नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. यासोबतच कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं निर्माण झालेली प्रतिकारशक्तीही पुन्हा संसर्ग होण्यास प्रतिबंध करण्यास प्रभावी आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वेळोवेळी प्रतिपिंडं (Antibodies) आणि प्रतिकारशक्ती (immunity) यासंबंधी संशोधन आणि अभ्यास केले जात आहेत. नुकताच अमेरिकेतील एका रिसर्च हॉस्पिटलमध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला आहे. ज्यामध्ये फक्त कोरोनाची लागण झालेले लोक, फक्त लसीकरण झालेले आणि संसर्गानंतर लसीकरण झालेल्या लोकांचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत संसर्ग झाल्यानंतर लस घेतल्याने निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीला सुपर इम्युनिटी (Super Immunity) असे म्हटले जात होतं. परंतु यातली कोणती चांगली आहे? लस घेतल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते की प्रत्यक्ष कोरोनाच्या संसर्गानंतर ती अधिक वाढते? अमेरिकेच्या सेंट ज्यूड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं असून त्यात 399 लोकांचा समावेश आहे. या सर्वेक्षण आणि अभ्यासावर रुग्णालयाचे सहयोगी शिक्षक सदस्य डॉ. जोश वोल्फ SARS Cov-2 बद्दल सांगतात, की या प्रकारांविरुद्ध संसर्गामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती किंवा कोरोना लसीकरणानंतर तयार झालेली प्रतिकारशक्ती चांगली असते, हे सांगणं कठीण आहे. तसंच, कोरोना संसर्ग किंवा लसीकरण याच्यापैकी कशाच्या नंतर अँटीबॉडी जास्त संख्येनं बनतात, याचा अंदाज लावणं देखील कठीण आहे. परंतु रुग्णालयानं केलेल्या यासंबंधीच्या अभ्यासात अतिशय धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मात्र, लस घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं यातून सिद्ध झालंय. अभ्यासात 3 श्रेणींचा समावेश करण्यात आला होता या अभ्यासात समाविष्ट केलेल्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली होती. यामध्ये 120 अशा लोकांचा समावेश होता, ज्यांना फक्त कोरोना संसर्ग झाला होता. तर 237 अशा लोकांचा समावेश होता, ज्यांनी कोरोनाची mRNA लस घेतली होती. तर 42 अशा लोकांचा समावेश होता ज्यांना कोरोनाची लसही मिळाली होती आणि त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान, अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा या कोरोनाच्या चार महत्त्वाच्या रूपांविरुद्धच्या प्रतिपिंडांच्या पातळीची तपासणी तिन्ही वर्गातील लोकांमध्ये करण्यात आली. हे वाचा - Liver Healthy: लिवर खराब होणं म्हणजे संपलं..! निरोगी आरोग्यासाठी आधीपासूनच अशी घ्या काळजी या श्रेणीतील लोकांमध्ये क्रॉस रिअॅक्टिव्ह अँटीबॉडीज चांगले आढळले या अभ्यासात सांगितल्याप्रमाणं नुकतीच कोरोनाची लस देण्यात आलेल्या लोकांमध्ये क्रॉस रिअॅक्टिव्ह अँटीबॉडीजची उच्च पातळी आढळून आली. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे की, लसीद्वारे तयार केलेल्या प्रतिपिंडांची संख्या संक्रमणामुळं तयार केलेल्या प्रतिपिंडांपेक्षा चांगली असल्याचं आढळून आलं. दुसरीकडे, ज्यांना संसर्ग झाला आणि नंतर लस घेतली, त्यांची प्रतिकारशक्ती सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. याला सुपर इम्युनिटी असंही म्हणतात. यामध्ये देखील विशेषतः अल्फा आणि वाईल्ड प्रकारांविरूद्ध उच्च प्रतिकारशक्ती होती. डेल्टा व्हेरियंटविरूद्ध आढळली ही बाब कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक प्रकार मानल्या जाणार्या डेल्टा प्रकाराविरुद्धच्या अभ्यासात असं आढळून आलं की, ज्या लोकांना लसीकरण करण्यात आलं, त्यांच्यामध्ये डेल्टा प्रकाराविरूद्धची प्रतिकारशक्तीही कोरोना संक्रमित रुग्णांपेक्षा चांगली असल्याचं आढळून आलं. संसर्ग झाल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या प्रतिपिंडांच्या संख्येची पातळी कमी असल्याचं आढळून आलं. मात्र, ज्यांना गंभीर संसर्ग झाला आहे, ज्यांचं चयापचय, आरोग्य कमकुवत आहे किंवा ज्यांनी संसर्ग झाल्यानंतर लगेच लस घेतली, अशा लोकांमध्ये क्रॉस-रिअॅक्टिव्ह अँटीबॉडी प्रतिसाद अधिक दिसला आहे. हे वाचा - सर्दी-खोकला आला की अनेकजण ही फळं खायची बंद करतात; चुकीचे समज वेळीच दूर करा भारतीय तज्ज्ञ काय म्हणतात? या संदर्भात बनारस हिंदू विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मोलेक्युलर बायोलॉजी युनिट विभागाचे प्रमुख आणि प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट प्राध्यापक सुनीत कुमार सिंग म्हणतात की, कोरोनाची लागण झाल्यानंतर लस दिली गेली असल्यास त्या व्यक्तीची हायब्रिड प्रतिकारशक्ती विकसित होते. लसीकरण आणि नैसर्गिक संसर्गाचा एकत्रित परिणाम होऊन त्या त्या व्यक्तींमध्ये हायब्रिड किंवा सुपर इम्युनिटी तयार होते. त्यांच्यामध्ये ज्यांना फक्त लस मिळाली आहे किंवा फक्त कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे अशांच्या तुलनेत प्रतिपिंडांची संख्या तुलनेने जास्त आहे. यामुळेच लोकांना असा सल्ला दिला जात आहे की SARS-Cov-2 चा संसर्ग टाळण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना लस मिळणं आवश्यक आहे. लसीकरण केलेल्या लोकांमध्ये हा आजार असतानाही त्यांची लक्षणं कमी दिसून येतात, तर लस न घेतलेल्या लोकांना हा आजार अधिक गंभीर होण्याचा धोका असतो. त्यामुळं लसीकरण सर्वांसाठी आवश्यकच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.