मुंबई, 28 जानेवारी : मसाबा गुप्ता हे बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं प्रसिद्ध नाव आहे. उत्कृष्ट फॅशन डिझायनर असलेल्या मसाबाने अभिनय क्षेत्रातही नशीब आजमवलेलं आहे. दुसऱ्यांदा लग्न केल्यामुळे सध्या मसाबाचं नाव चर्चेत आहे. तिनं अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली आहे. सत्यदीप मिश्रा आणि मसाबा गुप्ता यांनी शुक्रवारी (27 जानेवारी) कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून आपल्या लग्नाची घोषणा केली. 'रिपब्लिक वर्ल्ड'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सत्यदीप मिश्राने 2011मध्ये ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं 'फेरारी की सवारी', 'बॉम्बे वेल्वेट' आणि 'विक्रम वेधा' यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने 'अवैध', 'नक्षलबारी', 'हिज स्टोरी' आणि 'तनाव' यांसारख्या अनेक वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलेलं आहे. सत्यदीपचं शालेय शिक्षण डेहराडूनमधल्या 'डून स्कूल'मध्ये झालं आहे. त्यानं दिल्लीतल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. अभिनेता होण्यापूर्वी त्यानं नवी दिल्लीत कॉर्पोरेट वकील म्हणून काम केलं आणि सरकारी संस्थेत काही काळ नोकरीही केली आहे.
हेही वाचा - Rakhi sawant : राखी सावंतच्या आईचं दुःखद निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अयशस्वी
मसाबा आणि सत्यदीप या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी, मसाबानं 2015मध्ये निर्माता मधू मंटेनाशी लग्न केलं होतं. 2019मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सत्यदीप मिश्राने आदिती राव हैदरीशी लग्न केलं होतं. 2013मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आदिती वयाच्या 17व्या वर्षी सत्यदीपला भेटली होती आणि वयाच्या 21व्या वर्षी तिने त्याच्याशी लग्न केलं होतं. तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना आपलं लग्न गुप्त ठेवलं होतं.
आता सत्यदीपने नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांच्या मुलीशी म्हणजेच मसाबाशी लग्न केलं आहे. दोघं गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटोही पोस्ट केले होते.
लग्नानंतर व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मसाबानं सांगितलं, की तिची आणि सत्यदीपची भेट 'मसाबा मसाबा' शोच्या सेटवर झाली होती. या मालिकेत त्यानं तिच्या पहिल्या पतीची भूमिका साकारली होती. शांतता आणि निरोगी जीवनशैलीच्या समान आवडींमुळे दोघांचं लवकर सूत जुळलं. सत्यजितमुळेच तिची फिटनेस जर्नी सुरू झाली, असं मसाबाचं म्हणणं आहे.
लग्नानंतर मसाबानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून फोटो शेअर केले आहेत. "आज सकाळी मी सागराप्रमाणे शांत असलेल्या व्यक्तीशी लग्न केलं. इथे प्रेम, शांतता, स्थिरता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आनंद आहे. आणि मला कॅप्शन निवडू दिल्याबद्दल धन्यवाद - हे खूप छान होईल!," अशी कॅप्शन मसाबाने या फोटोंना दिली आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचे जन्मदाते आई-वडील आणि कुटुंबातले इतर सदस्य आहेत.
मसाबाने आपल्या लग्नात 'हाउस ऑफ मसाबा' या तिच्याच ब्रँडने डिझाइन केलेला लेहेंगा आणि तिच्या आईचे दागिने घातले होते. सत्यदीपनेदेखील 'हाउस ऑफ मसाबा'तला गुलाबी कुर्ता आणि पायजमा घातला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment