मुंबई, 22 नोव्हेंबर: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) लग्नांची धामधूम सुरू आहे. अनेक सेलेब्रिटी आपल्या लग्नाच्या तयारीत गुंफले आहेत. आलिया-रणबीर कपूर, विकी कौशल -कॅटरिना कैफ या जोड्या लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नुकतीच राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha) यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्न सोहळ्याची (Marriage Ceremony) सर्वत्र चर्चा सुरू असून, त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राजकुमार रावने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला चाहत्यांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 15 नोव्हेंबर 2021 रोजी विवाह केला. चंदीगडमधील (Chandigarh) ‘द ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्ट’ या लक्झरी रिसॉर्टमध्ये त्यांचा अलिशान विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फराह खानपासून ते हुमा कुरेशीपर्यंत अनेक स्टार्स त्यांच्या लग्नाला आले होते. या सोहळ्यातील काही सुंदर क्षणांचा व्हिडिओ राजकुमार रावने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे. या व्हिडिओमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. दोघंही अगदी खूश दिसत आहेत. यामध्ये वधू बनलेली पत्रलेखा मंडपाच्या दिशेने जाताना दिसत असून, तिनं आपल्या हातानं हृदयाचा आकार करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर तिला येताना बघून राजकुमार राव शिट्टी वाजवून तिचं स्वागत करताना दिसत आहे.
मंडपात पोहोचल्यावर पत्रलेखा राजकुमार राव याला म्हणत आहे की, ‘राज, 11 वर्षे झाली, पण मला असं वाटते की मी तुला आयुष्यभर ओळखत आहे, फक्त या जन्मीची आपली साथ नाही तर गेल्या अनेक जन्मांची आपली साथ आहे, याची मला खात्री आहे आहे. तर राजकुमार राव म्हणतो, ’ गेली 10-11 वर्षे आपण भेटत असलो तरीही आपण नुकतेच डेटिंग सुरू केले आहे, असं वाटतंय. आम्हाला फक्त एकमेकांची कंपनी खूप आवडते. म्हणून आम्ही ठरवलं की आता लग्न करू या. पती-पत्नी होऊ या. ’ पुढे व्हिडिओमध्ये दोघं एकमेकांना हार घालताना दिसतात. या पुष्पहार समारंभानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दोघेही हसत हसत सप्तपदी पूर्ण करताना दिसत असून, त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी राजकुमार राव पत्रलेखाच्या मागणीत सिंदूर लावताना दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानं पत्रालेखाच्या भांगात सिंदूर भरल्यानंतर पत्रलेखाला त्यानं आपल्याला सिंदूर लावायला सांगितला. त्यानुसार पत्रलेखा राजकुमार रावच्या कपाळावर सिंदूर लावताना दिसत आहे. लोकांना ही गोष्ट खूप आवडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यांची एकमेकांवरील प्रेमाचे कौतुक करत असून त्यांची जोडी अशीच कायम राहावी अशी प्रार्थना करत आहेत. त्यांचे अभिनंदन करत आहेत. कोरीओग्राफर, दिग्दर्शक फराह खाननेदेखील (Farah Khan) राजकुमारसोबतचा साफा बांधतानाचा एक फोटो शेअर केला असून,त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न करत नाही जिच्यासोबत तुम्ही जगू शकता, पण तुम्ही जिच्याशिवाय राहू शकत नाही अशा व्यक्तीबरोबर लग्न करता. ’ राजाकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या नात्याचं अचूक वर्णन करणारी ही कॅप्शन असून, हा फोटोदेखील व्हायरल झाला आहे. चाहते फराह खानच्या कॅप्शनला मनापासून दाद देत आहेत.