मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे गुणधर्म कोणते?

Explainer : चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे गुणधर्म कोणते?

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

संसदेच्या (Parliament) आगामी हिवाळी अधिवेशनात सरकार 'दी क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021' हे विधेयक मांडणार आहे. त्यातून सरकारची भूमिका किंवा दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीबद्दलच्या चर्चेला अधिकच वेग आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 नोव्हेंबर : क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हे गेल्या काही वर्षांत आलेलं आणि खासकरून गेल्या दोन वर्षांत जागतिक पातळीवर लोकप्रिय झालेलं तंत्रज्ञान आहे. क्रिप्टोकरन्सी म्हटलं, की बिटकॉइन (Bitcoin) हे नाव सहज तोंडावर येत होतं; मात्र आता जगभरात उपलब्ध असलेल्या आणि वापरल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीजची संख्या सहा हजारांहून अधिक आहे. क्रिप्टोकरन्सीमधले सर्वाधिक गुंतवणूकदार भारतातले आहेत; मात्र अद्याप भारताने याबद्दलची आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. संसदेच्या (Parliament) आगामी हिवाळी अधिवेशनात सरकार 'दी क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021' हे विधेयक मांडणार आहे. त्यातून सरकारची भूमिका किंवा दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीबद्दलच्या चर्चेला अधिकच वेग आला आहे.

क्रिप्टोकरन्सीचे सहा हजारांहून अधिक प्रकार असतील, तर साहजिकच नव्याने गुंतवणूक (Cryptocurrency Investors) करू इच्छिणाऱ्यांचा गोंधळ उडणार. मग यातली चांगली क्रिप्टोकरन्सी कोणती हे ओळखायचं कसं? म्हणूनच सीएनबीसी टीव्हीने चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे काही गुणधर्म समजावून सांगितले आहेत. त्यांची माहिती घेऊ या.

तुम्हाला (कु) प्रसिद्ध स्क्विड गेम कॉइन (Squid Game Coin) आठवतंय का? तंत्रज्ञानविषयक एका लोकप्रिय वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार या स्क्विड गेम कॉइनचा घोटाळा उघडकीला येण्यापूर्वी त्याच्या डेव्हलपर्सनी प्रचंड संपत्ती कमावली होती. एका आठवड्यात स्क्विड गेम कॉइनचं मूल्य एक सेंटवरून 2856 डॉलर्सवर पोहोचलं होतं. घोटाळा आपोआपच उघडकीला आला, तोपर्यंत डेव्हलपर्सनी तब्बल 3.38 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती. हा धडा लक्षात घेता चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे काही गुणधर्म माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित क्रिप्टोकरन्सीच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटवता येऊ शकेल.

सुरक्षितता (Security) : क्रिप्टोकरन्सीची निवड करताना आपली आर्थिक सुरक्षितता नेहमीच ध्यानात घेतली पाहिजे. आदर्श क्रिप्टोकरन्सीमध्ये तिच्या नेटिव्ह डिझाइनमध्येच सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असेल. म्हणजेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि गुंतागुंतीचे पासवर्ड्स यांव्यतिरिक्त त्यात सुरक्षिततेची आणखी काही व्यवस्था केलेली असणं आवश्यक आहे, जेणेकरून हॅकिंगपासून संरक्षण मिळू शकेल.

यासाठी क्रिप्टोकरन्सीच्या तांत्रिक बाबींच्या खूप खोलात शिरण्याची गरज नाही आणि प्रत्येकाला ते शक्यही नाही; मात्र संबंधित क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यात हॅकिंग रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा काय विचार केला आहे, याबद्दलचं थोडं संशोधन करणं नक्कीच आवश्यक आहे.

स्थिरता (Stability) : खरं तर क्रिप्टोकरन्सी आणि स्थिरता हे दोन्ही शब्द परस्परविरुद्ध अर्थाचे आहेत, असं वाटतं. कारण व्यक्ती, संघटना आणि देशांनी क्रिप्टोकरन्सी वापरायचं ठरवलं, तरच ती खऱ्या अर्थाने स्टेबल अर्थात स्थिर होऊ शकते. भविष्यात कदाचित तसं होऊ शकतं.

अर्थात याचा अर्थ असा नव्हे, की बिटकॉइन किंवा इथर यांसारख्या क्रिप्टोकरन्सीज स्टेबल नाहीत. आदर्श क्रिप्टोकरन्सीला यथावकाश स्टॅबिलिटी प्राप्त होते, जसजशी त्यात केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढत जाते. नेमकं हेच इथर आणि बिटकॉइनच्या बाबतीत घडलेलं आहे. या मॉडेलप्रमाणे व्यवहार असलेली क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीसाठी निवडणं हा चांगला पर्याय आहे.

वेगाची क्षमता (Scalability) : दर सेकंदाला किती व्यवहारांवर प्रक्रिया केली जाऊ शकते किंवा ते कन्फर्म केले जाऊ शकतात, याचा आकडा म्हणजे संबंधित क्रिप्टोकरन्सीची स्केलेबिलिटी होय. सध्याच्या काळात आपण चेकने पेमेंट करण्याऐवजी ऑनलाइन पेमेंट करतो. त्यामागचं कारण त्याला लागणाऱ्या वेळेच्या फरकात आहे.

व्यवहार पूर्ण करण्यासाठी ब्लॉकचेन्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. त्यापैकी सर्वोत्तम पद्धती सर्वांत वेगवान असतात. या मुद्द्यांवर चर्चा करणाऱ्या अनेक फोरम्स सोशल मीडियावर आहेत. त्यावरून माहिती घेऊन सर्वांत कमी वेळात व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या क्रिप्टोकरन्सीजमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

पुरवठा (Supply) : वापरात असलेल्या नियमित चलनांची मुख्य समस्या ही आहे, की त्यांची छपाई गरजेनुसार केली जाते. काही व्यक्तींनी धोक्याचा इशारा दिला आहे, की कोविड-19च्या लॉकडाउन काळात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काही ठिकाणी अधिक चलनाची छपाई करण्यात आली, त्यामुळे येत्या काळात कर्जाची खाई निर्माण होणार आहे.

क्रिप्टोकरन्सीजना मात्र ही पुरवठ्याची समस्या येत नाही. अनेक क्रिप्टोकरन्सीजमध्ये कॉइन्सची संख्या निश्चित आणि कायमस्वरूपी आहे. उदाहरणार्थ, बिटकॉइनमध्ये जास्तीत जास्त 21 दशलक्ष कॉइन्स अस्तित्वात असू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही.

नवीन क्रिप्टोकरन्सीजमध्ये तर अशी तरतूद आहे, की अॅक्सेस नसलेल्या वॉलेट्समध्ये त्यातली कॉइन्स पाठवली गेल्यास, क्रिप्टोकरन्सी टोकन्स बर्न होतात, म्हणजेच नष्ट होतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीतल्या कॉइन्सच्या एकूण उपलब्धतेवर मर्यादा येते आणि काळानुसार त्याचं मूल्य अधिकच वाढत जातं. 'वझीरेक्स'ने अलीकडेच सहावा कॉइन बर्न इव्हेंट आयोजित केला होता. त्यात 74.8 कोटी रुपये मूल्याची 5,933,333 WRX कॉइन्स बर्न करण्यात आली. त्यामुळे वझीरेक्सच्या आतापर्यंत बर्न करण्यात आलेल्या कॉइन्सची एकूण संख्या 21,786,665 एवढी झाली असून, त्याचं मूल्य 47 दशलक्ष डॉलर्स एवढं आहे.

ज्या क्रिप्टोकरन्सीमध्ये चलनात असलेल्या कॉइन्सची संख्या कायम राहण्यासाठी नियमितपणे अशा प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जातात, ती क्रिप्टोकरन्सी चांगली आहे, असं मानलं जातं.

विकेंद्रीकरण (Decentralization) : क्रिप्टोकरन्सीमागची मूळ संकल्पना अशी आहे, की एखाद्या संस्था-संघटनेऐवजी चलन वापरणाऱ्यांना शक्ती देणं. बिटकॉइनचं एक ठळक वैशिष्ट्य असं आहे, की त्याची निर्मिती कोणी केली, हे कोणालाच माहिती नाही. सातोशी नाकोमोटोला त्याचं श्रेय दिलं जातं; मात्र हे कोणाचं नाव आहे, हे अनेक प्रयत्न करूनही अद्याप कोणालाही कळलेलं नाही.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या क्रिप्टोकरन्सीचं स्वरूप अशा प्रकारे विकेंद्रित अर्थात डिसेंट्रलाइज्ड आहे; काही क्रिप्टोकरन्सीज मात्र आपल्या करन्सीत बदल करण्यासाठी या स्वरूपात बदल करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या विशिष्ट क्रिप्टोकरन्सीशी संबंधित संघटना किंवा व्यक्तींची माहिती तुम्हाला कधी मिळालीच, तर तातडीने त्या करन्सीमधली गुंतवणूक विकून टाका. स्क्विड गेमचा आणि याचा काही थेट संबंध नसला, तरी ते उदाहरण लक्षात ठेवावं.

मागणी (Demand) : जास्त मागणी असलेल्या क्रिप्टोकरन्सीची निवड करावी, असं साधं सूत्र आहे. एखाद्या क्रिप्टोकरन्सीबद्दल बातम्यांमध्ये चर्चा असेल आणि मीडिया कव्हरेज व माउथ-पब्लिसिटीद्वारे येत्या काळात तिची वृद्धी होण्याची क्षमता असेल, वझीरेक्ससारख्या एक्स्चेंजेवर त्याची उपलब्धता असेल, तर त्या चलनाला मागणी आहे, असं समजलं जातं. जेवढ्या लवकर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात कराल, तेवढी अन्य व्यक्तींनी त्याबद्दल शोधायला सुरुवात करेपर्यंत तिचं मूल्य वाढत जाईल.

वापर अर्थात यूझ केस (Use Case) : नेहमीचं चलन ज्याप्रमाणे आपण वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी वापरतो, त्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सीचा वापर कसा करता येईल, याचा विचार अनेक जण क्रिप्टो विकत घेताना करत नाहीत; पण तुमच्याकडे असलेल्या क्रिप्टोकरन्सीचा विनिमय करून काही खरेदी करता येत असेल, तर तो त्या क्रिप्टोकरन्सीचा चांगला गुणधर्म आहे.

उदा. इथरच्या साह्याने तुम्ही नॉन-फंजीबल टोकन (Non Fungible Token) अर्थात NFT खरेदी करू शकता आणि पूर्णतः वेगळ्या जगतातल्या नव्या शक्यता आजमावून पाहू शकता. एखादी क्रिप्टोकरन्सी विकत घेणं, साठवून ठेवणं आणि चांगलं मूल्य आलं की विकून टाकणं यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. म्हणजेच या पलीकडे जाऊन क्रिप्टोकरन्सीकडे पाहण्याची गरज आहे.

हे वाचल्यानंतर आता तुम्हाला अंदाज आला असेल, की कोणत्या क्रिप्टोकरन्सीज चांगल्या आहेत आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्यापैकी कोणत्या हव्यात. तुमचं क्रिप्टो अकाउंट नसेल, तर वझीरेक्ससारख्या (WazirX) विश्वासार्ह एक्स्चेंजमध्ये ते लगेच उघडा आणि तुमचा क्रिप्टो प्रवास तातडीने सुरू करा.

First published:

Tags: Cryptocurrency, Investment