मुंबई, 23 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडली आहे. त्याचे चाहते आणि मित्र या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यामातून सर्वजण त्याच्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत. अशात आता डान्सर आणि 'ABCD-2' फेम अभिनेत्री लॉरेन गॉटलिब हिने सुद्धा सुशांतसोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात त्यानं तिच्यासोबत आउटसायडर आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल चर्चा केली होती. यात सुशांतनं कबुल केलं होतं की, तो आउटसायडर आहे पण त्यानं टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करताना कधीच हार मानली नाही.
सुशांत सिंह राजपूत अशाप्रकारे सर्वांचा निरोप घेईल असं कोणालाच वाटलं नव्हतं कारण त्यानं आतापर्यंत या क्षेत्रातल्या संकटांना घाबरून हार मानली नव्हती. म्हणूनच तो अनेक आऊटसायडर्ससाठी आदर्श होता. त्यामुळेच आता त्याच्या आत्महत्येनंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर नवी मोहीम सुरू झाली आहे. पण लॉरेननं सुशांतसोबतच्या संभाषणाचे जे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत ते पाहिल्यावर सर्वांच्या लक्षात येईल की सुशांत केवळ त्याच्या आयुष्यात संघर्ष करत नव्हता तर त्यानं इतरांना सुद्धा संघर्ष करण्यासाठी प्रेरणा दिली होती.
सुशांतसोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना लॉरेन्सनं लिहिलं, आज मी सुशांतसोबत काही वर्षांपूर्वी झालेलं संभाषण वाचलं. ते वाचल्यावर माझं मन भरून आलं. त्यात खूप सारं प्रेम, दयाळूपणा आणि एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली जाणारा पाठींबा होता. माझ्या त्याच्यासोबत एक वेगळंच कनेक्शन होतं कारण आम्ही दोघंही आउटसायडर होतो आणि तो खूपच भारी होता. मी हे चॅट शेअर करायचे होते. मला यातून सर्वांना हेच सांगायचं आहे की, आपण प्रत्येक वक्तीवर असंच प्रेम करायला हवं आणि त्याचा सन्मान करायला हवा. सध्या सगळीकडे खूप तिरस्कार पहायला मिळत आहे. सुशांतचं प्रमेळ मन सांगतं की, हे जग एक सुंदर जागा आहे. त्यामुळे त्याच्यासारखंच आपणही सर्वांनावर प्रेम करत राहूया आणि इतरांवर दया करत राहूया...
लॉरेन्स आणि सुशांतचं हे चॅटिंग 'एम एस धोनी' सिनेमाच्या रिलीजच्या वेळचं आहे. हे चॅटिंग 2016 मधील आहे. यामध्ये सुशांत लिहितो, तुम्ही स्वतःला आधी तयार करायला हवं. तेव्हा तुम्हाला बाकी सर्वजण तुम्हाला फॉलो करतील. टीव्हीपासून सिनेमापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास अजिबात सोपा नव्हता. यात सुशांत स्वतःला एक सामान्य मुलगा असल्याचं सांगतो. तो म्हणतो माझ्याकडे सामान्य टॅलेंट होतं पण मला स्वतःवर असलेल्या विश्वासामुळे इथंवर पोहोचलो आहे.
सुशांतनं 14 जूनला मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sushant Singh Rajput