मुंबई, 25 मे : मागच्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीमधून एका मागोमाग एक निधन वार्ता येतच आहेत. अशात आता आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त आहे. या अभिनेत्रीचं वयाच्या 22 व्या वर्षीच निधन झालं असून तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरीच सापडला आहे. ही अभिनेत्री म्हणजे, नेटफ्लिक्सचा पॉप्युलर रिअरलिटी शो टेरेस हाऊसची अभिनेत्री हाना किमूरा आहे. हानाचा मृतदेह तिच्या राहत्या घरातच सापडला आहे. ती एक जपानी प्रो-रेसलर सुद्धा होती. स्टारडम रेसलिंग या रेसलिंग ऑर्गनायझेशननं तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हाना किमूराचा मृत्यू नेहमी कशामुळे झाल्या याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे एवढ्या कमी वयात तिचं निधन झाल्यानं फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. फार कमी वयातच हानानं बरंच यश मिळावलं होतं. तिच्या निधनाबाबत तिच्या जवळच्या व्यक्तीच्या कोणत्याही प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाहीत. सोशल मीडियावरही हानाचे बरेच चाहते होते.
काही मीडिया रिपोर्ट्सनी असा दावा केला आहे की, मागच्या काही दिवसांपासून हाना ट्रोलर्समुळे त्रासली होती. नेटफ्लिक्सवर टेरेस हाऊस हा शो सुरु झाल्यानंतरच हाना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. हा शो टोकियोमध्ये राहणाऱ्या तीन महिला आणि तीन पुरुषांवर आधारित होता. जो कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर बंद करण्यात आला. मात्र या शोनंतर हानाला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.
असंही म्हटलं जातं की हानानं तिच्या मृत्यूच्या आधी चाहत्यांना हिंट दिली होती. मृत्यूच्या दोन दिवस अगोदरच हानानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती तिच्या मांजरीसोबत दिसत आहे. या फोटोसोबत तिनं तिच्या चाहत्यांसाठी एक गुडबाय मेसेज लिहिला होता आणि त्यात तिनं चाहत्यांना नेहमीच खूश राहा असंही म्हटलं होतं.