मुंबई, 19 जुलै : आपलं स्वत:चं हक्काचं नवं घर घेणं हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं आणि ते प्रत्यक्षात उतरतं; पण तुम्ही बँकेच्या कर्जाचा हप्ता म्हणजेच EMI भरायला उशीर केलात, तर कर्ज काढून घेतलेलं हे स्वप्न एखाद्या दु:स्वप्नासारखं होऊ शकतं. घर घेण्यासाठी पैसे उभे करण्याकरिता होम लोन म्हणजेच गृह कर्ज हा सगळ्यांत स्वस्त आणि सोपा मार्ग असतो. सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारची होम लोन्स उपलब्ध आहेत. तुमच्या गरजांप्रमाणे तुम्ही त्यातला सर्वोत्तम आणि योग्य तो पर्याय निवडू शकता. होम लोन घेणं हे एखाद्या पार्कमध्ये फेरफटका मारण्याएवढं सोपं वाटू शकतं; पण कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन गरजेचं आहे. EMI वेळेवर देण्यास उशीर झाला तर त्याचा परिणाम कर्जदारावर होऊ शकतो. तुमच्या होम लोनचे हप्ते भरण्यात उशीर झाला, तर त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर कशी मात करायची याबाबत BANKBAZAAR.com चे सीईओ आदिल शेट्टी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. उशीर झाल्यास दंड आणि NPA अकाउंट (Delay Penalty And NPA Account) तुम्ही सलग तीन महिने EMI उशिरा भरलेत तर ती एक छोटी चूक मानली जाते. अशा परिस्थितीत, कर्ज देणारे तुम्हाला तुमच्या हप्त्यांबद्दल रिमाइंडर पाठवायला सुरुवात करतील. EMI उशिरा भरण्याचा कालावधी वाढला तर मात्र तुमच्या अडचणी सुरू होऊ शकतात. 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ EMI थकले तर ती मोठी चूक मानली जाते. त्यानंतर मग कर्ज देणारे हे पैसे वसूल करण्यासाठी तुमच्या मालमत्तेचा Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 या कायद्यांतर्गत लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. हे वाचा - Home Loan : ‘या’ 5 कारणामुळं बँक फेटाळू शकते गृहकर्जाचा अर्ज, वेळीच घ्या काळजी EMI थकल्यास सगळ्यांत पहिली कारवाई केली जाते ती म्हणजे थकलेल्या EMI च्या 1% किंवा 2% दंड लावला जातो आणि ही रक्कम किमान रकमेवर आधारित असते. मोठी चूक केल्यास बँक तुमच्या कर्जाला NPA म्हणून जाहीर करू शकते आणि नंतर वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. सहसा कर्जावर NPA म्हणून जाहीर करण्याआधी बँका नोटीस पाठवतात. काही वेळेस बँका NPA अकाउंट्समधून पैसे वसूल करण्यासाठी एखाद्या त्रयस्थाची नेमणूक करतात; पण यामुळे कर्जदाराला अत्यंत शरमल्यासारखं होतं. त्यामुळेच योग्य मार्ग शोधणं हे कर्जदार आणि कर्ज देणारा या दोघांच्याही हिताचं असतं. तसंच कर्जदाराची चूक असली तरीही त्याला आदरपूर्वक वागणूक दिली पाहिजे. जबरदस्ती किंवा धमकावणं असं काही झालं, तर कर्ज देणाऱ्यावर कडक कारवाई होऊ शकते. एकाच संस्थेकडून कर्जदाराने आणखीही कर्जं घेतली असतील आणि त्यांचे EMI वेळेवर भरूनही त्या कर्जांनाही NPA म्हणून गणलं जाऊ शकतं. क्रेडिट स्कोअरवर परिणाम (Impact on Credit Score) होम लोनचे EMI वेळेवर भरले नाहीत, तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. कर्जदार EMI नेहमीच चुकवत असेल तर त्याचा क्रेडिट स्कोअर अत्यंत खालच्या पातळीवर येतो. हल्ली बहुतेक बँका त्यांचे इंटरेस्ट रेट्स नियमित कालावधीच्या अंतरावर सेट करतात. यानुसार सध्याचा REPO रेट आणि रिस्क हे कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. म्हणजेच बेशिस्त, हलगर्जी कर्जदारांच्या कमी क्रेडिट स्कोअरमुळे त्यांना जास्त व्याजदर लागू शकतो. त्यांच्या व्याजदरात वाढ होऊ शकते. जास्त काळ हप्ते थकवल्यास अशा अकाउंट्सचा रिपोर्ट क्रेडिट ब्युरोजकडे पाठवला जातो आणि कर्जदाराच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये NPA चा उल्लेख होतो. अर्थातच याचा कर्जदाराच्या क्रेडिट पात्रतेवर परिणाम होतो आणि त्यांना भविष्यात कर्ज मिळण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. ट्रान्स्फर आणि नवीन लोनसाठी नकार (Rejection of Transfer and New Loan) तुम्हाला तुमचं होम लोन अन्य एखादी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ट्रान्स्फर करायचं असेल, तर तुमचा कर्जाची परतफेड करण्याचा वाईट पूर्वेतिहास पाहता ते तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकतील. अशा कर्जदारांना पर्सनल लोन, कार लोन, इत्यादी लोन्स मिळण्यासही अडचणी येऊ शकतात. गृहकर्जाच्या (Homeloan) EMI ला उशीर होणं कसं टाळावं? तुम्हाला काही तात्पुरती आर्थिक समस्या असेल तर तुम्ही तुमचे मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन EMI भरू शकता; पण शक्यतो EMI चुकवू नका. आणखी एक पर्याय म्हणजे तुमच्या FD वर किंवा लाइफ इन्शुरन्सवर तुम्ही OD (Overdraft) म्हणजेच ओव्हरड्राफ्ट काढू शकता आणि तुमच्या कर्जाचा हप्ता भरू शकता. अर्थात तुमची आर्थिक समस्या सुटली आणि परिस्थिती सर्वसाधारण झाली, की तुम्ही तुमचे मित्र किंवा नातेवाईकांकडून घेतलेले पैसे परत करा किंवा OD मध्ये पैसे परत डिपॉझिट करा. तुमची आर्थिक समस्या तात्पुरती नसेल किंवा ती कधी सुटेल हे तुम्ही सांगू शकत नसाल, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या कमी व्याज असलेल्या FD किंवा अन्य लिक्विड फंडमधली गुंतवणूक मोडू शकता आणि त्यातून पैसे काढू शकता. कर्जाचे हप्ते थकू नयेत यासाठी तुमच्या PF मधून पैसे काढण्याचा पर्यायही तुमच्यासमोर असतो किंवा PPFसारख्या (Public Provident Fund) दीर्घकालीन गुंतणुकीतून पैसे काढून EMI भरू शकता. हे वाचा - Post Office MIS: पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि दरमाह हमखास पैसे कमवा, काय आहे योजना? तुमचं आर्थिक नुकसान भरून निघण्यासारखं नसेल तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मोठं पाऊल उचलावं लागेल. पैसे वाचवण्यासाठी तुमचं राहतं घर विकून एखाद्या छोट्या घरात किंवा भाड्याच्या घरात शिफ्ट होणं किंवा तुमच्याकडे असलेलं सोनं, कारसारखी जंगम मालमत्ता (Movable Assets) विकून तुम्ही पैसे उभे करू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता. तसंच तुम्ही तुमच्या EMI साठी अल्पकालीन लोन इन्शुरन्सही घेऊ शकता (Loan Insurance). काही बँका आणि वित्तीय संस्था कर्जाची रक्कम देण्याच्या वेळेसच लोन इन्शुरन्सही देऊ करतात. नोकरी गेल्यास किंवा आर्थिक उत्पन्न तात्पुरत्या काळापुरतं बंद झालं आणि तुम्ही EMI वेळेवर भरू शकला नाहीत तर याचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारच्या आर्थिक संकटांमध्येही EMI वेळेवर भरता यावेत यासाठी पुरेसा आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड (Emergency Fund) तयार करा. EMI वेळेवर भरता यावेत यासाठी, ते चुकू नयेत यासाठी कर्ज घेण्याआधीच नियोजन करा. तुमची परतफेडीची क्षमता किती आहे त्यावर तुम्ही कर्ज किती घ्यायचं हे ठरवू शकता. तसंच EMI ची रक्कम कमी असावी यासाठी कर्जफेडीचा कालावधी जास्त असावा. EMI सुरू होण्याआधी आर्थिकदृष्ट्या तयारीच्या दृष्टीने कर्जाच्या स्थगितीचा कालावधीचा लाभही तुम्हाला घेता येऊ शकतो. हे वाचा - Cheapest Car Loan: नवीन कार घ्यायचा विचार करताय? ‘या’ बँका देतायेत 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज तसंच या अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला कर्ज देणाऱ्यांच्या संपर्कात राहणंही फायद्याचं ठरतं. तुमची परिस्थिती, समस्या आणि त्याचं गांभीर्य यावर कर्जदाते तुम्हाला काही पर्यायही देऊ शकतात. कर्जाची पुनर्रचना (Loan Restructuring), कर्जावरचा स्थगिती कालावधी किंवा परतफेड करण्याच्या कालावधीत वाढ आणि तुमच्यावरचं आर्थिक ओझं कमी करण्याच्या दृष्टीने नियमानुसार कर्जाचं सेटलमेंट करणं हे काही पर्याय असू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.