मुंबई, 29 मार्च- 94व्या ऑस्कर पुरस्कार 2022 (Oscars 2022) मध्ये CODA आणि Dune सोबत, विल स्मिथदेखील चर्चेत आला आहे. ऑस्कर पुरस्कारादरम्यान, ख्रिस रॉकने (Chris Rock) विलची पत्नी जेडा पिंकेट स्मिथवर केलेल्या विनोदावर विल स्मिथ (Will Smith) इतका संतापला की त्याने स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकला कानशिलात मारली. त्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली. परंतु, या घटनेनंतर जेव्हा 'किंग रिचर्ड'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर घेण्यासाठी विल स्टेजवर पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल ऑस्करची माफीही मागितली आणि आता त्याने यासंदर्भात एक अधिकृत पोस्टही शेअर केली आहे.
विल स्मिथने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ख्रिस रॉकला कानशिलात मारल्याबद्दल माफी मागितली आहे. विल स्मिथने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय- 'सर्व प्रकारची हिंसा ही विषारी आणि विनाशकारी आहे. काल रात्री ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. विनोद हा माझ्या कामाचा एक भाग आहे, परंतु जेडाच्या वैद्यकीय स्थितीबद्दलचा विनोद माझ्यासाठी खूप जास्त होता आणि मी भावनिक प्रतिक्रिया दिली.'

त्याने पुढं लिहिलं- 'मला ख्रिसची जाहीर माफी मागायची आहे. मी हद्द पार केली आणि मी चुकीचा होतो. मला या कृत्याबद्दल लाज वाटते आणि माझी कृती मला जो माणूस व्हायचे आहे त्याचे सूचक नव्हते. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मला अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थितांची आणि जगभरात पाहणाऱ्या प्रत्येकाचीही माफी मागायची आहे; मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या 'किंग रिचर्ड' कुटुंबाची माफी मागायची आहे'.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा पार पडला. अभिनेता विल स्मिथ आणि जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अॅकॅडमी अवॉर्ड मिळालं. त्याचबरोबर 'कोडा'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. यावर्षी जेन कॅम्पियनच्या 'द पॉवर ऑफ द डॉग' या चित्रपटाला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती तर 'ड्यून' या चित्रपटानं सर्वाधिक सहा ऑस्कर जिंकले. मात्र, या वर्षीचे अॅकॅडमी अवॉर्ड्स एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. अभिनेता विल स्मिथनं ऑस्कर वितरण सोहळ्यामध्ये कॉमेडियन क्रिस रॉकवर थेट स्टेजवर जाऊन हात उचलून खळबळ उडवून दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.