Wonder Woman 1984 Review : कसा आहे हा नवा सिनेमा? पाहण्याआधी समीक्षक काय म्हणतात वाचा..

वंडर वुमन (Wonder Woman) या पात्रावर आधारित असलेला 'वंडर वुमन 1984' (Wonder Woman 1984) हा सिनेमा अमेरिकेत रिलीज होण्याच्या एक दिवस आधी, आज (24 डिसेंबर) भारतात रिलीज झाला.समीक्षकांनी 'वंडरलेस' सीक्वेल’ म्हणून याची नोंद केली आहे.

वंडर वुमन (Wonder Woman) या पात्रावर आधारित असलेला 'वंडर वुमन 1984' (Wonder Woman 1984) हा सिनेमा अमेरिकेत रिलीज होण्याच्या एक दिवस आधी, आज (24 डिसेंबर) भारतात रिलीज झाला.समीक्षकांनी 'वंडरलेस' सीक्वेल’ म्हणून याची नोंद केली आहे.

  • Share this:
मुंबई, 24 डिसेंबर : डीसी कॉमिक्सच्या (DC Comics) वंडर वुमन (Wonder Woman) या पात्रावर आधारित असलेला 'वंडर वुमन 1984' (Wonder Woman 1984) हा सिनेमा अमेरिकेत रिलीज होण्याच्या एक दिवस आधी, आज (24 डिसेंबर) भारतात रिलीज झाला. 2017मध्ये आलेल्या वंडर वुमन या सिनेमाचा हा सिक्वेल आहे; मात्र स्टारकास्टपासून सगळ्या गोष्टी उत्तम असूनही सिनेमा आधीच्या सिनेमाएवढा प्रभावी नाही, असं मत समीक्षकांनी व्यक्त केलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेसने’ या सिनेमाला केवळ दोन स्टार दिले असून, हिंदुस्तान टाइम्सने wonderless sequel (वंडरलेस सिक्वेल - आश्चर्यकारक नसलेला सिक्वेल) अशा शब्दांत या सिनेमाचं वर्णन केलं आहे. 'गल गडोट (Gal Gadot) जेव्हा आकाशात गिरक्या घेते, धडाकेबाज एंट्री करते, दुष्कृत्यं करणाऱ्यांची तिच्या हातातल्या पाशाने पिटाई करते, तेव्हा तिला पाहणं हा अत्यंत आनंददायी अनुभव आहे; पण ते फायटिंग येण्यापर्यंतची सिनेमाची कथा खूपच दीर्घ झाली आहे. दीडदमडीच्या लुटारूंवर स्क्रीन टाइम जास्त खर्च झाला आहे,' असं मत इंडियन एक्स्प्रेसच्या समीक्षकांनी व्यक्त केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने केलेल्या समीक्षणात असं म्हटलं आहे, की अॅमेझॉनियन काळातली देवी (Amazonian Goddess) आणि ऐंशीच्या दशकातलं स्मरणरंजन (Nostalgia) या दोन गोष्टींवर सिनेमाचा फोकस असायला हवा होता आणि त्या दोन्ही गोष्टी 'कॅश' करण्याचा त्यांचा उद्देश असाव, असं त्याच्या शीर्षकावरून वाटत होतं; पण त्यापैकी कोणत्याच गोष्टीचा पूर्ण क्षमतेनं उपयोग करून घेता आलेला नाही. डीसी कॉमिक्सच्या इंटरेस्टिंग आयकॉन्सपैकी (Icons) एक असलेल्या वंडर वुमनच्या भूमिकेला गल गडोट या अभिनेत्रीने पुरेपूर न्याय दिला आहे; मात्र या आत्मा नसलेल्या (Soulless), आश्चर्य नसलेल्या सिनेमाला सावरण्यात ती पूर्णतः यशस्वी झालेली नाही. पॅटी जेनकिन्स (Patty Jenkins) याच दिग्दर्शिकेने वंडर वुमनचा हा सिक्वेल दिग्दर्शित केला आहे; मात्र तरीही तिने सिनेमाचा ओपनिंग सिक्वेन्स डायनाच्या (चित्रपटातलं मुख्य पात्र) लहानपणापर्यंत मागे का नेला, याचं कारण सापडत नाही, असं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे. अर्थात, गल गडोटने साकारलेली डायना उत्तम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही केलेली कोणतीही इच्छा पूर्ण करणारा जादूचा दगड यात दाखवला आहे. तो चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडल्याने काय होतं तेही दाखवलं आहे; मात्र त्या भूमिकेत पेड्रो पास्कल (Pedro Pascal) आपला करिष्मा दाखवू शकलेला नाही. पूर्वी मृत झालेल्या आपल्या प्रियकराला जिवंत करण्याची इच्छा वंडर वुमनने व्यक्त केली आणि तो जिवंत झालाही; मात्र त्या गोष्टीच्या अन्य परिणामांचा विचार वंडर वुमनने कसा केला नाही, याचं आश्चर्य वाटत राहतं, असंही एक्स्प्रेसच्या समीक्षणात म्हटलं आहे. त्यामुळे कदाचित आपण कसल्या इच्छा करतो आहोत, याबद्दल सजग राहा, हाच या चित्रपटातून द्यायचा मूळ संदेश असावा, असं त्यांनी म्हटलं आहे. वर्षभरापूर्वीच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे हॅन्स झिमरच्या (Hans Zimmer) म्युझिकमध्ये सिंथेसायझर (Synthesizer) ऐकायला मिळेल असं वाटलं होतं; मात्र ते तर ऐकायला मिळत नाही, असं हिदुस्तान टाइम्सने म्हटलं आहे. तसंच या कथेचा हिरो आणि पथदर्शक असलेल्या स्टीव्हच्या पात्राला या सिनेमात योग्य न्याय देण्यात आला नाही. डायनाला केवळ तिच्या पराक्रमांमध्ये मदत करण्याएवढंच त्याचं अस्तित्व यात मर्यादित ठेवण्यात आलं आहे, असं हिंदुस्तान टाइम्सने म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेता हृतिक रोशनने हा सिनेमा पाहून अत्यंत उत्तम, थरारक अनुभव मिळाल्याचं ट्विट केलं आहे. गल गडोट हिनं 'पर्फेक्ट वंडर वुमन' साकार केल्याचं प्रशस्तिपत्रही त्याने ट्विटमध्ये दिलं. गल गडोटनंही त्याला रिप्लाय देऊन आभार मानले आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रेक्षक या सिनेमाचं स्वागत कसं करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First published: