मुंबई 20 एप्रिल: सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं बसलेल्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच मराठी मनोरंजसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्याच्या जाण्यामुळं मराठी मनोरंजसृष्टीत कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते केवळ एक अभिनेताच नव्हते तर कित्येक कलावंतांना, विद्यार्थांना, गरीबांना मदत करणारे त्यांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते देखील होते. त्यांच्या आचानक जाण्यामुळं महाराष्ट्र मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.
किशोर नांदलस्कर यांचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. मुंबईत गिरगांव, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचं बालपण गेलं होतं. त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांचे वडील खंडेराव हे ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरीला होते. तिथं काम करत असताना आंतरगिरणी व कामगार स्पर्धेतील नाटकांमध्ये ते काम करायचे. त्यामुळं वडिलांचा प्रभाव किशोर यांच्यावर पडला. अन् त्यांच्यात देखील अभिनयाची आवड निर्माण झाली.
नांदलस्कर यांनी सुमारे 40 नाटकं, 25 पेक्षा अधिक मराठी व हिंदी चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ या चित्रपटांमुळं ते मराठी सिनेसृष्टीत खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले होते. ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकात त्यांनी साकारलेली राजा ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती. यामुळं त्यांना अनेकजण राजा म्हणूनच हाक मारायचे. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पुढे त्यांनी ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. खाकी या चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय पाहून अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांची तोंड भरुन स्तुती केली होती. अशा या महत्वाकांशी अभिनेत्याच्या निधनामुळं महाराष्ट्राला जबरदस्त धक्का बसला आहे. सर्वसामान्य लोकांसोबतच अनेक नामांकित सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.