मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : ब्रिटनमधला Delta सबव्हॅरिएंट AY.4.2 मुळे भीती; किती धोकादायक?

Explainer : ब्रिटनमधला Delta सबव्हॅरिएंट AY.4.2 मुळे भीती; किती धोकादायक?

AY.4.2 हा व्हॅरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटचंच एक रूप आहे. या व्हेरिअंटमुळे Corona ची लागण होण्याचा धोका वाढला आहे.

AY.4.2 हा व्हॅरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटचंच एक रूप आहे. या व्हेरिअंटमुळे Corona ची लागण होण्याचा धोका वाढला आहे.

AY.4.2 हा व्हॅरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटचंच एक रूप आहे. या व्हेरिअंटमुळे Corona ची लागण होण्याचा धोका वाढला आहे.

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटचा (coronavirus delta varient) आणखी एक सबव्हॅरिएंट (Corona Subvariant) आता ब्रिटनसह अन्य काही देशांमध्ये दिसून आला आहे. कोरोना विषाणू वारंवार रूप बदलताना दिसून येतो आहे. याचे डेल्टासारखे काही व्हॅरिएंट अगदी घातक आहेत, तर काही व्हॅरिएंट निरुपद्रवी असल्याचं दिसून आलं आहे. आता यूकेमध्ये या डेल्टाचाच सबव्हॅरिएंट (Britain Delta Subvariant) दिसून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे; मात्र या सबव्हॅरिएंटबाबत अगदी कमी प्रमाणात माहिती उपलब्ध असल्यामुळे हा घातक आहे की नाही, हे स्पष्ट सांगता येणार नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या या सबव्हॅरिएंटबद्दल (AY.4.2) आम्ही आज तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. हा व्हॅरिएंट कुठून आला? AY.4.2 हा व्हॅरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटचंच एक रूप आहे. डेल्टालाच कोरोनाचा B.1.617.2 व्हॅरिएंट म्हणूनही ओळखलं जातं. डेल्टा व्हॅरिएंट (Corona Delta Variant) हा गेल्या ऑक्टोबरमध्ये भारतात सर्वप्रथम दिसून आला होता. देशातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेलाही डेल्टा व्हॅरिएंटच कारणीभूत होता. डेल्टासोबतच मूळ कोरोना विषाणूचे सध्या 55 वेगवेगळे व्हॅरिएंट आहेत. सध्याचा हा नवा सबव्हॅरिएंट सर्वप्रथम या वर्षीच्या जुलै महिन्यात ब्रिटनमध्ये (Corona Britain Subvariant) दिसून आला होता; मात्र या व्हॅरिएंटची लागण होण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ब्रिटनच्या आरोग्य प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. 27 सप्टेंबरनंतर नोंद झालेल्या नव्या कोरोना रुग्णांपैकी सहा टक्के जणांना या सबव्हॅरिएंटची लागण झाल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या सबव्हॅरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये A222V आणि Y145H ही दोन महत्त्वाचे म्युटेशन्स दिसून आली आहेत. आतापर्यंत कुठे कुठे आढळले रुग्ण? कोरोना व्हॅरिएंटसंबंधी एका वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या सबव्हॅरिएंटचे 96 टक्के रुग्ण ब्रिटनमध्येच आढळून आले आहेत; मात्र काही प्रमाणात अमेरिका, रशिया, इस्रायल आणि इतर काही देशांमध्येही या सबव्हॅरिएंटचे रुग्ण मिळाले आहेत. या व्हॅरिएंटचे रुग्ण इतर ठिकाणी असल्याचं प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे लंडनमधल्या यूसीएल जेनेटिक्सचे संचालक फ्रान्कॉइस बॅल्लॉक्स यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. रशियाने दिलेल्या माहितीनुसार, तिथे AY.4.2 सबव्हॅरिएंटचे काही आयसोलेटेड रुग्ण मिळाले आहेत. इस्रायलमध्ये बाहेरून विमानमार्गे आलेल्या एका 11 वर्षांच्या मुलाला या व्हॅरिएंटची लागण झाल्याचं समजत आहे. भारतीयांना कितपत धोका? भारतामध्ये अद्याप हा सबव्हॅरिएंट दिसला नसल्याचं 'सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी'मधील वैज्ञानिक विनोद स्कारिया यांनी एका ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. भारतातील सार्स-सीओव्ही-2 जीनोमिक्स कन्सॉर्शियममधून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे ही माहिती देण्यात आली. “देशातल्या 68 हजार जीनोम्सच्या सर्वेक्षणात अद्याप AY.4.2 हा व्हॅरिएंट दिसून आला नाही,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. या व्हॅरिएंटला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनेही आपल्या घातक व्हॅरिएंट्सच्या (VoC) यादीत स्थान दिलेलं नाही. आतापर्यंत WHOच्या यादीमध्ये कोरोनाच्या अल्फा (B.1.1.7, पहिल्यांदा ब्रिटनमध्य़े आढळून आला), बीटा (B.1.351, दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळला), गॅमा (P.1, ब्राझीलमध्ये सर्वप्रथम आढळला) आणि डेल्टा (B.1.617.2, सर्वप्रथम भारतात दिसून आला) अशा व्हॅरिएंट्सचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये केवळ अशा व्हॅरिएंट्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची प्रसारक्षमता अधिक आहे, जे अधिक घातक आहेत आणि उपलब्ध लस किंवा औषधोपचारांचा त्यांच्यावर म्हणावा असा परिणाम होत नाही. AY.4.2 या व्हॅरिएंटबाबत बोलायचं झाल्यास, याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असला तरी अद्याप हा घातक असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. हा विषाणू डेल्टापेक्षा सुमारे 10 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचं एका रशियन वैज्ञानिकाने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं. हा विषाणू लवकरच डेल्टाची जागा घेईल असा अंदाजही या वैज्ञानिकाने व्यक्त केला. यासोबतच, उपलब्ध लशी या विषाणूवर प्रभावी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या विषाणूबाबत एवढी चर्चा का? कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटनंतर गेल्या सहा महिन्यांत कोणतंही नवीन रूप समोर आलं नव्हतं. त्यामुळे कोरोनाचे हे शेवटचं विकसित रूप असल्याचं समजलं जात होतं; पण आता हा नवा व्हॅरिएंट आल्यामुळे याचं अधिक निरीक्षण करणं गरजेचं असल्याचं मत लंडनच्या इम्पिरिकल कॉलेजमधले रोगप्रतिकारशास्त्राचे प्राध्यापक डॅनी अल्टमन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतले माजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. स्कॉट गॉटलिब यांच्या मते, हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत; मात्र तरीही याबाबत खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या संचालिका रॉशेल वॉलेन्स्की यांच्या मते अमेरिकेत अद्याप या विषाणूचा काहीही धोका नाही. व्हाइट हाउसमध्ये कोविड-19 बाबत माहिती देताना त्यांनी हे स्पष्ट केलं. ब्रिटनबाबत बोलायचं झाल्यास, ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रमुख अँड्रू पोलार्ड यांनी आपण या विषाणूला मोठा धोका मानत नसल्याचं म्हटलं आहे. हा विषाणू डेल्टाची जागा घेईल असे कोणतेही पुरावे अद्याप मिळाले नसल्याचं त्यांनी बीबीसी रेडिओशी बोलताना स्पष्ट केलं. तसं काही झालं तरी सध्याचं चित्र मोठ्या प्रमाणात बदलेल असंही काही नसल्याचं ते म्हणाले.
First published:

Tags: Coronavirus, Uk corona variant

पुढील बातम्या