मुंबई, 24 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बसलेल्या धक्क्यातून अनेकजण अद्याप सावरलेले नाही. त्याच्या चाहत्यांना तो आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण जात आहे. एककीडे बॉलिवूडच्या घराणेशाहीवर सोशल मीडियावरून वाद सुरू आहेत. तर दुसरीकडे सुशांतचे चाहते त्याच्या आठवणीत त्याचे जुने व्हिडीओे सुद्धा सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. सुशांतचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो त्याचा सुपरहिट सिनेमा 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' टीव्हीवर पाहताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुशांत स्वतःचाच सुपरहिट सिनेमा टीव्हीवर पाहताना दिसत आहे. सुरुवातीला त्याच्या चेहऱ्यावर खूपच गंभीर भाव पाहायला मिळत आहेत. त्याच्या हातात डायरी आणि पेन आहे आणि सिनेमा पाहता पाहता तो डायरीत काहीतरी लिहिताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सुशांत धोनी सोबतच स्वतःलाही चिअर करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडलेला दिसत आहे. या सिनेमात अनुपम खेर यांनी धोनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर भूमिका चावलानं त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय कियारा अडवाणी आणि दिशा पाटनी यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमासाठी सुशांतनं प्रचंड मेहनत घेतली होती. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली. 104 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 216 कोटींचा गल्ला जमवला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलं होतं.