मुंबई, 22 मे : यंदा मान्सूनचं आगमन तीन ते चार दिवस उशिरा होऊ शकतं, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने अलीकडेच वर्तवला होता. आता मान्सूनला 10 ते 12 दिवसांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वप्रथम मान्सून म्हणजे काय ते जाणून घेऊ या. महासागरांवरून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांच्या दिशेत होणाऱ्या बदलाला मोसमी वारे किंवा मान्सून असं म्हटलं जातं. यामुळे पाऊस तर पडतोच; पण विविध भागांत कोरडं हवामान तयार होतं. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून वाहणाऱ्या या जोरदार वाऱ्यांमुळे भारतासह, बांगलादेश आणि पाकिस्तानात पाऊस पडतो. भारतात मान्सून साधारणपणे 1 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत 45 दिवस सक्रिय असतो. उन्हाळा आणि हिवाळ्यादरम्यान येणाऱ्या पावसाळ्यात विभागलेली ही मोसमी हवा थंड भागांतून उष्ण भागांत फिरते. त्यामुळे दक्षिण आशियाचं हवामान बदलतं. उन्हाळ्यातला काही कालावधी आणि पावसाळ्यात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान जोरदार वाऱ्यांसह पाऊस होतो. हिवाळा संपल्यानंतर, नैर्ऋत्य हिंदी महासागरातून कोरडी आर्द्र हवा भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे हवामानात बदल होऊन हलका ते जोरदार पाऊस पडतो. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून वाहणारे वारे हिमालयातून जातात आणि भारताच्या नैर्ऋत्य भागात आदळतात. त्यामुळे पाऊस पडतो. भारतात ईशान्य मान्सून ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत असतो. ईशान्य मान्सून हिवाळी पाऊस म्हणूनही ओळखला जातो. या कालावधीत वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. हे वारे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र पार करून येतात. आग्नेय आशियातला ईशान्य मान्सून कमकुवत राहतो. वास्तविक हे वारे हिमालयावर आदळल्यानंतर थांबतात आणि त्यांच्यामधली आर्द्रताही कमी होते. त्यामुळे या काळात भारतातलं हवामान उष्ण राहतं. या हवामानामुळे काही भागांत दुष्काळही पडतो. मान्सूनच्या आगमनास का होतो उशीर? मान्सूनच्या आगमनापूर्वी, त्याच्या वृद्धीची काही चिन्हं 15 दिवस अगोदर भारतीय भूमीवर दिसू लागतात. जेव्हा नैर्ऋत्य मोसमी पाऊस सुरू होतो, तेव्हा भारतीय प्रदेशातल्या हवेचं वहन आणि तापमानाचं स्वरूप बदलू लागतं. मान्सूनला विलंब होण्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय उपखंडात मध्य-अक्षांश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाऱ्यांच्या मोठ्या गटाची सतत उपस्थिती होय. याचा एक छोटासा भाग म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स होय. सामान्यतः वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या मैदानी प्रदेशावर परिणाम होतो. फेब्रुवारी 2023मध्ये विक्रमी उष्म्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हवामान थंड राहिलं. अवकाळी पावसामुळे थंडीचा कालावधी वाढल्याने नैर्ऋत्य मान्सूनलाही विलंब होतो. कमकुवत एल-निनोमुळेही होतो मान्सूनला विलंब जेव्हा पश्चिमेकडचे वारे भारतीय प्रदेशात दीर्घ काळ राहतात तेव्हा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. यासाठी वेळ लागत असल्यानेदेखील मान्सूनला उशीर होतो. याशिवाय, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती कमकुवत असेल तरीसुद्धा नैर्ऋत्य मान्सूनला विलंब होतो. एल निनो ही विषुववृत्तीय प्रशांत महासागराची असामान्य तापमानवाढ असते. एल-निनो आफ्रिकेसारखे उष्णकटिबंधीय प्रदेश, भारतासारखे समशीतोष्णकटिबंधीय प्रदेश, उत्तर अमेरिकेसारख्या अतिरिक्त उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये हवामान परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या जागतिक वाऱ्यांच्या पद्धतीत व्यत्यय आणतो. याचा भारतातल्या नैर्ऋत्य मान्सूनशी घनिष्ठ संबंध आहे. मान्सूनला उशीर झाला तर काय नुकसान होऊ शकतं? शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मान्सूनमुळे कृषी आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनभोवती फिरते असं म्हटलं जातं. पुरेसा पाऊस न झाल्यास देशाचा विकास आणि अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. पाऊस कमी झाल्यास महागाई वाढते आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी कमी होते. तसंच यामुळे अत्यावश्यक अन्नधान्याच्या आयातीला प्रोत्साहन मिळतं. त्याचबरोबर सरकारला शेतकरी कर्जमाफीसारखे उपाय करावे लागतात आणि त्यामुळे सरकारवरचा आर्थिक ताण वाढतो. अर्थव्यवस्था, महागाईवर होतो परिणाम खराब मान्सूनमुळे राष्ट्रीय उत्पन्नात घट होऊ शकते. यामुळे सरकारी महसुलात वेगाने घट होण्याची शक्यता असते. मान्सूनला जास्त उशीर झाला तर त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. पीक उत्पादन कमी झालं, तर महागाई वाढणं स्वाभाविक असतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठा फटका बसू शकतो. त्याच वेळी मान्सूनच्या विलंबाचा परिणाम ग्रामीण उत्पन्नावर आणि ग्राहकांच्या खर्चावर होतो. देशातल्या मोठ्या लोकसंख्येच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती हाच आहे. नैर्ऋत्य मान्सूनचं महत्त्व काय? शेतकऱ्यांसाठी नैर्ऋत्य मान्सून महत्त्वाचा असतो. खरं तर, देशातल्या केवळ 40 टक्के कृषी क्षेत्रात सिंचनाच्या चांगल्या सुविधा आहेत. उर्वरित 60 टक्के क्षेत्र अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मान्सूनला विलंब झाला किंवा कमी पाऊस झाला तर त्याचा कृषी क्षेत्रावर वाईट परिणाम होतो. कमी पाऊस आणि महागाईचा उच्च दर यांचा थेट संबंध आहे. याशिवाय देशातल्या 22 कोटी जनावरांनाही शेतीतून चारा मिळतो. त्यामुळे मान्सूनचा कोणत्याही प्रकारे परिणाम झाला तर देशातलं अन्नधान्य आणि शेतीशी संबंधित बहुतांश उद्योगांसाठी कच्चा माल परदेशातून मागवावा लागतो. निर्माण होऊ शकते अन्नधान्याची टंचाई लवकरच मान्सूनच्या बदलत्या पॅटर्ननुसार आपल्या शेतीचा ताळमेळ बसला नाही तर जगातली सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अन्नधान्याचं संकट निर्माण होऊ शकते. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचं चक्र बदलत आहे. अशा स्थितीत सिंचन सुविधांकडे लक्ष न दिल्यास त्याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एका अंदाजानुसार, 2050मध्ये सुमारे 1.7 अब्ज भारतीयांचं पोट भरण्यासाठी आपल्याला 45 कोटी टन अन्नधान्याची आवश्यकता असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.