मुंबई, 27 डिसेंबर : जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bhag Massacre) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या (Indian Freedom Movement) इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत बैसाखीच्या दिवशी ब्रिटिशांविरुद्ध शांततापूर्ण आंदोलनासाठी जमलेल्या निष्पाप लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या गोळीबाराचे आदेश ब्रिटीश ब्रिगेडियर जनरल डायर (General Dyer) यांनी दिले होते, ज्याचा बचाव लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओ डायर यांनी केला होता. या घटनेचा परिणाम एका तरुणावर इतका झाला की, त्याने गव्हर्नर मायकेल ओ डायर यांना मारणे हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनवले आणि ते पूर्ण करण्यासाठी 21 वर्षे वाट पाहिली. अमर शहीद उधम सिंग (Shaheed Udham Singh) यांचे संपूर्ण आयुष्य हा सूड पूर्ण करण्यात खर्ची पडले.
1919 पूर्वीचे जीवन
उधम सिंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1899 रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सुनम गावात झाला. उधम सिंग यांच्या आईचे 1901 मध्ये आणि वडिलांचे 1907 मध्ये निधन झाले. उधम सिंग यांचे बालपणीचे नाव शेर सिंग होते. अनाथाश्रमात त्यांना उधम सिंग हे नाव मिळाले. तर त्यांचा भाऊ मुक्ता सिंग याला साधू सिंग हे नाव मिळाले.
ब्रिटीश सैन्यात झाले होते भरती
1917 मध्ये आपल्या भावाच्या मृत्यूनंतर, उधम सिंग पहिल्या महायुद्धात भाग घेण्यासाठी ब्रिटिश भारतीय सैन्यात सामील झाले. त्यांच्या अधिकार्यांशी मतभेद झाल्यामुळे, त्यांनी सहा महिन्यांत ब्रिटीश सैन्य सोडले, त्यानंतर ते 1918 मध्ये पुन्हा सैन्यात सामील झाले आणि एक वर्षानंतर त्यांच्या अनाथाश्रमात परतले.
जालियनवाला बागेत काय घडलं?
13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या मुहूर्तावर जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या विरोधात काही लोक जमले होते. मात्र, या बागेला जनरल डायरच्या तुकडीने वेढले आणि डायरने कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्याचे आदेश दिले होते, ज्यामध्ये 1000 लोक मारले गेले. तर 1200 हून अधिक लोकं जखमी झाले. यात लहान मुलांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.
खोलवर परिणाम झाला
गोळीबाराच्या वेळी उधम सिंग बागेत उपस्थित होते, असे अनेक ठिकाणी सांगण्यात आले आहे. मात्र, घटनेनंतर ते अनाथाश्रमाचा कार्यकर्ता म्हणून बागेत गेले होते, असेही समजते. पण या घटनेचा उधम सिंग यांच्या हृदयावर आणि मनावर खूप खोलवर परिणाम झाला, जो आयुष्यभर दिसून आला.
भगतसिंग यांचा प्रभाव
या घटनेनंतर उधम सिंग यांनी क्रांतिकारक होण्याचा मार्ग स्वीकारला. ते गदर पक्षाचे सदस्य झाले आणि त्यांच्याच पक्षाच्या माध्यमातून आझाद पक्षाने भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांची भगतसिंग यांची भेट झाली. भगतसिंग यांच्या विचारसरणीचा आणि राजकीय दृष्टिकोनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
वर्ष 1927
जालियनवाला हत्याकांडाला जबाबदार असलेल्या जनरल डायरला ठार मारण्याचा उधम सिंगचा इरादा होता. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी फ्रान्स, जर्मनी, पोलंड, इटली, जपान, ब्रह्मदेश यासह अनेक देशांतील क्रांतिकारक बांधवांशी संपर्क साधला. पण 1927 मध्ये उधम सिंग यांच्या प्रयत्नांपूर्वीच जनरल डायरचा आजारपणात मृत्यू झाला. त्याच वर्षी क्रांतिकारकांना शस्त्रे दिल्याबद्दल त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली.
जनरल डायरच्या मृत्यूनंतर, जालियनवाला हत्याकांडाच्या वेळी पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओ डायर यांना मारण्याचा उधम सिंग यांचा इरादा होता आणि 1931 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर ते इंग्लंडला गेले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर तेथे त्यांना संधी मिळाली आणि 13 मार्च 1940 रोजी लंडनमधील रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मायकेल ओ डायर हे देखील वक्ते होते. जाडजूड पुस्तकात रिव्हॉल्व्हर लपवत उधम सिंग त्या सभेत पोहोचले आणि संधी मिळताच डायरवर गोळीबार केला. डायरचा जागीच मृत्यू झाला आणि उधम सिंगला अटक करण्यात आली. या हत्येप्रकरणी 31 जुलै रोजी उधम सिंगला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Independence day