मुंबई, 8 डिसेंबर : मैदानावर खेळत असताना मृत्यू झाल्याच्या काही घटना याआधी घडल्या आहेत. आता उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. कानपूर जिल्ह्यातल्या बिल्हौरच्या बीआयसी मैदानावर क्रिकेट खेळताना बॅटिंग करत असलेल्या 16 वर्षांच्या एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनुज पांडे (वय 16) असं मृत खेळाडूचं नाव आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. क्रिकेट मॅचमध्ये बॅटिंग करत असताना अनुज पांडे या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अनुज रन काढण्यासाठी धावत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो अडखळत पीचवर पडला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मृत अनुजला आधी कोणताही आजार नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबाबत मृत मुलाचे वडील अमित पांडे यांनी सांगितलं, की ‘मला सुमित आणि अनुज ही दोन मुलं. त्यातला अनुज (वय 16) हा मित्रांसोबत बीआयसी मैदानावर क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेला होता. अनुज रन काढण्यासाठी धावला, तेव्हा तो अचानक कोसळला.’ मैदानात उपस्थित व्यक्तींनी अशी माहिती दिली, की ‘अनुज पीचवर कोसळल्यानंतर इतर खेळाडूंनी त्याचे हात-पाय चोळण्यास सुरुवात केली; पण अनुजने कोणतीही हालचाल न केल्याने, याबाबत त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी अनुजला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला सीएचसी बिल्हौर या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.’
तारुण्यात हार्ट अटॅक टाळायचा असेल तर काही गोष्टींना पर्याय नाही
दरम्यान, मेरठमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. तिथे एका 25 वर्षीय तरुणाचा शिंक आल्यानंतर अचानक मृत्यू झाला. चार तरुण एकत्र असताना त्यापैकी एका मुलाला शिंक आली व त्यानंतर तो अचानक खाली पडला. इतरांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेलं; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या दोन्ही घटनांनंतर अनेकांना धक्का बसला आहे. यावर कोणाचा सहजासहजी विश्वास बसणं अवघड आहे. अनुज पांडे याचं वय अवघं 16 वर्षं होतं. या वयात त्याला हृदयविकाराचा झटका कसा आला, याबाबत अनेकजण आश्चर्य व्यक्त करीत आहे. या निमित्ताने तरुण पिढीच्या आरोग्याबद्दलची चर्चाही सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Health, Heart Attack