चेन्नई, 15 डिसेंबर: दाक्षिणात्य अभिनेत्री (South Actress) व्हीजे चित्रा (VJ Chitra) मृत्यूप्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलं आहे. 9 डिसेंबर 2020 रोजी तिने आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती हेमंतला पोलिसांनी अटक केली आहे. चित्राच्या आईने, जायवावर मुलीला मारल्याचे आणि तिची हत्या केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता संशयाची सूई तिचा पती हेमंतकडे गेली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, पॉस्टमार्टेम रिपोर्टनुसार चित्राने आत्महत्याच केली आहे. परंतु, ती आर्थिक अडचणीत होती त्यामुळे तिच्या पतीने तिचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असाही आरोप करण्यात येत आहे.
चित्राने सिनेमा आणि मालिकांमध्ये बोल्ड सीन देणंही तिच्या पतीला आवडत नव्हतं असा तिच्या काही मित्रमंडळींनी केला आहे. त्यावरुन त्यांच्यात वादही होत होते. अवघ्या 28 वर्षांच्या चित्राच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अशी माहिती समोर येते आहे की चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. स्टार विजय चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या पांडियन स्टोअर्स (Pandiyan Stores) या तमिळ मालिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. यामध्ये ती मुल्लाई (Mullai) ही भूमिका करत होती.
त्या दिवशी काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रा ईव्हीपी फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत होती. याठिकाणी शूटिंग संपल्यानंतर ती रात्री अडीचच्या सुमारास हॉटेलमध्ये परतली. याठिकाणी तिच्या नवऱ्याबरोबर ती राहत होती. पोलिसांना दिलेल्या एका जबाबात हेमंत यांनी असं म्हटलं आहे की, चित्राने त्यांना ती अंघोळीला जात असल्याचं म्हटलं. मात्र बराच काळासाठी ती परत आली नाही. तसंच दरवाजा ठोठावूनही तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा हेमंत यांनी हॉटेल स्टाफशी संपर्क केला आणि डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला, तेव्हा सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.