलण्याचा नक्की विचार करावा, जेणेकरून ते लक्षणांच्या आधारे योग्य निदान करू शकतील.

  रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं असल्यास इरेक्टाइल डिस्फंक्शन या समस्येला प्रतिबंध करण्यास, तसंच त्यावर उपचार करण्यासही मदत होऊ शकते. जीवनशैलीमध्ये काही बदल/सुधारणा केल्यास ते करता येऊ शकतं. त्याबद्दल माहितीसाठी वैद्यकीय मदत घेणं सर्वांत उत्तम. काही पारंपरिक घरगुती उपायही या समस्येवर मात करण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्यांची माहिती घेऊ या.

  व्यायाम : शरीर आणि मन आरोग्यपूर्ण राखण्यासाठी शारीरिक व्यायाम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सहा महिने दर आठवड्याला चार दिवस मध्यम ते तीव्र स्वरूपाचा एरोबिक एक्सरसाइज केल्यास इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या कमी व्हायला मदत होऊ शकते. पोहणं, वेगाने चालणं, सायकलिंग, धावणं या किंवा अशा कोणत्याही प्रकारचा एरोबिक एक्सरसाइज करू शकता.

  संतुलित आहार : आहार संतुलित असेल, तर इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या कमी व्हायला मदत होऊ शकते. ही समस्या कमी होण्यासाठी खासकरून ताजी फळं, भाज्या, कडधान्यं, नट्स, शेंगा, ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्सनी समृद्ध असलेले फॅटी मासे आदी पदार्थ आहारात ठेवावेत. या अन्नपदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. ती शरीराचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करतात आणि इरेक्टाइल डिस्फंक्शनला प्रतिबंध करण्यास मदत करतात.

  योग्य वजन आणि बीएमआय : लठ्ठपणा आणि वजन वाढणं या बाबी इरेक्टाइल डिस्फंक्शनच्या दृष्टीने जोखमीच्या असतात. अतिरिक्त बॉडी फॅटमुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन होऊ शकतं. कारण त्यामुळे अनेक हॉर्मोन्सच्या कामात ढवळाढवळ होते. योग्य वजन आणि बॉडी मास इंडेक्स राखल्यास, वजन कमी केल्यास इरेक्टाइल डिस्फंक्शनची लक्षणं कमी करण्यास हातभार लागू शकतो.

  चांगली झोप : पुरेशी चांगली झोप मिळाली नाही, तर टेस्टॉस्टेरॉन या हॉर्मोनची पातळी कमी होते. हे हॉर्मोन लैंगिक क्रियांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे झोप कमी झाल्यास किंवा झोप चांगली नसल्यास इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या उद्भवते. अनेक अभ्यासांतूनही हे दिसून आलं आहे.

  मद्यपान, धूम्रपान बंद करा : मद्यपान आणि धूम्रपानामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे ही दोन्ही व्यसनं बंद केल्यास परिस्थिती सुधारू शकते. तसंच, ज्यांना अद्याप इरेक्टाइल डिस्फंक्शन झालेलं नाही, त्यांना ती समस्या उद्भवण्याची शक्यताही कमी होते. मद्यपान बंद करणं सर्वोत्तम; मात्र ते बंद करणं शक्य नसल्यास निदान त्याचं प्रमाण कमी करावं.

  First published: