मुंबई 17 जून : कुठलीही नोकरी करताना आपल्याला त्या कंपनीकडून अनेक सुविधा मिळतात. यात प्रॉव्हिडंट फंड (PF), मेडिकल इन्शुरन्स (Medical Insurance) तसंच ग्रॅच्युइटी (Gratuity) अशा प्रकारच्या सुविधा असतात. नोकरी करणाऱ्या अनेकांनी ग्रॅच्युइटीबद्दल ऐकलेलं असतं; मात्र त्याबद्दल त्यांना याबद्दल फारसं काही माहिती नसतं. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ग्रॅच्युइटी हा एक महत्त्वपूर्ण निधी असतो. अनेक वर्षं काम केल्याबद्दल कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाणारी भेट म्हणजे ग्रॅच्युइटी (Gratuity) होय. ग्रॅच्युइटीकरिता कर्मचाऱ्याच्या वेतनातून छोटा हप्ता कापला जातो. मात्र त्यातला मोठा हिस्सा कंपनीकडून दिला जातो.
जेव्हा कर्मचारी अनेक वर्षं काम करून कंपनी सोडतो, तेव्हा त्याला पेन्शन (Pension) आणि प्रॉव्हिडंट फंडासोबत (PF) ग्रॅच्युइटीही दिली जाते. साधारणतः ग्रॅच्युइटी रिटायरमेंटनंतर दिली जाते; मात्र मधल्या काळात नोकरी बदलत असतानाही ठरावीक निकषांची पूर्तता केली असेल, तर ग्रॅच्युइटी मिळू शकते.
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट 1972नुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने चार वर्षं, 10 महिने आणि 11 दिवस सलग एकाच कंपनीत काम केलं आणि त्यानंतर नोकरी सोडली, तर त्याला ग्रॅच्युइटी देय होते. थोडक्यात सांगायचं तर, सलग पाच वर्षं एकाच कंपनीत नोकरी केल्यानंतर कोणताही कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरतो. ज्या कंपनीत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, त्या प्रत्येक कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळतो.
संबंधित कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, तो रिटायर (Retirement) झाला किंवा काही कारणाने त्याने नोकरी सोडली, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. अर्थात, त्यासाठी त्याला कंपनीत पाच वर्षं पूर्ण झालेली असायला लागतात.
ग्रॅच्युइटी मोजण्याचा एक फॉर्म्युला (Formula) आहे. तो असा -
15 X मागचं मासिक वेतन (रुपये) X काम करण्याचा कालावधी (वर्षं) ----------------------------------------------------------------------------- 26
मागचं वेतन म्हणजे मूळ वेतन (Basic Salary), महागाई भत्ता (Dearness Allowance) आदींचा समावेश आहे.
समजा तुमचं मागचं मासिक वेतन 60 हजार रुपये आहे आणि तुम्ही सलग 12 वर्षं कंपनीत काम केलंय, तर ग्रॅच्युइटी अशा पद्धतीने मोजता येईल.
(15 X 60,000 X 12) ग्रॅच्युइटी = --------------------------- = 4,15,385 रुपये 26
म्हणजेच 12 वर्षं नोकरी केल्यानंतर 4,15,385 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल. प्राप्तिकर कायद्याच्या (Income Tax Act) कलम 10 (10) नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी म्हणून दिल्या जाणाऱ्या 20 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. सुरुवातीला 10 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त (Tax Free) होती.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.