मुंबई, 26 फेब्रुवारी- काही वेळापूर्वी झी मराठीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची चर्चा रंगली होती. झी मराठीचं इंस्टाग्राम आणि फेसबुक सगळ्याच ठिकाणी झी मराठीचा लोगो आणि इतर पोस्ट्स उलट्या दिसत होत्या. पण अखेर याचा उलगडा झाला असून हि झी मराठीची प्रमोशनल कल्पना होती. झी मराठीवर हॉरर पद्धतीची नवीन मालिका सुरू होत आहे. त्याच्याच प्रमोशनासाठी ही उलाटापालट केली होती. रविवारी (26 फेब्रुवारी) दुपारी अचानक ‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील काही पोस्ट या उलट दिसत होत्या. त्यांनी त्यांच्या मालिकेचे काही प्रोमो व्हिडिओ शेअर केले होते. पण हे प्रोमो व्हिडिओ आणि त्यावरील कॅप्शन हे उलट दिसत होते. सुरुवातीला हा प्रकार नेमका काय? याबद्दल चर्चा सुरु झाली. यानंतर तासाभरापूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीने या उलट दिसणाऱ्या पोस्टमागे नेमकं काय कारण आहे? याबद्दल सांगितले आहे. वाचा- ‘जिवंत समाधी घेणारे शेवटचे युगपुरुष’ सावरकरांबद्दल पोंक्षेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत ‘झी मराठी’वरील या उलट दिसणाऱ्या पोस्टमागे त्यांची नवी मालिका असल्याचे समोर आले आहे. याचा प्रोमोही ‘झी मराठी’ने शेअर केला आहे. झी मराठीवर हॉरर पद्धतीची नवीन मालिका सुरू होतेय तिचं नाव चंद्रविलास आहे. “गूढ अंधारमय जगाची उलटी वाट, थरकाप उडवणार भीतीची लाट… ‘चंद्रविलास’ 27 मार्चपासून सोम-शनि रात्री 11 वाजता झी मराठी वर”, असे कॅप्शन ‘झी मराठी’ने या प्रोमोला दिले आहे. येत्या 27 मार्चपासून प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे.
ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा या घटनांमागे आहे. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.
दुष्टशक्तींच्या अचाट सामर्थ्यापुढे वडील-मुलीतल्या प्रेमाचा निभाव लागेल का, अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल का, हे या उत्कंठावर्धक मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक भागागणिक एक नवा खुलासा आणि दर खुलाशामागे एक नवी कहाणी असलेली ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होईल, ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत वैभव मांगले असणार आहे.