EXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं? जाणून घ्या कारण

EXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं? जाणून घ्या कारण

आपण लहानपणापासून सायकल मग बाईक मग कार चालवत आलो आहोत, मोठमोठ्या गाड्या रस्त्यांवरून धावताना पाहिल्या आहेत. तुम्हाला कधी प्रश्न पडला का, की गाडी कुठल्याही प्रकारची असली तरीही तिचं टायर काळ्या रंगाचं (Tyre Colour Black) कसं?

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : आकाश निळं का असतं?, पाऊस कसा पडतो?, सकाळी कोंबडा का आरवतो, रात्री सूर्य कुठं जातो? यासारखे असंख्य प्रश्न आपल्यालाही पडले असतील आणि तुम्हीही तुमच्या आईबाबांना हे प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल. आताची मुलं तर विचारूच नका त्यांचं कुतूहल म्हणजे काय विचारावं? असो. पण हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण लहानपणापासून सायकल मग बाईक मग कार चालवत आलो आहोत, मोठमोठ्या गाड्या रस्त्यांवरून धावताना पाहिल्या आहेत. तुम्हाला कधी प्रश्न पडला का, की गाडी कुठल्याही प्रकारची असली तरीही तिचं टायर काळ्या रंगाचं (Tyre Colour Black) कसं? आम्ही तुम्हाला आज त्याचं उत्तर या बातमीतून देणार आहोत.

पांढऱ्या रबरापासून तयार होतात टायर

हे जग विविध रंगांनी नटलेलं आहे. निसर्ग तर आहेच पण माणूसही विविध रंगांचा वापर करतो आणि त्याच्या कलाकृती, इमारती, वस्तू सगळ्यांना रंग देतो. कारण रंगीत जीवन त्याला आनंद देतं. माणसाची ही कल्पना असली तरीही एवढ्या रंगांनी सजलेल्या जगात वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे टायर मात्र काळ्या (Tyre Colour Black) रंगाचे असतात. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. मुख्य म्हणजे काळा रंग हा टायरच्या मजबुतपणाशी संबंधित आहे. साधारणपणे टायर रबरापासून (Rubber) तयार केली जातात. रबराचा मूळ रंग पांढरा असतो, पण पांढऱ्या रबराची टायर लवकर घासून घासून खराब होतात, मग शास्रज्ञांनी संशोधन करून मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी टायर तयार करण्याचं ठरवलं. त्यांना संशोधनातून लक्षात आलं की, पांढऱ्या रबरात कार्बन (Carbon) आणि सल्फर (Sulphur) हे दोन घटक टाकले की टायरचं रबर मजबूत आणि टिकाऊ होतं. त्यामुळे पांढऱ्या रबराऐवजी कार्बन व सल्फरयुक्त काळ्या रबरापासून टायर तयार केली जातात.

किती दणकट असतात काळी टायर ?

काळी टायर किती मजबूत असतात किंवा दणकट असतात हे तुम्ही अनुभवलं आहेच, पण त्याची शास्रीय माहिती घेऊयात. बीबीसीच्या एका वृत्तानुसार पांढऱ्या रबरचं टायर 8 हजार किलोमीटर प्रवास करेपर्यंत चांगलं टिकतं. कार्बनयुक्त रबरचं टायर 1 लाख किलोमीटरचा प्रवास झाल्यावर खराब होतं. टायर तयार करताना रबरात कार्बनसोबत सल्फरही टाकतात, त्यामुळे दणकटपणा वाढतो आणि हेच कारण आहे की जगभरात वापरल्या जाणाऱ्या टायरचा रंग काळा असतो.

रंगीत टायरही असतात

लहान मुलांच्या सायकलींचे टायर वेगवेगळ्या रंगांचे असतात. ते दिसायला आकर्षकही दिसतात. या रंगीत टायरमध्ये कार्बन वापरला जात नाही. मुलांचं वजन कमी असतं त्यामुळे त्यांच्या सायकलींची टायर खूप दणकट असावीत अशी गरजच नसते. जेव्हा टायरला अधिक वजन वाहून न्यायचं असतं तेव्हा, ते अधिक दणकट असायला हवं, त्यामुळे लहान मुलांच्या सायकलींची टायर रंगीत असतात.

First published: July 23, 2021, 7:25 AM IST

ताज्या बातम्या